दिवाळी अंकांचे वा साहित्य संमेलनांचेही यश केवळ संख्येने मोजायचे का, याचा विचार व्हायला हवा..

जुन्या लेखकांचे लेखन पुढे सरकणार नाही, संपादकाची संपादकीय दृष्टी विस्तारणार नाही. असे असेल तर दिवाळी अंकांचे, वाचकांचे, आणि मराठी साहित्याचेही काय आणि कसे भले होणार? त्याच त्या अंकांचे गिरवलेले तेच ते पाढे पुन्हा पुन्हा ऐकावे लागणार. आणि महत्त्वाचे म्हणजे याच मंडळींची साहित्यव्यवहारावरील सत्ता निरंकुश राहणार.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत

नामदार गोखले, लक्ष्मीबाई टिळक, डॉ. भांडारकर, काशीबाई कानिटकर, श्रीमंत बाबासाहेब प्रतिनिधी, रेव्ह. टिळक, माधवानुज.. ही यादी अशी बरीच लांबवता येईल. त्यातील काही नावे आजही लोकांच्या ठणठणीतपणे स्मरणात असलेली, तर काही विस्मृतीत गेलेली. आजचे वर्ष २०१६. आजपासून १०० वर्षांच्याही मागील काळातील ही नावे. फेसबुक, ट्विटर असली समाजमाध्यमे सोडाच, साध्या विजेची जोडणी घरी असणे म्हणजे चैन, असा काळ तो. त्या काळातील नावांची ही यादी. ही यादी दिवाळी अंकातील मानकऱ्यांची. ती येथे देण्याचे खास असे कारण आहेच. कारण हे मानकरी आहेत मराठीतील पहिल्या मानल्या जाणाऱ्या दिवाळी अंकाचे. सन १९०९ मध्ये मनोरंजन या मासिकाचा दिवाळीत जवळपास २०० पानांचा, एक रुपये किमतीचा जो अंक प्रसिद्ध झाला तो दिवाळी अंकांच्या परंपरेचा उगम समजला जातो. त्याचे संपादक होते का. र. मित्र. त्याआधी, सन १९०५ मध्ये बाळकृष्ण भागवत आणि देवधर या संपादकद्वयीने त्यांच्या मित्रोदय या मासिकाबाबत तसा प्रयोग केला होता, अशी नोंद आढळते. मात्र घसघशीत पृष्ठसंख्येचा, विविध गद्य व पद्य साहित्यप्रकारांना स्थान देणारा, आकर्षक रीतीने सादर झालेला व ती वार्षिक परंपरा पुढेही बऱ्यापैकी जपणारा पहिला दिवाळी अंक मनोरंजनचाच होता, एवढे उपलब्ध प्रसिद्ध माहितीवरून सांगता येते. सन १९०९ ते आज सन २०१६. हा कालावधी १०७ वर्षांचा. एकदम वैश्विक वगैरे पातळीवरून विचार केला, तर हा कालावधी अगदीच किरकोळ. एखाद्या तत्त्वचिंतकाच्या भूमिकेत शिरलो, आणि विश्वउत्पत्तीपासूनच्या काळाचा हिशेब मांडला तर ही १०७ वर्षे म्हणजे एखाद्या किरकोळ अपूर्णाकाचा त्याहूनही अतिकिरकोळ भाग. पण आपण पडलो साधीसुधी, मराठी माणसे. वयानुसार माणूस मोठा होत जातो, शिकत जातो, परिपक्व होत जातो, विचारी होत जातो, समृद्ध होत जातो असे मानणारी, किमानपक्षी तशी अपेक्षा बाळगणारी. जिवंत माणसाकडून ही अशी अपेक्षा बाळगणे योग्यच, तद्वत जिवंत संस्थांकडूनही ती बाळगण्यात काही प्रत्यवाय नसावा. आणि दिवाळी अंक ही एकप्रकारे संस्थाच की. बहुमुखी, बहुउन्मेषी, बहुआयामी अशी. मग तर या संस्थेकडून अपेक्षा बाळगायलाच हव्यात, आणि त्याही मोठय़ा. त्या बाळगल्या आणि हिशेब मांडला वयोपरत्वे विकासाचा तर हाती अधिक लागते की उणे? भागाकार की गुणाकार? हे असले प्रश्न आत्ता उपस्थित करण्याचे कारण म्हणजे नुकतीच दिवाळी सरली असली तरी अनेक घरांमध्ये दिवाळी अंकांची पाने अद्याप उलटली जात आहेत. त्यावर एका मर्यादित वर्तुळात का होईना, पण गाठीभेटींत चर्चा होत आहे, समाजमाध्यमांवर त्याबाबतच्या मतमतांतरांची देवाणघेवाण चालू आहे. मग हिशेब मांडण्यास याहून अधिक चांगला मुहूर्त कुठला मिळणार?

या हिशेबमांडणीचा प्रारंभ आकडेवारीपासून करू या. मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांचा नेमका आकडा किती? तर अंदाजे साडेतीनशे. म्हणजे निदान ज्ञात तरी. त्याखेरीज केवळ जाहिरातींमधून कमाई करण्यासाठी निघणारे अंक तर गावगन्ना पैशाला पासरी. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या पुढाऱ्यांच्या, सहकारी साखर कारखान्यांच्या, पतपेढय़ांच्या, बँकांच्या, कुक्कुटपालन केंद्राच्या, दूधसंघांच्या, कारखान्यांच्या जाहिराती मिळवायच्या, गॉगलधारी युवा नेत्यांच्या चकचकीत छायाचित्रांनी पाने भरायची, त्यातून उरलेल्या जागेत स्थानिक हौशी साहित्यिकांनी प्रसवलेले साहित्य अंगचोरपणे बसवायचे, ही अशा अंकांची रीत. सहज शक्य झाले तरच दिवाळीच्या आसपास दिवाळी अंक प्रसिद्ध करायचा, अन्यथा नंतर जमेल तेव्हा, असा त्यांचा खाक्या. त्यामुळे दिवाळी अंकाच्या विकासवाटचालीचा हिशेब मांडताना असे अंक लक्षातही न घेणे उत्तम. लक्षात घ्यायला हवेत ते मुख्य प्रवाहातील म्हणून गणले जाणारे अंक. या अशा अंकांचीही संख्या भरभक्कमच. त्यातले कित्येक नामवंत. वर्षांनुवर्षांची परंपरा असलेले. त्यांचे संपादक जुने-जाणते. पण हे असे जुने-जाणतेपण अजाणतेपणे जुन्याच काळाच्या धाग्यांत गुंतून पडत असेल, सांप्रत काळाकडे उघडय़ा डोळ्यांनी बघत नसेल तर काय होणार? तर, त्याने जे होणार तेच सध्याच्या दिवाळी अंकांतून दिसावे, ही बाब जाणत्या वाचकांसाठी खचितच आनंददायी नाही. सध्याच्या दिवाळी अंकांतून दिसणारे हे आनंददायी नसणारे नेमके काय? तर, ही यादी मोठी. अंकात तीच तीच नावे, तेच तेच विषय, तीच तीच मांडणी आदी अगदीच सहजी दिसून येणाऱ्या गोष्टी. वर्षांनुवर्षांचा नामवंत, जाणता असा एखादा कवी २० वर्षांमागे जशी कविता लिहीत होता तशीच ती आज लिहिणार. कवींची पुनरुक्ती होण्यास हरकत नाही, विषयांचीही पुनरुक्ती होण्यास हरकत नाही, पण लिखाण पुढे सरकल्याचे दिसायला हवे, ते दिसणे दुरापास्त. लेखकाचे लेखन पुढे सरकणार नाही, संपादकाची संपादकीय दृष्टी विस्तारणार नाही. असे असेल तर दिवाळी अंकांचे, वाचकांचे, आणि मराठी साहित्याचेही काय आणि कसे भले होणार? त्याच त्या अंकांचे गिरवलेले तेच ते पाढे पुन्हा पुन्हा ऐकावे लागणार. आणि महत्त्वाचे म्हणजे याच मंडळींची साहित्यव्यवहारावरील सत्ता निरंकुश राहणार. अगदीच मोजकी मंडळी सातत्याने काही प्रयोग करणारी, काही नवे करू पाहणारी, आजचे असे काही सांगणारी. पण, एकंदर अर्थकारण, वितरणव्यवस्था, प्रचारव्यवस्था, वाचकपसंती यांच्याशी त्यांच्या प्रयोगांचा मेळ जुळणे अंमळ कठीणच आणि म्हणूनच दुर्दैवी.

हे सगळे तर थेट अगदी आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांसारखेच झाले. आपल्या भारतीय आणि मराठी मनोवृत्तीस अगदी निकट धरून जाणारे. सोहळे साजरे करणे आपल्याला अतीव प्रिय. ते साजरे करता करता त्यांच्या रूढी कधी होतात, त्याला सोवळ्याओवळ्याचे स्वरूप कधी येते, याचे भान सुटत जाणे हे आपले अगदी व्यवच्छेदक लक्षण. रूढी, परंरपरा पाळणे व पाळायला लावणे हे त्या त्या क्षेत्रातील सत्तास्थानीच्या मंडळींना सोयीचेच. कारण, त्यावर कुणी चटकन प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नाही, त्यापायी कुणी बुद्धी परजत नाही. मग आहे त्या सत्ता कायम राहतात. सन १८७८ मध्ये पुण्यात भरलेले ग्रंथकार संमेलन हे पहिले मराठी साहित्य संमेलन मानले जाते. म्हणजे त्यास १३५ वर्षे झाली. म्हणजे दिवाळी अंकांच्याही आधीपासूनची ही परंपरा. पण न-वाढीचा विकार यासही जडलेला दिसतो. अगदीच बिनसाहित्यिक आणि वाह्यत विषयांवरून होणारे वाद, त्याच त्याच विषयांवरील तेच ते परिसंवाद, निमंत्रितांच्या काव्यसंमेलनात प्रतिष्ठित आणि प्रस्थापित कवींकडून वर्षांनुवर्षे सादर होणाऱ्या त्याच त्या कविता.. अशा धाटणीतून संमेलन नामक संस्था पुढे कशी जाणार?

दिवाळी अंकांची वाढती संख्या आणि साहित्य संमेलनास होणारी लाखोंची गर्दी याबाबतची आकडेवारी मग कुणी प्रश्न विचारणाऱ्याच्या तोंडावर फेकेल. पण आकडेवारी म्हणजे पूर्णसत्य नव्हे, आणि गर्दी म्हणजेच विकासाची शुभखूण नव्हे. साहित्य, संस्कृती यांचा विकास, वाढ यांची मोजमाप करण्याची परिमाणे खूपच निराळी आहेत. ती परिमाणे अतिशय तरलतेने आणि तरतमभाव राखून योजावी लागतात. अन्यथा खोटे निकाल हाती येण्याची भीतीच अधिक. अशा खोटय़ा निकालांचे सोहळे साजरे करताना आपण वावदूकपणे, वरकरणी विजयाचे झेंडे उंचावत असू कदाचित, मात्र सत्यअसत्यास ग्वाही करताना, तेच ते अंक आपण पुन:पुन्हा गिरवीत आहोत, याची खंत मनात दाटून आलेली असेल. अंक असे ज्यांची बेरीजही खुंटलेली आणि गुणाकारही.