अमेरिका व पश्चिम युरोपमध्ये स्वतच्या मोटारीने दीर्घ प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी रात्रीच्या वेळी मुक्काम करण्याच्या दृष्टीने या मुख्य रस्त्यांच्या कडेला नवी कामचलाऊ हॉटेले १९५०-६० च्या दशकांत गरजेची वाटू लागली. ‘मोटेल’ ही अशीच एक नव्या प्रकारची हॉटेल व्यवस्था त्यातून उदयास आली. मोटारवाल्यांसाठी हॉटेल म्हणजेच मोटेल, अशी ही संकल्पना. मुक्कामासाठी अनेक खोल्या असलेली एक मुख्य इमारत व तिच्या आवारात गाडय़ांसाठी पार्किंग अशी या मोटेलची साधारणपणे रचना असते. मोटेलविषयी हे सगळे अनेकांना माहीत असेलही, तसेच अल्फ्रेड हिचकॉकचा ‘सायको’ हा सिनेमाही अनेकांनी पाहिला असेल, ज्याच्या कथानकात मोटेलमधील जग हा महत्त्वाचा भाग आहे. किंवा मोटेलच्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या कादंबऱ्याही अनेकांनी वाचलेल्या असतील. पण मुद्दा तो नाही. मोटेलविषयी हे सगळे सांगण्याचे कारण हे की नुकतेच मोटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘न्यू जर्नालिझम’ किंवा ‘क्रिएटिव्ह नॉनफिक्शन’ या लेखन चळवळीतील महत्त्वाचे नाव असणाऱ्या गे तालीज या लेखकाचे ‘द व्हॉयर्स मोटेल’ हे पुस्तक प्रकाशनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

‘क्रिएटिव्ह नॉनफिक्शन’ हा साहित्यप्रकारात लेखनामागची नैतिकता व लेखनातील अचुकतेला फारच महत्त्व. परंतु प्रस्तुत ‘द व्हॉयर्स मोटेल’मध्ये याचीच कमतरता असल्याने ते वादग्रस्त बनले आहे. या नव्या वाद-नाटकात तीन मुख्य पात्रं आहेत. एक खुद्द लेखक गे तालीज, दुसरे पात्र गेराल्ड फूस तर तिसरे पात्र म्हणजे या फूसच्या मालकीचे असणारे ‘मनॉर हाऊस’ हे मोटेल. हे मोटेल १९६०च्या दशकात फूसने विकत घेतले. पण तो आणि त्याचे हे मोटेल तालीजच्या पुस्तकाचा भाग होण्याचे कारण म्हणजे फूसने त्याच्या मोटेलमधील निवासी खोल्यांच्या वर बनवलेली एक गुप्त मार्गिका. या गुप्त मार्गिकेतून फूस या खोल्यांमध्ये मुक्कामाला राहणाऱ्यांचे खासगी क्षण पाहून विकृत नेत्रसुख घ्यायचा. १९७०च्या दशकात त्याने अनेकांची अशी गुप्त निरीक्षणे केली आणि जे जे दिसले ते त्याने त्याच्या रोजनिशीत टिपूनही ठेवले. त्याच्या या सवयीबद्दल त्याच्या ओळखीतल्या अनेकांना माहीत होते. तसे त्याने ते कोणापासून सहसा लपवले नसल्याचेही त्याचे म्हणणे आहे; परंतु पुस्तकातील ज्या तपशिलाबद्दल फूस याचा आक्षेप आहे तो म्हणजे १९८४ मध्ये मनॉर हाऊसमध्ये झालेल्या एका खुनाबद्दल तालीजने दिलेली माहिती. ही माहिती खरी नसून तालीजने त्यात आपल्या मनाचा काही भाग घुसडला असल्याचा आरोप फूसने त्याच्यावर केला आहे. आपण हे मोटेल १९८० मध्येच विकले होते आणि १९८८ मध्ये पुन्हा ते खरेदी केले होते, त्यामुळे १९८४ मध्ये झालेल्या खुनाचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचा युक्तिवाद फूसने केला आहे. आता या आरोपानंतर तालीजने आपण या पुस्तकात दिलेली माहिती संपूर्णपणे खरी असून, जर या माहितीवरच प्रश्नचिन्ह उठवले जाणार असल्यास आपण या पुस्तकाचा पुरस्कार करणार नसल्याचे त्याने जाहीर केले आहे.

स्टीव्हन स्पीलबर्ग व सॅम मेंडीस या प्रतिभावान दिग्दर्शकांनी काही दिवसांपूर्वीच या कथेचे हक्क विकत घेतल्याने आधीच या पुस्तकाबद्दल वाचकांमध्ये उत्सुकता असताना आता या वादामुळे १२ जुलैला होणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित होणार की नाही किंवा हा वाद एका प्रचारतंत्राचाच निव्वळ भाग होता का हे काहीच दिवसांत कळेल, एवढे तरी नक्की.