आतापर्यंतच्या आपल्या चिंतनानुसार मुक्ती म्हणजे व्यापकता, हे आपण पाहिलं. तेव्हा माणसाच्या जन्माचा खरा लाभ परमात्म्याशी ऐक्य साधणं, मुक्ती साधणं, हा आहे, या वाक्याचा मथितार्थ पाहू. परमात्मा हा सर्वत्र, सर्वज्ञ आहे याचाच अर्थ तो सर्वव्यापक आहे. त्याचाच अंश असलेला जीव हा स्वतची वेगळी सत्ता निर्माण करून ती जपू पाहात आहे, ती सत्ता संकुचित आहे, नश्वर आहे, कधी ना कधी संपणारी आहे. अशा नश्वर, क्षणभंगूर, संकुचित सत्तेलाच सर्वोच्च मानून त्यासाठीच जगणारा जीव म्हणूनच दुख भोगत आहे. मानवी जन्माचा खरा लाभ परमात्म्याशी ऐक्य साधणं हाच आहे, या वाक्याचा अर्थ असा की संकुचित, ‘मी’ केंद्रित जगणं सुटावं आणि ते व्यापक व्हावं. आता जो संकुचित ‘मी’पणात जखडला आहे, स्वार्थकेंद्रित जगण्यात अडकला आहे तो एकाएकी व्यापक होणं शक्य नाही. आपल्याला परमात्म्याशी ऐक्य साधायचं असेल तर आपलं सगळं जगणं हे हळुहळू भगवंतकेंद्रित व्हायला हवं. त्यासाठी अंतरंगात तसा निश्चय हवा आणि बाह्य़ जगाशी व्यवहार करतानाही त्या ध्येयाचं, त्या निश्चयाचं भान जपायला हवं. हे साधणंदेखील सोपं नाही. कारण दुनियेत वावरताना दुनियेचा प्रभाव आपल्या मनावर पडत असतो. लाभ-हानी, सुख-दुखाबाबत दुनियेची व्याख्या वेगळीच असते. बरं, दुनियेची संगत सोडताही येत नाही. त्यामुळे दुनियेत राहात असतानाच भगवंतकेंद्रित जगणं साधायचं तर जो असा दुनियेत वावरत असतानाच परमात्मरसात सदोदित निमग्न आहे, अशाची संगत मला लाभली पाहिजे. ही संगत लाभली तर परमात्म्यावर भार सोपवणं म्हणजे काय, आपली कर्तव्यर्कम चोख बजावताना परमात्म्यावर भार सोपवून निश्िंचत कसं राहाता येतं, हे आपल्या मनावर आपोआप बिंबत जाईल. मात्र जो दुनियादारीत निमग्न आहे, स्थूल भौतिक व्यापातच दिवसरात्रं ज्याचं मन अडकलं आहे त्याची संगत मला ही निश्चिंती, परमात्म्याशी ऐक्य साधण्याची युक्ती शिकवू शकणार नाही. कबीरांचा एक दोहा आहे, ‘‘बंधे को बंधा मिलै, छूटै कौन उपाय। कर संगति निरबंध की, पल में लेइ छुडाय।।’’ एखादा माणूस दोरखंडानं जखडला आहे आणि त्याला त्या बंधनातून सुटका करून घ्यायची आहे. त्यासाठी तो दुसऱ्या माणसाकडे गेला तर तो बिचारा त्याहून अधिक जाडजूड दोरखंडांनी जखडला आहे. मग जो स्वतच बांधला गेला आहे तो बंधनात अडकलेल्याला काय सोडविणार? तथाकथित बाबाबुवा हे आपापल्या पदप्रतिष्ठेत, आपापल्या आध्यात्मिक प्रसिद्धीच्या मोहात जखडले आहेत ते बंधनात अडकलेल्या मला काय सोडविणार? जो स्वत: बंधनरहित आहे तोच मला क्षणार्धात सोडवू शकतो! तेव्हा बंधनरहित जो आहे तो मुक्त आहे. तोच मला मुक्त करू शकतो. जो स्वत: संकुचित आहे, तो मला व्यापक करू शकत नाही. जो व्यापक आहे, परमात्मरसात निमग्न आहे तोच मला व्यापकत्वाची शिकवण देऊ शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २५४. संगति
आतापर्यंतच्या आपल्या चिंतनानुसार मुक्ती म्हणजे व्यापकता, हे आपण पाहिलं. तेव्हा माणसाच्या जन्माचा खरा लाभ परमात्म्याशी ऐक्य साधणं, मुक्ती साधणं, हा आहे, या वाक्याचा मथितार्थ पाहू. परमात्मा हा सर्वत्र, सर्वज्ञ आहे याचाच अर्थ तो सर्वव्यापक आहे.
First published on: 20-11-2012 at 06:00 IST
मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arupache rup satya margadarshak 254 togather