महाराष्ट्रात ब्रिटिशांच्या काळात विकसित करण्यात आलेल्या थंड हवेच्या नावाजलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे माथेरान. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पश्चिम घाटातील एक प्रमुख ठिकाण म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाने आता नवनव्या योजना केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे या ठिकाणी कॅसिनो, डिस्को यांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची चिन्हे असून, या निसर्गरम्य ठिकाणी कॅसिनो की पर्यावरणसुसंगत पर्यटन, या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे हे क्षेत्र २००३ साली पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील जाहीर करण्यात आले आहे. त्या दृष्टीने देखरेख करणाऱ्या उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष व्ही. रंगनाथन यांनी या विकासाबाबत सवाल उपस्थित केल्याने या वादात भरच पडणार आहे. कोकण व देशाची विभागणी करणाऱ्या पश्चिम घाटामधील माथेरान हे एक प्रमुख ठिकाण. ते ब्रिटिशांच्या काळात, १८५०च्या आसपास थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्यात आले. तेव्हापासून ते नावारूपाला आले. तिथे चालणाऱ्या छोटय़ा ‘टॉय ट्रेन’मुळे तर त्याचे आकर्षण आणखी वाढले. उन्हाळ्यात थंड हवेसाठी म्हणून पर्यटक तिथे गर्दी करतातच. त्याचबरोबर थंडी आणि पावसाळ्यातही निसर्गाची विविध रूपे पाहण्यासाठी पर्यटक माथेरानला पोहोचतात. तिथले पर्यावरण टिकविण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तिथल्या मध्यवर्ती भागात वाहनांच्या गर्दी-गोंगाटाला परवानगीच नाही. त्याऐवजी पायी, सायकल किंवा घोडागाडी असेच पर्याय वापरावे लागतात. २००३ साली हे क्षेत्र पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर तर आणखीही काही गोष्टींवर र्निबध आले. आता इतर पर्यटन स्थळांकडून वाढलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी, माथेरानचा चेहरा बदलण्यासाठी राज्याचा पर्यटन विभाग पुढे सरसावला आहे. त्यात तिथे चोवीस तास पाणीपुरवठा, रस्त्यांचे रुंदीकरण या गोष्टींचा समावेश आहेच, त्याच्या जोडीने डिस्को, कॅसिनो हेही आणण्याचा विचार आहे. सर्व जगच बदलत असताना स्पर्धा ही आलीच. तशी ती माथेरानसारख्या पर्यटन स्थळालासुद्धा आहे, पण म्हणून या ठिकाणी कॅसिनो किंवा डिस्को या गोष्टी अगदीच विसंगत ठरतात. इतका उत्तम निसर्ग आणि पश्चिम घाटासारखे स्थान लाभलेले असताना माथेरानला कॅसिनो वगैरेंचा समावेश असलेले पर्यटनाचे प्रारूप या विभागाला आणावेसे वाटते, यासाठी त्यांच्या कल्पनाशक्तीची कीव करावी वाटते. हल्ली जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमधून शांतता हद्दपार झाली आहे. त्यामुळे शांतता, निसर्गसान्निध्य या गोष्टी पर्यटकांना हव्या आहेत. माथेरानसारख्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी अनायासे ते असताना आणि त्या गोष्टी विकसित करणे सहजशक्य असताना तिथे भलतेच प्रारूप का वाढवले जात आहे, हा प्रश्नच आहे. काळानुसार बदलायला हवे आणि काळासोबत चालायलाही हवे, पण याचा अर्थ पर्यटन स्थळाच्या बलस्थानांचा विचार न करता काहीही स्वीकारायचे असा होत नाही. माथेरानला तेच घडताना दिसत आहे. त्यामुळे तिथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल की नाही हे सांगता येत नाही. मात्र हे ठिकाण आपली ओळख हरवून बसेल, हे निश्चित!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvayarth
First published on: 30-11-2012 at 12:08 IST