अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदग्रहण सोहोळ्यास हजर राहिलेल्यांपेक्षा अनुपस्थित राहिलेल्यांची संख्या लक्षणीय ठरते..

काळ गेल्यानंतरही ‘आपल्याला हवा होता तो बदल हा नाही,’ असे अमेरिकनांना वाटले नाही, तर आनंदच. अंदाज चुकणे हे कधी कधी समाधान देणारे असते. बाकी, ट्रम्प मुसलमानविरोधी आहेत यात आनंद मानावयाचा की त्यांच्यामुळे भारतीय कंपन्यांना नव्या संकटांना तोंड द्यावे लागेल याबाबत काळजी व्यक्त करावयाची या प्रश्नाचे उत्तर ज्याच्या त्याच्या वकुबावर सोडलेले बरे..

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे

एकाही मंत्र्याच्या नेमणुकीस मान्यता नाही, एकंदर करावयाच्या ६६० नेमणुकांतील नामांकने फक्त २९, जवळपास सर्वच बडय़ा कलाकारांनी शपथविधीस हजेरी लावावयास दिलेला नकार, सत्ता हस्तांतर प्रमुखाची आकस्मिक हकालपट्टी आणि जनमतात अनुकूलांपेक्षा प्रतिकूलांचीच संख्या अधिक अशा वातावरणात साऱ्या जगाचे श्वास रोखून धरणारा तो क्षण एकदाचा आला आणि जगातील एकमेव महासत्तेच्या प्रमुखपदी डोनाल्ड ट्रम्प  नावाची प्रवृत्ती विराजमान झाली. त्या आधी बोलताना ट्रम्प यांनी आपण अमेरिकेच्या एकसंधीपणास महत्त्व देणार असल्याचे नमूद केले. त्याची गरज आहे. याचे कारण निवडणूक प्रचार आणि नंतर त्यांनी अमेरिकी समाजात दुभंग तयार व्हावा यासाठी जे काही प्रयत्न केले ते पाहता आता त्यांना या मलमपट्टीची गरज वाटली, हे महत्त्वाचे. त्यानुसार त्यांचे वर्तन राहील अशीच अमेरिकनांची अपेक्षा असावी. सत्ता आल्यास साधारण दीड कोट निर्वासितांना आपण परत पाठवू हे आणि अशी अनेक दुभंगकारी विधाने ट्रम्प यांनी केली होती. त्यांनी आफ्रिकी अमेरिकनांना सोडले नाही, मेक्सिकन्सविषयी ते तितकेच अनुदार होते आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय करारांबाबतही त्यांची मते भीतीदायक होती. तेव्हा आपण अमेरिकेच्या अखंडत्वासाठी प्रयत्न करू असे त्यांना म्हणावेसे वाटले यातच सारे काही आले.  अमेरिकेचे ते ४५ वे अध्यक्ष. त्यांचे हे सत्तारोहण केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर साऱ्या जगासाठी महत्त्वाचे ठरते. जगात सध्या जो दुभंग काळ सुरू आहे त्यावर स्वार होत अमेरिकेत कमालीची दुफळी तयार करीत ट्रम्प सत्तेवर आले. महिलांविषयी अत्यंत अश्लाघ्य विधाने, अपंगांची टिंगल, मुसलमानांना प्रवेशबंदी आणि मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याची अचाट घोषणा अशा अनेक आचरट विधानांमुळे ट्रम्प यांचा निवडणूक प्रचार चांगलाच गाजला. इतका की तो संपल्यास अडीचे महिने होत आले तरी ट्रम्प काही प्रचारकी मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत. शपथ घेण्यास काही तासांचा अवघी असताना ट्रम्प यांनी स्वत:च्या मंत्रिमंडळाविषयी केलेले भाष्य असेच प्रचारकी होते. अमेरिकेच्या इतिहासात झाले नसेल इतके बुद्धिमान आपले मंत्रिमंडळ असेल, असे ट्रम्प म्हणाले. हे त्यांच्या मिजासखोर आणि आढय़ताखोर स्वभावास साजेसेच झाले. सत्ताधीशाच्या स्वभावात मार्दव असावे लागते आणि तो उदार मनाचा असावा लागतो. ट्रम्प यांच्याकडे यातील एकही नाही. गतसप्ताहात त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. त्यात केलेली विधाने त्यांच्या या निवडणूक मानसिकतेचा दाखला देतात. निवडणूक प्रचारात ट्रम्प यांनी माध्यमांना लक्ष केले होते. निवडणूक आल्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हाच परिपाठ सुरू ठेवला. सीएनएन या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीस तुम्ही खोटारडे आहात असे त्यांचे सुनावणे असो वा बीबीसी या वृत्तवाहिनीची त्यांनी केलेली निर्भत्सना असो. ट्रम्प आपली हडेलहप्पी शैली काही सोडावयास तयार नाहीत. परिणामी, जगातील एकमेव महासत्तेचा प्रमुख हा असाच गावंढळासारखा वचावचा करणारा असेल तर त्यास हाताळायचे कसे हा प्रश्न जगातील भल्याभल्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. याचे कारण आपल्या वागण्यात निवडणूकपूर्व आणि निवडणुकोत्तर असा काही बदल करावयाचा असतो हे जगातील अन्य काही नेत्यांप्रमाणे ट्रम्प यांच्या गावीही नाही.

त्याचमुळे त्यांच्या पदग्रहण सोहळ्यास हजर राहिलेल्यांपेक्षा अनुपस्थित राहिलेल्यांची संख्या लक्षणीय ठरते. त्यांचे पूर्वसुरी बराक ओबामा यांच्या राज्यरोहण सोहळ्यास १८ लाखांची उपस्थिती होती. ट्रम्प यांच्यासाठी जेमतेम १० लाखभर लोक जमले. अर्थात पावसानेही ट्रम्प यांच्या या शपथविधी सोहळ्याचा रसभंग केला. ओबामा यांच्या सोहोळ्यात स्कार्लेट जॉन्सन, केटी पेरी, यू २ ग्रूप, बियॉन्स, ब्रूस स्प्रिंग्स्टीन, शकिरा, शेरिल क्रो आदी अनेक कलावंतांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्याआधी बिल क्लिंटन यांच्या शपथविधीसाठी तर बॉब डिलनसारख्याने आपली सक्रिय हजेरी लावली होती. परंतु ट्रम्प यांच्यासाठी या उलट एल्टन जॉन आदींनी हजर राहण्यास नकार दिला. याचे कारण ट्रम्प यांची मागास, असहिष्णु आणि प्रतिगामी मते. ट्रम्प यांचे उपाध्यक्ष माईक पेन्स हे समलिंगी संबंध, गर्भपात वगैरे मुद्दय़ांवर कट्टर कडवी मागास मते बाळगून आहेत. ट्रम्प यांच्या आधीचे रिपब्लिकन अध्यक्ष धाकटे जॉर्ज बुश यांच्या काळात अमेरिकेने असेच मागे वळण घेतले. त्यांचा तर स्कंद पेशी संशोधनासही विरोध होता. ट्रम्प मागासपणाच्याबाबत बुश यांच्यापेक्षा किती पुढे जातात, हे बघावे दिसेल. परंतु स्त्रियांविषयीची त्यांची मते ही निश्चतच आश्वासक नाहीत. त्यांमुळे त्यांच्याविरोधात हॉलिवूडच्या कलाक्षेत्रात दहशत असणे साहजिकच. हॉलिवूडचे अनेक कलाकार ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाजवळच मोठय़ा प्रमाणावर निदर्शने करीत होते. त्यातील काहींच्या हातातील फलक सूचक म्हणावा लागेल. अमेरिकेस फॅसिस्ट बनवू नका, अशा अर्थाची विधाने या फलकांवर होती. हे सर्व ट्रम्प यांच्या गावीही नाही. किंवा असले तरी याची कोणतीही दखल घेण्यास ते तयार नाहीत. तितका मनाचा मोकळेपणा त्यांच्याकडे नाही. ते निवडणूक जिंकल्याच्या मस्तीत मश्गूल दिसतात. त्यामुळेच अध्यक्षपदाची शपथ घेत असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याच्या निवडीवर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. ओबामा यांनी ज्यावेळी सत्ताग्रहण केले त्यावेळी त्यांच्या सात मंत्र्यांच्या नियुक्तीस अंतिम मंजुरी मिळालेली होती. याचे गांभीर्य ट्रम्प यांना कितपत आहे, या बद्दल अनेक जण शंका व्यक्त करत आहेतच. अशा परिस्थितीत ओबामा यांच्या राजवटीतल्याच काही वरिष्ठांना हाताशी धरून त्यांना सरकारी गाडा रेटण्यास सुरुवात करावी लागेल. असो.

ट्रम्प यांची निवड झाल्याने आपल्याकडे केंद्रातील सत्ताधारी समर्थकांस आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. ट्रम्प हे मुसलमानांविरोधात आहेत हेच काय ते एकमेव या आनंदामागील कारण. यास शुद्ध बालिशपणा म्हणावा लागेल. अर्थात या मंडळींकडून यापेक्षा अधिक शहाणपणाची अपेक्षा करणे व्यर्थच. ती पूर्ण होण्याची शक्यता असती तर ट्रम्प यांच्याकडून एच१बी व्हिसा कमी होण्याचे संकट या मंडळींना जाणवले असते. ट्रम्प यांची धोरणे आपल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या मुळावर येणारी आहेत. तेव्हा ते मुसलमानविरोधी आहेत यात आनंद मानावयाचा की त्यांच्यामुळे भारतीय कंपन्यांना नव्या संकटांना तोंड द्यावे लागेल याबाबत काळजी व्यक्त करावयाची या प्रश्नाचे उत्तर ज्याच्या त्याच्या वकुबावर सोडलेले बरे. तेव्हा ट्रम्प आल्यामुळे भारताचे कसे भले होणार आहे वगैरे बाजारगप्पांत पडावयाचे कारण नाही.

अशा तऱ्हेने हा गृहस्थ नक्की काय करू इच्छितो याचे आडाखे बांधण्यातच सारे जग मग्न आहे. ही अवस्था आणखी काही काळ तरी राहील असे दिसते. यावेळच्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकनांना बदल हवा होता. तो झाला. परंतु प्रत्येक बदल हा सकारात्मक असतोच असे नाही, हे कळून येण्यास वेळ जावा लागतो. तो गेल्यानंतर आपल्याला हवा होता तो बदल हा नाही, असे अमेरिकनांना वाटले नाही तर आनंदच. अंदाज चुकणे हे कधी कधी समाधान देणारे असते. ट्रम्प यांच्याबाबत ते तसे असेल. कारण काही अभ्यासकांनी ट्रम्प यांचे रूपांतर एका हुकूमशहात तरी होईल अथवा त्यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची वेळ येईल अशी भाकिते वर्तवली आहेत. जे काय होईल ते होईल. तूर्त तरी ‘आलिया भोगासी, असावे सादर..’ असे म्हणणेच शहाणपणाचे.