काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना, म्हणजे अर्थातच सोनिया आणि राहुल गांधी या दोघांना नेमका सल्ला कोण देतो हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय आहे. देशभरातील तमाम काँग्रेसजन तर ते जाणून घेण्यास नक्कीच उत्सुक असतील. याचे कारण म्हणजे या पक्षश्रेष्ठींनी – म्हणजे खरे तर राहुल गांधी यांनी – काही निर्णय घ्यावेत, काही घोषणा कराव्यात, काही वक्तव्ये करावीत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना हसावे की रडावे हेच कळेनासे व्हावे असे अलीकडे वारंवार होत आहे. तेव्हा हे असे करण्याचा सल्ला त्यांना कोण बरे देत असावे, हा त्यांच्यासाठी नक्कीच लाखमोलाचा प्रश्न असेल. परवा कर्नाटकातून काँग्रेसने नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही अनेकांना हाच प्रश्न पडला असेल, की यातून काँग्रेसला नेमके साधायचे तरी काय आहे? यात आक्षेप नॅशनल हेराल्ड सुरू होण्याला नाही. पं. जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिश साम्राज्यशहांना विरोध करण्यासाठी १९३८ मध्ये सुरू केलेले हे काँग्रेसचे मुखपत्र. ते सुरू होऊन चांगले चालणार असेल, तर त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मुद्दा नेमका हाच आहे. ते चालणार आहे का? काँग्रेसची सत्ता असतानाच्या आणि काँग्रेसबद्दल अजून सर्वसामान्य मतदारांच्या मनात सहानुभूती असण्याच्या काळात, ते वारंवार बंद पडून सुरू केले जात होते. २००८ला त्याने शेवटचा आचका दिला. मुखपत्रांचे हे भागधेयच म्हणावयाचे. किमान भारतीय लोकशाहीत स्वातंत्र्योत्तर काळात तरी अशा मुखपत्रांना फारशी लोकप्रियता मिळालेली नाही. वाचकांची वैचारिक भूक ही नेहमीच पक्षीय प्रोपगंडापलीकडे राहिली. आजही हेच दिसते. भाजपची सत्ता आली म्हणून लगेच संघवादी पांचजन्य फुंकणाऱ्या पत्रांचा खप प्रचंड वाढला असे झालेले नाही. शिवसेनेचे मुखपत्रही एका विशिष्ट वर्गातच नेहमी रेंगाळत राहिले. राजकीय नेत्यांनी आपल्या पत्राचा वापर स्वत:च्या घरातील बारशापासून लग्नसोहळ्यांपर्यंतची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यासाठी केल्यानंतर वाचकांनी त्यावर नकाराचाच प्रहार केल्याचे दिसले. माध्यमांनी कोणाची तरी तळी उचलून प्रचाराचा भंडारा उधळू नये, असे आजही अनेक वाचकांना वाटते. हाच याचा अर्थ. तो लक्षात न घेता काँग्रेसने आपले रसातळाला गेलेले मुखपत्र सुरू करण्याचा निर्णय घ्यावा हे त्यांच्या निर्णयप्रक्रियेला साजेसेच झाले. परंतु मग हे निदान दैनिक म्हणून तरी असावे. तर ते तसे नाही. आजच्या ‘फटाफट’ बातम्यांच्या काळात काँग्रेसचे हे मुखपत्र आठवडय़ातून दोनदा प्रकाशित केले जाणार आहे. तेव्हा त्याची गत ‘येथे छापून येथे प्रकाशित केले व येथेच वाचले’ अशी होण्याचीच शक्यता जास्त. काही दिवसांपासून या पत्राची ऑनलाइन आवृत्ती, तीही दररोज, प्रसिद्ध करण्यात येत आहे. परंतु तिलाही वाचकांनी डोक्यावर घेतले असे झालेले नाही. याचा अर्थ आजच्या माहितीयुगाच्या गरजांना कवेत घेणारे, नव्या वाचकवर्गाच्या आशा-आकांक्षा आणि अपेक्षांना समजून घेणारे असे काही असेल तरच त्याला माध्यमविश्वात उभे राहता येते. तेथे नॅशनल हेराल्ड कमी पडले आणि आता त्याचे प्रकाशन पुन्हा सुरू करण्यात येत आहे. तेव्हा यामागे नॅशनल हेराल्डचा खटला तर कारणीभूत नाही ना, अशी शंकाही घेतली जात आहे. दैनिक बंद पडल्यानंतर त्याच्या नावाने गांधी कुटुंबाने भूखंड बळकावल्याचा आरोप आहे. मुंबईतील भूखंडांचे भिजत घोंगडे मात्र कायम आहे. तर दैनिक बंद केल्याच्या आरोपातून निदान यामुळे सुटका होईल, असा काँग्रेसश्रेष्ठींचा होरा असावा. तो खरा ठरेल अशी शक्यता नाही. मग यातून नेमके साधणार तरी काय आहे? काँग्रेसजनांना आज जे हसावे की रडावे असे वाटते आहे ते या प्रश्नामुळेच..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Congress started national herald
First published on: 14-06-2017 at 01:43 IST