scorecardresearch

अग्रलेख : जान, जहान, जॉब!

ओमायक्रॉन तूर्त भासतो तसाच अशक्त राहिला, तर गेल्या खेपेप्रमाणे आताही आपल्यासाठी खरे आव्हान आर्थिकच असेल..

अग्रलेख : जान, जहान, जॉब!
(प्रातिनिधिक छायाचित्र)

ओमायक्रॉन तूर्त भासतो तसाच अशक्त राहिला, तर गेल्या खेपेप्रमाणे आताही आपल्यासाठी खरे आव्हान आर्थिकच असेल..

कोणी कशात आनंद मानावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी तो साजरा करण्यामागील कारणे आणि पद्धत यावरून साजरा करणाऱ्यांची संस्कृती दिसून येते. काही आठवडय़ांपूर्वी ब्रिटन, जर्मनी, अमेरिका अशा अनेक विकसित देशांत जेव्हा करोनाच्या नव्या विषाणूच्या पुढच्या लाटेचा धुमाकूळ सुरू झाला तेव्हा आपल्याकडे ‘बघा त्या देशांचे कसे हाल सुरू आहेत’ असे म्हणत अनेक अर्धसंस्कृतांनी उच्चरवात भारतीय व्यवस्थेचे गुणगान अधिक सुरू केले. विकसित म्हणून गणल्या गेलेल्या, विज्ञानस्नेही धोरणे असलेल्या आणि मुख्य म्हणजे विज्ञानदुष्ट सत्ताधारी नसलेल्या देशांस करोनाचा फटका बसला याचे सुख या राष्ट्रप्रेमी भारतीयांस अधिक! वास्तविक साथीतील बळींचा भार सहन न होऊन प्रेते पवित्र वगैरे गंगा नदीत फेकून द्यायची वेळ ज्या देशात आली त्या देशातील नागरिकांनी अधिक शहाणपण दाखवणे अपेक्षित असताना उलट आरोग्यसेवा उत्तम असलेल्या देशांस ही साथ सहन करावी लागते यात समाधान मानणे यातून किरकिऱ्यांचा कोतेपणा तेवढा दिसतो. बरे इतके करून करोनाच्या नव्या विषाणूची लाट आपल्याकडे रोखता आली असती तरी हा या मंडळींचा क्षुद्रपणा स ठरला असता. पण तसे झाले नाही. होणारही नव्हते. पण आपल्याकडे करोनाची नवी लाट आली नाही यापेक्षा ‘त्यांच्या’कडे आली हा या अर्धवटरावांचा आनंद किती क्षणिक होता हे आपल्याकडील वास्तव ‘पाहिल्यास’ लक्षात येईल.

तिसऱ्या लाटेचे आगमन हे ते वास्तव. केंद्रीय पातळीवर या तिसऱ्या लाटेबाबत कोणीही अधिकृतपणे विधान करीत नसले तरी स्थानिक पातळीवर अनेक जणांनी ‘हीच ती तिसरी लाट’ असे जाहीर करून आपापल्या पद्धतीने उपाययोजनाही सुरू केल्या. हे असे होणे योग्यच. याचे कारण महासंहारक दुसऱ्या लाटेत केंद्रीय महागोंधळ आणि उच्चपदस्थांचे त्या काळातील महामौन यांच्या स्मृती ताज्या असल्याने स्थानिकांनी परस्पर उपाययोजना सुरू करण्यातच शहाणपण होते. ते या वेळी दिसून आले. त्यामुळे दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या लाटेचे व्यवस्थापन (तूर्त तरी) बरे असल्याचे चित्र दिसते. या नव्या लाटेचा निर्माणकर्ता असलेल्या करोनाच्या ओमायक्रॉन उत्परिवर्तनाचा अंगभूत अशक्तपणा हे यामागील महत्त्वाचे कारण. ज्या देशात तो आढळला त्या दक्षिण आफ्रिकेतील महिला संशोधक रॅक्वेल व्हिआना व अँजेलिक कोएट्झी यांनीच सर्वप्रथम या उत्परिवर्तनाच्या अशक्तपणाची ग्वाही दिली. ‘बी.१.१.५२९’ असे या उत्परिवर्तित विषाणूचे पहिले नाव. आज ओमायक्रॉन नावाने ओळखला जाणारा विषाणू तो हाच. पण सुरुवातीस या महिला वैज्ञानिकांवर अनेकांनी अविश्वास दाखवला. पण अंतिमत: त्या खऱ्या ठरल्या. करोनाचे नवे उत्परिवर्तन सूचित करतानाच त्यांनी विषाणूच्या या नव्या रूपाचे आयुष्य कमी असेल आणि तो कमी संहारक असेल असेही स्पष्ट केले. वास्तविक त्याच वेळी आपल्या अंगणातही हा नवा प्रकार येणार हे वास्तव लक्षात घेत तातडीने १८ वर्षांखालील मुलांस लसमात्रा आणि इतरांस वर्धकमात्रा यांचा विचार व्हायला हवा होता. पण कोणतेही संकट दत्त म्हणून समोर ठाकल्याखेरीज मान्यच करायचे नाही या आपल्या इतिहासप्रसिद्ध खाक्यामुळे अन्य वर्गीयांच्या लसीकरणास विलंब झाला. पंतप्रधानांनी राष्ट्रीय संबोधनात ही घोषणा केली तेव्हा कुठे सोमवारपासून हे लसीकरण सुरू झाले. अजूनही वर्धकमात्रेचा निर्णय प्रलंबितच आहे. या लाटेचा जोर वाढला की त्याबाबतही निर्णय घेतला जाईल.

 परिस्थिती अशीच राहिली, म्हणजे ओमायक्रॉन तूर्त भासतो तसाच अशक्त राहिला, तर गेल्या खेपेप्रमाणे आताही आपल्यासाठी खरे आव्हान आर्थिकच असेल. गेल्या आठवडय़ात, वर्षांखेरीस स्थानिक यंत्रणांकडून निर्बंध जाहीर करण्याची सुरू झालेली लगबग या आर्थिक आव्हानाची रूपरेषा दर्शवते. बरे, याबाबत स्थानिक यंत्रणांस दोषही देता येत नाही. दुसऱ्या लाटेत केंद्रीय हाताळणीत झालेली हेळसांड लक्षात घेता या वेळी स्थानिक यंत्रणांनी स्वत:हून सूत्रे हाती घेणेही तसे साहजिकच. त्यानुसार विविध राज्यांत विविध नियम घोषित होऊ लागले आहेत. हॉटेले, नाटय़-चित्रपटगृहे, पर्यटन केंद्रे आदींवर ५० टक्क्यांची मर्यादा लादली गेल्याने नुकतेच सावरू पाहणाऱ्या सेवा क्षेत्रास पुन्हा एकदा फटका बसणार हे उघड आहे. विमानसेवा आणि त्या देणाऱ्या कंपन्यांच्या पोटात यामुळे गोळा आला असल्यास आश्चर्य नको. हे क्षेत्र अद्यापही दुसऱ्या लाटेतील दुष्परिणामांतून सावरलेले नाही. या क्षेत्रांपाठोपाठ सौंदर्य प्रसाधने, व्यक्तिगत सेवा अशा क्षेत्रांवरही निर्बंध येणार. गेली कित्येक वर्षे सेवा क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बनून राहिले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत कारखानदारी, अभियांत्रिकी अशा क्षेत्रांचा वाटा लक्षणीय होता. अलीकडे त्यांची जागा सेवाक्षेत्र घेताना दिसते. म्हणून करोनाच्या तिसऱ्या लाटेत जर सेवाक्षेत्रालाच फटका बसला तर त्याचा अर्थव्यवस्थेवर अधिक वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक.

तसे होणे टाळायचे असेल तर त्यासाठी केंद्राने आपली जबाबदारी ओळखून राज्यांस आवश्यक ते मार्गदर्शन करण्याची गरज आहे. पण आपले केंद्रीय नेते मश्गुल आहेत ते उत्तर प्रदेश निवडणूक प्रचारात जास्तीत जास्त गर्दी कशी खेचता येईल; यात. दुसऱ्या लाटेस पश्चिम बंगाल निवडणुकांनी हातभार लावला. इतिहासाची पुनरावृत्ती होणार असेल तर तिसऱ्या खेपेस ही भूमिका उत्तर प्रदेश  बजावेल असे दिसते. म्हणजे रंगमंच तेवढा बदलेल. मुख्य कलाकार तेच. सामान्यजनांवर ५० टक्क्यांची मर्यादा घालणारे, करोनायोग्य वागण्याचे सल्ले देणारे स्वत: मात्र हजारोंच्या सभेतील एकतर्फी संवादात मग्न. या सभा जणू अनेकांसाठी जीव की प्राण! एका बाजूला या दिवसाढवळ्या गर्दी खेचणाऱ्या सभा आणि दुसरीकडे रात्री जमावबंदी किंवा तत्सम बिनडोक निर्णय अशा कात्रीत भारतीय सापडलेले दिसतात. ‘रात्रीच्या जमाव वा संचारबंदीस कोणताही शास्त्रीय आधार नाही’ असे स्पष्टीकरण जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने खुद्द वैद्यकीय सल्लागार डॉ. सौम्या स्वामिनाथन यांच्याकडूनच दिले गेले असले तरी आपल्या प्रशासनास ते मान्य नसावे. या अशा रात्रनिर्बंधांमुळे करोना प्रसारास आळा बसतो की नाही याचा कोणताही तपशील उपलब्ध नाही. पण तरीही या मंडळींचा रात्रनिर्बंधांचा सोस काही कमी होत नाही. वास्तविक आता प्रयत्न हवे आहेत ते अर्थचक्रास अधिकाधिक गती कशी देता येईल यासाठी नव्या उपायांचे. एका बाजूने सरकार सांगते काळजीचे कारण नाही, आणि त्याच वेळी निर्बंधांचेही सूतोवाच करत राहाते. त्यामुळे उद्योगविश्वास कमालीच्या अस्थिरतेस तोंड द्यावे लागत असून त्याचा मोठा फटका अंतिमत: गुंतवणुकीवर होताना दिसतो. ‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या संस्थेने मंगळवारीच प्रसृत केलेल्या तपशिलानुसार देशातील बेरोजगारीच्या दराची अलीकडच्या काळातील उच्चांकाकडील वाटचाल लक्षात येते. राष्ट्रीय स्तरावर आठ टक्के बेरोजगार असून केवळ शहरांचा विचार केल्यास हे प्रमाण १० टक्क्यांकडे वेगाने झेपावताना दिसते. हे भयावह आहे. इतर काही देशांत करोना लाट आली म्हणून आपल्याकडे ज्यांना गुदगुल्या झाल्या त्यांनी त्या देशातील अर्थव्यवस्थेचे चित्र पाहावे. करोनाच्या कराल लाटेनंतरही त्या देशांच्या अर्थव्यवस्थांचे तितके नुकसान झालेले नाही. याउलट परिस्थिती आपली. म्हणून आता जान आणि जहान दोन्ही वाचवताना त्यांच्या बरोबरीने जॉब कसे वाचतील यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. निवडणुका येतील आणि जातील. नोकऱ्यांचे तसे नसते. म्हणून करोनाकाळातही त्या वाचवण्यावर भर हवा.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2022 at 02:24 IST

संबंधित बातम्या