‘बुकबातमी’ हे सदर कधीकधी प्रकटतं, आणि तेही नव्या पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल सांगण्यासारखं काही असेल तरच. पण पुस्तकांबद्दलच्या बातम्या अन्यत्रही येतच असतात. या बातम्या किती खऱ्या आहेत, असा प्रश्न (पुन्हा, पण अधिक तीव्रतेनं) पडावा, असं एक पुस्तक आपल्या देशात येत्या १६ सप्टेंबरला येत आहे! त्या निमित्तानं आजची बुकबातमी, पुस्तकांआधारे दिल्या जाणाऱ्या बातम्यांबद्दलच..
या बातम्या बहुतेकदा राजकारणी लोकांनी सत्तापद गमावल्यावर किंवा बडय़ा अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये कसा गौप्यस्फोट आहे, हेच सांगणाऱ्या असतात. क्वचित एखादी बातमी दिवंगत नेत्यांच्या चरित्रावर कसा वेगळा प्रकाश अमक्या पुस्तकानं टाकला आहे, वगैरे भलामण करणारी असते. बातमी जितकी रंजक किंवा रोमांचक वाटते, तसं काही पुस्तक वाचून होत नाही. सत्तापालटाच्या काळात भारतानं अशी कैक पुस्तकं पाहिली आहेत, पुस्तकं बातम्यांतून जशी भासत होती तशी ती प्रत्यक्षात नव्हतीच, हेही परीक्षणांमधून उघड झालेलं आहे. ‘द रेड सारी’ किंवा ‘काश्मीर द वाजपेयी इयर्स’ यांसारखी पुस्तकं फारतर किस्सेबाज आहेत, हे ‘बुकमार्क’ पानावरल्या परीक्षणांतूनही उघड झालं होतं. संजय बारू यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचं वस्त्रहरण करण्याच्या थाटात लिहिल्यासारखं बातम्यांमधून भासलेलं पुस्तक अखेर फुसकंच निघालं, हेही मराठीत ‘बुकमार्क’नं सांगितलं आहे.
पाकिस्तानचे माजी (२००२ -२००७) पररराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दलच्या बातम्यांची गत आणखीच निराळी होणार आहे. भारतात हे पुस्तक १६ सप्टेंबरपासून मिळू लागेल. ‘पेंग्विन इंडिया’ सारखं तगडं प्रकाशनगृह त्यामागे आहे. पण पाकिस्तानात ते आधीच प्रकाशित झालं आहे आणि त्यातल्या मोजका तपशील पाकिस्तान्यांना फार आवडेल, अशा बेतानं तिथल्या प्रसारमाध्यमांनी बातमी म्हणून दिलेला आहे.
अर्थात, कसुरी यांचं हे पुस्तक येणार असल्याच्या बातम्या जानेवारी २०१५ मध्ये भारतीय प्रसारमाध्यमांनीही दिल्या होत्या. इंडिया टुडे किंवा अन्य तत्सम संकेतस्थळांवर आजही वाचता येणाऱ्या त्या बातम्या आता अगदीच ‘पब्लिसिटी नोट’ सारख्या वाटतात. या पुस्तकात काहीतरी बातमी असणार, याचा मागमूसदेखील त्या प्रसिद्धीनोंदींमध्ये नाही. पुस्तक नुकतं छापखान्यात गेलेलं असताना दिलेल्या या बातम्या इतक्या वरवरच्या होत्या की, ‘पुढील महिन्यात याची भारतीय आवृत्ती उपलब्ध होणार’ असंही त्यांत होतं. बहुधा इतक्या कमी माहितीमुळेच, त्या बातम्या सरळसोट- असं असं पुस्तक येतंय, त्यात काश्मीरप्रश्नाचा तसंच अन्य विषयांचा आढावा आहे, अशा भाषेतल्या होत्या.
याउलट पंधरवडय़ापूर्वी, ३१ ऑगस्ट रोजी पाकिस्तानातल्या ‘द न्यूज’ या इंग्रजी दैनिकानं दिलेली बातमी. ‘भारत पाकिस्तानातील मुरीदके येथे हल्ला करणार होता’ असा मथळा. ही बातमी नंतर काही भारतीय दैनिकांनीही दिली, पण जरा सौम्यपणे. मूळ पाकिस्तानी दैनिकातल्या बातमीचा पहिला परिच्छेद असं भासवतो की, २६ नोव्हेंबरच्या मुंबई-हल्ल्यानंतर ‘जमात उद्- दावा’ या पाकप्रणीत दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयावर भारत हल्ला करणारच होता आणि या योजनेला अमेरिकेचा पाठिंबा होता. हे मुख्यालय मुरीदके येथे आहे. हीच बातमी पुढे वाचली, तर या मथळय़ाचा फोलपणा लक्षात येतोच. पण त्याआधी जरा २००८ सालच्या भारतीय बातम्या चाळून पाहिल्या, तरीही ‘द न्यूज’ची सनसनाटी उघडी पडते. भारताची योजना म्हणून जी सांगितली जाते आहे, ती भारताच्या राजकीय नेत्यांकडून झालेली मागणी होती. राजनैतिक किंवा संरक्षण खात्याशी संबंधित कोणीही तसं काहीही म्हटलं नव्हतं. खुद्द कसुरी यांनीदेखील, गोपनीय कागदपत्रं किंवा पाकिस्ताननं भारतातून मिळवलेली पक्की माहिती असा काहीही आधार याला दिलेला नाही. कसुरी म्हणतात की, चहा पितापिता अमेरिकी उच्चपदस्थ शिष्टमंडळाशी इस्लामाबादेत अनौपचारिक चर्चा करत होतो तेव्हा मला हे समजलं. या शिष्टमंडळात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, अमेरिकी गुप्तचर विभागांबाबतच्या सिनेट समितीचे प्रमुख अशी मंडळी होती, याचा तपशील कसुरी देतात. ‘भारतानं समजा हे केलं, तर?’ असा प्रश्न मला विचारण्यात आला तेव्हा मी हादरलोच, असंही म्हणतात.
यात मेख अशी की, कसुरी हे २००८ साली पररराष्ट्रमंत्री नव्हतेच. त्या वेळी ते ‘शांततावादी कार्यकर्ता’ म्हणून स्वतची प्रतिमा सांभाळण्याच्या प्रयत्नाात होते! अशा माणसापुढे काही संभाव्य धोके रंगवून सांगणं यात कुठलाही औचित्यभंग नव्हता. ‘योजना समजली.. हादरलो’ वगैरे नाटय़पूर्णता आणण्यासाठी ठीक आहे. ‘आम्ही नाही, भारतच युद्धखोर’ ही पाकिस्तानची आवडती प्रचारभूमिका पुढे नेण्याच्या पद्धतीनंच हा किस्सा कसुरींनी पुस्तकात सांगितला असावा, असं ‘द न्यूज’च्या बातमीवर विश्वास ठेवला तरीही लक्षात येईलच.
भारतात या पुस्तकाला कसा प्रतिसाद मिळेल, हा आणखी निराळा भाग. पण पुस्तक भारतात येण्याआधीच एक गोष्ट चांगली झाली आहे, ती म्हणजे हे पुस्तक असल्या बातम्या वगळता कसं असेल, याची कल्पना देणारा लेखच ‘इंडियन एक्स्प्रेस’नं ११ सप्टेंबरच्या अंकात छापला आहे. ‘न्यूजवीक पाकिस्तान’चे सल्लागार संपादक खालिद अहमद यांनी लिहिलेल्या या लेखानं, कसुरी यांची ‘मी जहालही नव्हतो, मवाळही नव्हतो, मध्यममार्गी होतो’ ही भूमिका जवळपास मान्य केली आहे.. मात्र कसुरी खरेच असे असतील, तर त्यांनी दोन्हीकडून होणारी टीका झेलली का, असा प्रश्नही हा लेख उपस्थित करतो. काश्मीरविषयीचा तत्कालीन लष्करशहा मुशर्रफ यांचा चार कलमी कार्यक्रम पुस्तकात कसुरींनी आणि लेखात अहमद यांनी तपशिलानं मांडला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पाकिस्तानी भूमिकांना कसा प्रतिसाद देणार, याबद्दल दोघेही लेखक साशंक आहेत!
असो. बाकी पुस्तक आल्यानंतर समजेलच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Book batmi
First published on: 12-09-2015 at 00:39 IST