अरब देशांनी नाक दाबल्यानंतरच नूपुर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्याबाबत भाजपचे तोंड उघडले. त्याआधी दहा दिवस पक्ष गप्प होता..

अभ्यासाच्या जोरावर उत्तम गुण मिळवणे शक्य असतानाही नको त्या उद्योगात फसणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी भाजपची अवस्था झाल्याचे दिसते. उत्कृष्ट संघटन, राजकीय कथानक रचण्याची आणि कथासूत्र हाती ठेवण्याची हातोटी आणि मुख्य म्हणजे गलितगात्र स्पर्धक या सत्ताधारी भाजपच्या जमेच्या बाजू. त्यांच्या जोरावर सत्ता आणखीही काही काळ राबविण्याचे स्वप्न तो पाहू शकतो. असे असताना वाह्यत वाचावीरांची फौज पदरी बाळगून धार्मिक भावना चेतवून हिंदू संघटनाचा मार्ग त्या पक्षास का पत्करावा लागतो, हे अनाकलनीयच म्हणायचे. कोणा नूपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल या वाचावीरांमुळे सत्ताधारी भाजप आणि त्याहीपेक्षा भारत देश यांची जी नाचक्की झाली ती पाहिल्यावर ही अनाकलनीयता अधिकच खुपते. तार्किकदृष्टय़ा पाहू जाता याचे एक उत्तर ‘त्याचा येळकोट राहीना’ असे असू शकते. हे वर उल्लेखलेल्या विद्यार्थ्यांसारखे. स्वत:च्या बलस्थानाची जाणीव नाही आणि अभ्यासाची खात्री नाही. असा ‘विद्यार्थी’ ज्याप्रमाणे भलत्याच  मार्गाचा अवलंब उत्तीर्ण होण्यासाठी जसा करतो तसे सध्याचा भाजप करू लागला आहे. त्यात परीक्षा कोणती याचेही गांभीर्य या ‘विद्यार्थ्यांस’ नाही. परिणामी इयत्ता चवथीच्या वर्गात असताना वागावे तसे बारावीतही याचे वागणे. असे विद्यार्थी नको ते करताना पकडले गेल्यावर ज्याप्रमाणे शाळा ‘ते आमचे नाहीत’ असे म्हणत खाका वर करते, त्याचप्रमाणे भाजप हे नूपुर आणि नवीन आमचे नाहीत असे म्हणताना दिसतो. जे झाले ते देशाच्या अब्रूचे धिंडवडे काढणारे ठरते. म्हणून त्याचे विच्छेदन व्हायला हवे.

भाजपच्या प्रवक्त्या या नूपुरबाईंचे शाब्दिक झंकार प्रथम कानी आले ते २६ मे या दिवशी. म्हणजे दहा दिवसांपूर्वी. त्यानंतर कानपुरात दंगलींच्या रूपाने त्याचे प्रतिसाद उमटले आणि त्याच्या विधानाची दाहकता लक्षात घेत मुंबईतही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला. केंद्रीय यंत्रणाविरोधात बिगरभाजप राज्यांच्या यंत्रणा यांचे जे शीतयुद्ध सध्या सुरू आहे त्याचा हा परिणाम असे मानले तरी त्यामुळे या नूपुरबाईंच्या शब्दनृत्याचे गांभीर्य कमी होत नाही. पण त्याकडे केंद्राने दुर्लक्ष केले. या अशा वाह्यातपणाबाबत सत्ताधाऱ्यांचे वर्तन कसे असते हे आता कळून चुकले आहे. हा वाह्यातपणा खपून गेला, त्याचे अपेक्षित यश मिळाले तर त्याचा फायदा घ्यायचा आणि प्रकरण उलटले तर आमचा संबंध नाही म्हणत हात झटकायचे. मशिदींवरील भोंग्यांपासून ग्यानवापी मशिदीपर्यंत हे असेच सुरू आहे. त्यात भोंगे वा मशीद यांचे मुद्दे उपस्थित करणाऱ्या राजकीय पोपटांची भाजपस कमतरता नाही. त्यामुळे गाजराच्या पुंगीप्रमाणे हे विषय वाजले तर टाळय़ा वाजवायच्या आणि नाही वाजले तर ते मोडून खायचे असे भाजप करीत आला आहे. या नूपुरबाई वा हे नवीनबाबू यांच्या प्रकरणातही तसेच झाले. या अशा वाचावीरांचे महत्त्व भाजपत अनन्यसाधारण. या नवीनबाबूंच्या पुस्तक प्रकाशनार्थ रा. स्व. संघाच्या कोणा माजी सर्वोच्च पदाधिकाऱ्याने हजेरी लावली होती आणि या नूपुरबाईंच्या ट्विटरी अनुयायांत तर सत्ताधारी भाजपचे कोण पदाधिकारी आहेत, हे पाहिल्यास ते महत्त्व लक्षात येईल.

हा तपशील महत्त्वाचा कारण आता भाजप जरी हे आमचे नाहीत, असे म्हणत असला तरी सत्य तसे नाही. सत्ताधारी भाजपस वाटते तसे ते असते तर दहा दिवसांपूर्वी हा प्रसंग घडल्या घडल्या भाजप तो नाकारता आणि या वाह्यातांना बाहेरचा रस्ता दाखवता. तेवढी प्रगल्भता भाजपने दाखवली नाही. आताही अरब देशांनी नाक दाबेपर्यंत या दोन वाह्यातांबाबत भाजपचे तोंड उघडत नव्हते, हे सत्य आहे. अरब देशांनी या वाह्यातांविरोधात कणखर भूमिका घेतली आणि त्यामुळे थेट संभाव्य विश्वगुरुत्वपदालाच धक्का लागेल हे लक्षात आल्यावर सत्ताधाऱ्यांस जाग आली. याबाबत इजिप्तचे गेमाल अब्दुल नासर यांना सुवेझ कालवा प्रकरणात १९६०च्या दशकात जे जमले नाही ते भाजपच्या या दोन वाक्वीरांनी करून दाखवले असे म्हणता येईल. ते म्हणजे अरब देशांची एकी. इराण आणि सौदी अरेबिया व्हाया कुवेत, संयुक्त अरब अमिराती आदी देशांनी भारताविरोधात खणखणीत भूमिका घेतली. भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्यापर्यंत ही मजल गेल्याने परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा ताठ बाणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिठी मुत्सद्देगिरी या दोहोंवरही पाणी ओतले गेले. त्यात आखाती दौऱ्यावर असलेल्या उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांची मेजवानीही ऐन वेळी रद्द केली गेली. भले कारण सांगताना करोनाचे नाव घेतले गेले असेल, पण यातून जो काही संदेश आणि अब्रू जायची ती गेली.

त्यामुळे या दोन वाचाळवीरांवर भाजपने कारवाई केली. ती करताना देशाच्या धार्मिक इतिहासाचा गौरवपूर्ण उल्लेख तो पक्ष करतो. त्याचे स्वागत. पण ही परंपरा गेल्याच आठवडय़ात ध्यानात येऊन तत्क्षणी कारवाई झाली असती तर ते अधिक कौतुकास्पद ठरले असते. अर्थात तसे होणे नाही. कारण ‘सबका साथ, सबका विकास’ आदी घोषणा देणाऱ्या दस्तुरखुद्द पंतप्रधानांना निवडणुकांत औरंगजेबाचा आधार घेतल्याखेरीज पुढे जाता येत नाही. या धार्मिक इतिहासाचे आणि सहिष्णुतेचे प्रेम भाजपस किती आहे हे विदित आहेच. त्यामुळे या दोहोंवरील कारवाईवर अरब देश संतुष्ट नाहीत. काहींनी तर सरकारने माफी मागावी अशी मागणी केली आहे. वाळवंटातील हा आगडोंब सरकार कसा विझवते हे आता दिसेलच, पण यानिमित्ताने सत्ताधाऱ्यांस जी काही कसरत करावी लागते ती बरीच बोलकी ठरते.

म्हणजे एका बाजूला भारतास असहिष्णू ठरवणारे अरब, पाश्चात्त्य जग आणि दुसरीकडे सरकारवर तोच आरोप करणारे कडवे हिंदूत्ववादी असा हा पेच. हे कडवे हिंदूत्ववादी भाजपवर संतापले आहेत आणि त्यातील काहींना तर काँग्रेस आणि भाजप यांच्यात फरक काय, असा प्रश्न पडला आहे. या कडव्या हिंदूत्ववाद्यांस सदरील कारवाईमुळे आविष्कार स्वातंत्र्याचे स्मरण झाले असून भाजपची कारवाई अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे असे त्यांस वाटते. म्हणून या दोहोंवरील कारवाई त्यांस मान्य नाही. तसेच इस्लामी देशांसमोरील शरणागती पत्करणेही या कडव्या हिंदूत्ववाद्यांस मंजूर नाही. नूपुरबाई आणि नवीनबाबू जे काही बोलले तो त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा भाग होता असे या कडव्या हिंदूरक्षणकर्त्यांचे म्हणणे. त्या सर्वाच्या मते २०१४ पर्यंत देशात अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणाऱ्या पापी काँग्रेसींचे सरकार होते. त्यामुळे हिंदूंस जीव मुठीत घेऊन नाही तरी मान खाली घालून जगावे लागत होते. ही हिंदूंची खाली गेलेली मान २०१४ पासून सरळ झाली. पण इस्लामी जगाची माफी मागितल्यामुळे ती पुन्हा खाली गेली अशी या मंडळींची टीका. जगाच्या आकलनाच्या त्यांच्या आकारानुसार ती रास्तही ठरते. पण नूपुरबाई आणि नवीनबाबूंच्या मुद्दय़ांवर त्यांना पाठिंबा देणे हिंदूहितरक्षक सरकारलाही परवडणारे नाही.

याचे कारण भाजपस देश चालवायचा आहे. धर्मसंघटना नव्हे. निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठी धर्म कामी येत असला तरी सत्ता मिळाली की या धर्मानुयायांस चार हात दूर ठेवावे लागते, हा जगाचा इतिहास आहे. इस्लामचे धर्मकेंद्र असणाऱ्या सौदी अरेबियाचे नेतृत्व हाती आल्यावर महंमद बिन इब्न सौद यास कडव्या इस्लामीभिमान्यांस दूर करावे लागले. पंतप्रधान मोदी यांसही याच वास्तवाची जाणीव नूपुरबाई आणि नवीनबाबूंनी करून दिली. कडे कडेला असलेल्यांस मध्यकेंद्री येऊ दिले की काय होते याचा हा धडा आहे.