मार्क झकरबर्ग, अ‍ॅपलचा स्टीव जॉब्स, अ‍ॅमेझॉनवाला जेफ बेझोस . अशी अनेक नावं यात घेता येतील.
जे आतापर्यंत कधीच नव्हतं ते या मंडळींनी करून दाखवलं.
जे केलं ते अफाट आहे. आणि तरीही ही मंडळी म्हणतात जे काही झालं ते श्रेय एकटय़ा दुकटय़ाचं नाही.

काल-परवा मार्क झकरबर्ग आपल्याकडे येऊन गेला. फेसबुक काढण्याची कल्पना त्याची. त्यामुळे अर्थातच तो तरुणांच्या गळ्यातला ताईत वगरे. त्याला विचारले गेलेले प्रश्नही त्याच संदर्भातले. त्यावर बोलताना तो म्हणाला.. फेसबुकचं श्रेय हे माझं एकटय़ाचं नाही.. फेसबुक, अ‍ॅपलसारखं जेव्हा काही घडतं तेव्हा ते एकटय़ा-दुकटय़ाचं नसतं.
त्याच दिवशी अ‍ॅपलच्या विक्रमी फायद्याची बातमी आली. न भूतो न भविष्यती इतका रग्गड नफा या कंपनीनं कमावलाय. त्या कंपनीच्या कामाचा आणि त्यामुळे आकाराचा आवाका किती आहे, ते एकदा समजून घ्यायलाच हवं.
तर अ‍ॅपलचा वट्ट नफा आहे तब्बल ५३०० कोटी डॉलर इतका. याचा अर्थ ही कंपनी एका आठवडय़ाला १०० कोटी डॉलर..म्हणजे साधारण ६५०० कोटी रुपये.. इतका नफा गेले वर्षभर कमवतीये. तरीही त्याही वर अ‍ॅपलनं १०० कोटी डॉलर कमावलेत. याचाच दुसरा.. आणि तितकाच खरा.. अर्थ असा की एका सेकंदाला १६९३.११ डॉलर इतकी कंपनीची कमाई आहे. म्हणजे हा लेख वाचायला समजा एखाद्याला १० मिनिटं लागली तर तेवढय़ा वेळात १०,१५,८६६ इतके डॉलर त्या कंपनीच्या खिशात गेले असतील.
या अवाढव्य आकाराचा अर्थ काय?
या कंपनीची मार्केट कॅप ७५,००० कोटी डॉलरपेक्षाही अधिक आहे. तर जगात केवळ २३ इतकेच देश असे आहेत की, ज्यांची अर्थव्यवस्था अ‍ॅपलच्या आकाराशी स्पर्धा करू शकेल. म्हणजे उर्वरित १७३ देशांची अर्थव्यवस्था अ‍ॅपलपेक्षा लहान आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा तब्बल २० टक्के वाटा एकटय़ा अ‍ॅपलकडून येऊ शकेल. भारतातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. अ‍ॅपल ही रिलायन्सपेक्षा आकाराने २७ पट मोठी आहे. अ‍ॅपलचा एका तिमाहीतला फायदा १८०० कोटी डॉलर. भारतातल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधल्या पहिल्या ५० कंपन्या घेतल्या तर या कंपन्यांच्या एकत्रित वार्षकि नफ्यापेक्षाही अधिक अ‍ॅपलचा फक्त तिमाही नफा आहे. आपल्याकडच्या सगळ्यात मोठय़ा कंपन्यांचा नफा जेमतेम १०० कोटी डॉलर इतकाच आहे. म्हणजे आपल्या मोठय़ा कंपन्यांच्या वार्षकि नफ्याच्या किती तरी पट अ‍ॅपलचा फक्त तिमाही नफा आहे. अर्थातच अ‍ॅपलच्या या इतक्या प्रचंड नफ्यामुळे कंपनीच्या हाती केवळ रोकड पडून आहे. ती आहे २०,००० कोटी डॉलर इतकी प्रचंड. म्हणजे ही रक्कम म्हणजे आजचा गल्ला आहे. ही रक्कम खर्च करून अ‍ॅपलनं समजा कंपन्याच विकत घ्यायचं ठरवलं तर या रकमेतून अख्खी आयबीएम, अख्खी इन्टेल आणि अख्खी आपली टीसीएस या कंपन्या अ‍ॅपलला विकत घेता येतील आणि तरीही वर काही चिल्लर शिल्लक राहील.
या फायद्यातला सगळ्यात मोठा वाटा येतोय तो अर्थातच आयफोन्समधून. हे फोन्स हे अ‍ॅपलचं इंजिन आहेत. अ‍ॅपलनं एका तिमाहीत फक्त विकल्या गेलेल्या आयफोन्सची संख्या आहे ४ कोटी ८० लाख इतकी. गेल्या वर्षी याच तिमाहीत अ‍ॅपलला ३ कोटी ९० लाख इतके आयफोन्स विकता आले होते. म्हणजे या कंपनीच्या एका तिमाहीपुरत्या विकल्या जाणाऱ्या फोन्समध्ये तब्बल एक कोटींनी वाढ झालेली आहे. या कंपनीच्या टीकाकारांच्या मते नव्यानं बाजारात आणलेलं आयवॉच तितकं काही चांगलं नाही, त्याला इतकी मागणी नाही. काही प्रमाणात ते खरं असेलही. पण तरीही केवळ आयवॉचच्या विक्रीतून कंपनीनं ३०० कोटी डॉलर कमावलेत. आता काय करायचं या आकाराचं?
खुद्द कंपनीलाही हा प्रश्न पडला असावा. कारण पुढच्या काळात आपली वाढ इतकी तेज नसेल असा इशारा कंपनीनंच दिलाय. चीनची मंदावलेली अर्थव्यवस्था हे त्याचं कारण आहे. तो दिल्यामुळे चीनबाबतही आपल्या जाणिवा जरा अधिक स्पष्ट होतील. आपल्या भारतीय अशा टाटा समूहाकडे मालकी असलेल्या जग्वार लॅण्ड रोव्हर.. म्हणजे जेएलआर.. या कंपनीसाठी आगामी काळ आव्हानाचा आहे. कारण चीन मंदावतोय म्हणून. या कंपनीची सगळ्यात मोठी बाजारपेठ चीन आहे. तेव्हा त्याची गती मंदावली तर तीवर आधारित सगळ्यांनाच फरक पडणार. म्हणजे अ‍ॅपल ते आपली जेएलआर इतक्या मोठय़ा पसाऱ्यातल्या कंपन्यांना फरक पडणार तो फक्त चीनमुळे. असो. अर्थात तरीही नवनव्या उत्पादनांमुळे हे नुकसान अन्यत्र भरून काढलं जाईल, असा अ‍ॅपलला विश्वास आहे.
अ‍ॅपलच्या या भव्यदिव्य यशामुळं जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक बाब घडली. ती म्हणजे पेट्रोलियम कंपनीवर पहिल्यांदाच एखाद्या अशा आधुनिक उत्पादनाच्या निर्मात्यानं मात केली. इतके दिवस.. म्हणजे गेल्या वर्षअखेरीपर्यंत एक्झॉन मोबिल ही जगातली क्रमांक एकची कंपनी होती. ती कमवत असलेला नफा हा असा इतका अगडबंब होता. त्या कंपनीची ताकद इतकी होती की, सरकारं त्या कंपनीच्या तालावर नाचायची. ही कंपनी रॉक्फेलर या आद्य उद्योगसम्राटाच्या स्टॅण्डर्ड ऑइल या कंपनीच्या परिवारातली. सगळा परिवारच तो बडय़ा कंपन्यांचा. सगळ्याच्या सगळ्या एकजात मोठय़ा झाल्या. असो. मुद्दा तो नाही.
तर पहिल्यांदाच एखाद्या तंत्रज्ञान कंपनीनं तेल कंपनीला कसं मागे टाकलं हा आहे. या दोन अव्वल नंबरी कंपन्यांतला फरक म्हणजे तेल कंपनीच्या आगेमागे खूप राजकारण चिकटलं. आणि अजूनही चिकटतं. कारण तेल हा विषयच मुळी राजकारणाचा आहे. आणि फक्त तेलच नाही. तर जे जे खनिजाच्या रूपातनं निघतं.. मग ते तांबं असेल, पोलाद, बॉक्साइट किंवा तेलही असेल.. त्यांचं व्यावसायिकीकरण हे राजकीयच होतं. आपल्याकडचं बघा. आपण काही तेल वा पोलाद वा तांबं वा बॉक्साइट आदी खनिजांच्या उत्पादनात जागतिक कंपन्यांइतके मोठे नाही. तरीही आपल्याकडेही राजकीय वादात सापडतात त्या तेल आणि अन्य खनिज कंपन्याच. या आणि अशा कंपन्यांच्या नफ्याला त्यामुळे एका अर्थानं राजकीय दरुगधी असते. अशा बडय़ा तेल कंपनीला मागे टाकून अ‍ॅपलनं मुसंडी मारली त्यामागचा मोठेपणा आहे तो हा.
ही माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार क्षेत्रातली कंपनी. या क्षेत्रातली उत्पादनं एका अर्थानं निर्गुण, निराकार असतात. म्हणजे उत्पादनाआधी ती केवळ संकल्पना असतात. खनिजांचं तसं नाही. ती दिसतात, त्यांना स्पर्श करता येतो. त्यांच्याकडून काय होणार आहे, त्यांचा उपयोग काय, हे सगळं अगदी सामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तीलाही कळू शकतं. पण संकल्पनांचं तसं नाही. या संकल्पना मूर्त स्वरूपात साकारल्या गेल्या तर नक्की काय होणार आहे हे फक्त द्रष्टय़ांनाच समजू शकतं.
मार्क झकरबर्ग, अ‍ॅमेझॉनवाला जेफ बेझोस, अ‍ॅपलचा स्टीव्ह जॉब्स हे खूप मोठे ठरतात ते यामुळे. अशी अनेक नावं यात घेता येतील. जे आतापर्यंत कधीच नव्हतं ते या मंडळींनी करून दाखवलं. जे केलं ते अफाट आहे. आणि तरीही ही मंडळी म्हणतात जे काही झालं ते श्रेय एकटय़ा-दुकटय़ाचं नाही. सर्वोच्च पदावर पोहोचूनही मार्क झकरबर्ग बारा महिने चौदा काळ साध्या करडय़ा रंगाचा टीशर्ट आणि जीनची पॅण्ट अशा वेशात असतो. परवा आपल्याकडे येऊन गेला तेव्हाही तो तसाच होता. स्टीव्ह जॉबही तसाच. काळा पुलओव्हर आणि जीनची पॅण्ट. स्टीव्हनंतर कंपनीची सूत्रं ज्याच्या हाती गेली तो टिम कुक हा देखील तसाच. काळा शर्ट आणि जीनची पाटलोण.
झकरबर्ग काय किंवा जॉब्स काय. त्यांनी जे काही केलं त्याचं अनुकरण केलं.. करता आलं तर फारच उत्तम. पण इतकं प्रचंड, गगनाला हात लागेल असं काम केल्यानंतरही त्यांचे प्रवर्तक, उद्गाते यांचे पाय जमिनीवर राहतात तरी कसे.. हे आपल्याला कळायला हवं. एरवी एखाद-दुसरा कशीबशी जेमतेम एक पिढी टिकणारा कुटीरोद्योग चालवून जन्मभरासाठी उद्योगपती असं बिरुद मिरवणारे आपण आसपास पाहत असतोच की.

Worli sea face
मुंबईतील सी व्ह्यू घराची किंमत किती असेल? प्रसिद्ध उद्योगपतीने घेतला ‘इतक्या’ कोटींचा फ्लॅट; स्टॅम्प ड्युटीच भरला ५ कोटींचा!
Hero Xoom Combat Edition
आता Activa, Jupiter टिकणार नाय? हिरोची सर्वात महागडी स्कूटर देशात दाखल, किंमत…
RBI
कोटक महिंद्र बँकेला विमा कंपनीतील हिस्सा झुरिच इन्शुरन्सला विकण्यास रिझर्व्ह बँकेची मंजुरी
Vishal kampani is the managing director and non-executive chairman of JM Financial Limited
बाजारातली माणसं : हितकर घराणेशाही- विशाल कम्पानी
Elecon Engineering, portfolio Elecon Engineering, Elecon Engineering company, elecon engineering company limited, stock market, share market, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रचंड क्षमता, मजबूत कार्यादेश!
aditya birla housing Finance target to double its business growth
आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचे दुपटीने व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट
Jio and airtel annual mobile prepaid plan unlimited internet OTT benefits and More Users Can Check Out List
Jio vs Airtel: हायस्पीड डेटा, मोफत सबस्क्रिप्शन अन् बरंच काही… पाहा कंपनीच्या नवीन प्लॅन्सची ‘ही’ यादी
harold brown
चिप-चरित्र: नवसंजीवनीच्या शोधात अमेरिकी चिप-उद्योग

 

girish.kuber@expressindia.com
tweeter@girishkuber