scorecardresearch

Premium

‘जैविक ओळख’ शोधताना…

दानी शापिरो या अमेरिकेतील एक सुप्रसिद्ध चरित्र/ संस्मरण लेखिका. पती मायकल आणि मुलगा जेकब यांसोबत सुखाने आयुष्य कंठत होत्या.

 ‘इन्हेरिटन्स’ लेखक : दानी शापिरो प्रकाशक : नॉफ पृष्ठे :२७२; किंमत : ८७० रु.
‘इन्हेरिटन्स’ लेखक : दानी शापिरो प्रकाशक : नॉफ पृष्ठे :२७२; किंमत : ८७० रु.

|| अजिंक्य कुलकर्णी

स्वत:च्या ‘अनामिक’ जैविक पित्याचा शोध लेखिकेनं कसा लावला, याचा रहस्यभेद या पुस्तकात आहेच! पण तात्त्विक प्रश्नांची आच भावनेला भिडल्यानंतरची तगमगही इथं दिसते… 

Anjali Merchant
मुंबईत शालेय शिक्षण, तर लंडनमध्ये मिळवली पदव्युत्तर पदवी; अनंत अंबानीची मेव्हणीही आहे प्रसिद्ध व्यावसायिक
Summons Ranbir Kapoor
विश्लेषण : महादेव बुक बेटिंग ॲप प्रकरणी रणबीर कपूरला समन्स का? बॉलिवुड कलाकारांचा या प्रकरणाशी काय संबंध?
krk-vivek-agnihotri-vaccine-war
“द व्हॅक्सिन वॉरने ‘गदर २’ व ‘जवान’चे रेकॉर्ड…” प्रसिद्ध अभिनेत्याचा विवेक अग्निहोत्रींना टोमणा
Mikhal Yakir visit to Kas Plateau
सातारा: इस्त्रायल शास्त्रज्ञ मिखाल याकीर यांची कास पठाराला भेट

दानी शापिरो या अमेरिकेतील एक सुप्रसिद्ध चरित्र/ संस्मरण लेखिका. पती मायकल आणि मुलगा जेकब यांसोबत सुखाने आयुष्य कंठत होत्या. आयुष्यात कोणत्याच बाबतीत काहीही कमतरता नव्हती. पैसा होता, यशस्वी लेखिका म्हणून जगभर नाव झालेलं होतं. पण या सर्व सुखात आयुष्याची मध्यान्ह उलटून गेल्यावर अचानक अशी घटना घडली की तिचे व्रण दानींच्या मन, बुद्धी आणि शरीरावर कायमचेच कोरले गेले आहेत. दानींना निवृत्तीचे वेध लागलेले, चारएक वर्षांत मुलगा लग्न करून स्वतंत्र होईल. पण वयाच्या या टप्प्यावर अचानक दानींचे पती मायकल हे दानींच्या पुढ्यात एक वैद्यकीय अहवाल ठेवतात. तो वैद्यकीय अहवाल वाचून दानींच्या पायाखालची जमीन सरकते. या अहवालाचा अर्थ काय?  दानी स्वत:शीच विचार करू लागतात, ‘म्हणजे सुझी ही माझी कोणतीच बहीण नाही?… सावत्र बहीणसुद्धा नाही?’ दानींच्या पतीने- मायकलने सहज मौज म्हणून केलेली जनुकीय चाचणी (डीएनए टेस्ट); तिचा तो अहवाल ‘हे तुमचे जैविक वडील नाहीत!’ असे दानींच्या दिवंगत वडिलांबद्दल सांगत होता. अमेरिकेत आजकाल डीएनए टेस्ट किट हे वाढदिवसानिमित्त भेट म्हणून देण्याच्या प्रथेने चांगलाच जोर धरला आहे. म्हणजे, ५२ वर्षे ज्यांना आपण आपले वडील समजत होतो. ज्यांना आपण आपले सख्खे नातेवाईक समजत होतो, ज्यांना आपण हयातभर जीव लावला, ज्यांच्यासोबत हसलो-खिदळलो, वाढलो ते सर्व नातेवाईक आता आपले कुणीही लागत नाहीत? हा हातातला कागद हेच तर सांगतो आहे! तर मग नक्की खरं काय- हा कागद की आयुष्यभर जोपासलेली नाती? मुळात आपल्या पालकांना आपल्या जन्माचं हे रहस्य आपल्याला सांगावंसं का वाटलं नाही? असे एक ना अनेक प्रश्न दानींना पडले होते. या प्रश्नांचा पाठपुरावा करताना त्यांनी आपले जैविक वडील कसे शोधून काढले याविषयीचं हे पुस्तक ! 

 दानींचं हे संस्मरण म्हणजे काय टिपिकल बॉलीवूड सिनेमा नाही; ज्यात नायक/ नायिकेला बाहेरून कळतं की आपले आई-वडील हे आपले खरे आई-वडील नसून ते दुसरेच कुणीतरी आहे नि मग चित्रपटाच्या शेवटी ते आपल्या या मुलाला/मुलीला स्वीकारतात वगैरे.  दानी शापीरो या कुणी हलक्यात घ्याव्या किंवा सरळ दुर्लक्ष करावं अशा लेखिका मुळीच नाहीत. ‘डिव्होशन’, ‘स्लो मोशन’, ‘फॅमिली हिस्ट्री’सारख्या गाजलेल्या पुस्तकांची ही लेखिका. वेस्लियान, कोलंबिया व न्यू यॉर्क विद्यापीठांत दानी लेखनकलेचे वर्ग, कार्यशाळा घेतात. जेव्हापासून दानींच्या मित्रमंडळींना दानींच्या डीएनए टेस्टची ही गोष्ट समजली तेव्हापासून या मित्रमंडळींनी, ‘आपणही आपापल्या जैविक पालकांना/भावंडांना शोधून काढलं’ याच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत, मासिकात आलेल्या सत्यकथा दानींकडे पाठवायला सुरुवात केली. दानींची बहीण सुझी तसेच इतर नातेवाईक त्यांना कायम म्हणायच्या की तू ज्यूईश दिसत नाहीस. तुझे केस सोनेरी आहेत. दानी या गोष्टींकडे सतत दुर्लक्ष करत. पण जोपर्यंत पक्का पुरावा समोर येत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवायला त्या तयार नव्हत्या. दानींनादेखील प्रश्न पडत : आपल्या जैविक वडिलांना वाटत तरी असेल का की, आपलाही कुणीतरी जैविक मुलगा/ मुलगी असेल म्हणून? त्यांना या अपत्याचा शोध घ्यावासा नाही वाटत का? दानींची जैविक बहीण एमिली- जी त्यांना ट्विटरवर फॉलो करत होती- तिनं घरी सांगितलं असेल का की ती दानींना ट्विटरवर फॉलो करते आहे म्हणून? दानींच्या या खऱ्या जन्मदात्या (प्रत्यक्षात ‘वीर्यदात्या’) वडिलांच्या घरी, सगळे कुटुंबीय एकत्र बसून जेवताना वगैरे ते दानींबद्दल बोलत असतील का? की हे आपल्याभोवती रचलेलं षड्यंत्र आहे? असे अनेक प्रश्न!

 दानी यांचा जन्म अमेरिकेच्या फिलाडेल्फिया भागातील फॅरीज् इनस्टिट्यूट ऑफ पॅरेंटहूड या संस्थेतून घेतलेल्या शुक्रजंतूंपासून झाला होता. त्यामागचा दाता नक्की कोण? हा वीर्यदाता नक्की एकच असेल की, या अनधिकृत संस्थेने त्याआधी अनेक पुरुषांच्या वीर्यांचे/ शुक्रजंतूंचे मिश्रण करण्याचाही ‘प्रयोग’ करून पाहिला होता, त्यापासून जन्म झाला होता? स्वत:च्या जैविक वडिलांचा शोध दानींनी कसा लावला? आता तरी दानींना भेटावं, असं त्यांच्या जैविक वडिलांनासुद्धा वाटलं की नाही? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी मूळ पुस्तकच वाचणं योग्य ठरेल.

केवळ जैविक कोड एकच आहेत म्हणून एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीशी नाळ जुळू शकते काय? विचारांची सखोलता, दयाळूपणा, करुणाभाव यांचीही काही जनुके असतात का? या प्रश्नाचा विचार भारतीय कुटुंबपद्धतीच्या अंगाने न करता अमेरिकन कुटुंब व्यवस्थेच्या (?) अंगाने करायला हवा. बहुतेक भारतीयांची मने या प्रश्नाच्या उत्तरादाखल होकारच भरतील; पण दानी या अमेरिकन आहेत. तिकडे लोकांचा कल हा खासगीपणा जपण्याकडे असतो. हा खासगीपणा जपायचा तो यासाठी की, उद्या कुणीही उठून म्हणेल की अमुक व्यक्ती माझे वडील आहेत, तमुक व्यक्ती माझी आई आहे म्हणून. असं नातं सांगणाऱ्या त्या व्यक्तीचा त्यामागील हेतू नंतर उघड होईलच; पण तोपर्यंत या कुटुंबावर जो मोठा मानसिक आघात होईल त्याचं काय? दावा खरा निघाला तरी, कदाचित विश्वासघात केला म्हणून कुटुंबातील नात्यामध्ये कायमचा दुरावा येऊ शकतो. दानींच्या या पुस्तकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या जैविक वडिलांच्या खासगीपणाला खूप जपलं आहे. अर्थात, दानींच्या बाबतीत सर्व गोष्टी जुळून आल्या म्हणून ठीक; पण आजच्या या विदा-विज्ञानाच्या काळात जिथे ‘विदा म्हणजे नवीन तेल’ मानले जाते, अशा काळात या सर्व माहितीची गोपनीयता या संस्था खरोखरच पाळतील की नाही यावर शंका आहे. आज अशी कितीतरी मुलं जन्माला आली असतील की ज्यांना त्यांच्या आत्ताच्या ‘पालकां’नी खोटं सांगितलं असेल की तेच त्यांचे खरे आईवडील आहेत म्हणून!

 मानवाला सर्वात महत्त्वाची वाटते ती एक गोष्ट म्हणजे ‘ओळख’! – माझी ही ओळख माझे पूर्वज, धर्म, देश, जात आदींपैकी कोणतीही असू शकते. ‘‘माझे वडील हे माझे वडील नाहीत तर मग माझे वडील कोण? माझे वडील हे जर माझे वडील नाहीत तर मग मी कोण आहे?’’ या प्रश्नाचं गांभीर्य म्हणूनच वाढतं. तत्त्वज्ञानाच्या अंगाने विचार केल्यास  ही चर्चा तीन महत्त्वाच्या प्रश्नांशी निगडित आहे :  ‘मी कोण?’, ‘मी कुणाचा?’ आणि ‘माझ्या या जन्माचे प्रयोजन काय?’ यातल्या पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं ही ‘ओळखी’शीच निगडित आहेत. त्यामुळेच बहुधा, आपले खरे पालक कोण आहेत हे तपासून पाहण्याची एकच साथ अमेरिकेत गेली कित्येक वर्षं आली आहे. अधिकृत आकडेवारी असं सांगते की या जनुकीय चाचण्या करून घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी एकूण अमेरिकी लोकसंख्येच्या दोन टक्के इतक्या दराने वाढते आहे. समजा जर  एक कोटी २० लाख किट्स (जनुकीय चाचणी संच) वर्षाला विकले गेले; तर त्यापैकी सरासरी दोन लाख ४० हजार लोकांना समजतं की त्यांचे पालक हे काही त्यांचे खरे जन्मदाते नाहीत म्हणून. वीर्यदाते आजही त्यांचा अर्ज भरताना स्वत:ची ओळख लवण्यासाठी ‘अनामिक’ हा पर्याय निवडतात. दानी म्हणतात की, ‘‘आता तरी हे बदलायला हवे आहे!’’ कारण या गोष्टीचा त्यांच्या जैविक मुलांच्या मनावर मोठा परिणाम होतो. ‘‘माझं हे पुस्तक आपण कोणत्या ‘अनामिक’ दात्याचं मूल आहोत हे शोधण्यासाठी मदत करू शकतं’’- अशी दानी यांची इच्छा आहे.

ajjukul007@gmail.com  

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dani shapiro is a well known american character memoir writer biological identity akp

First published on: 05-11-2021 at 00:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×