मिथ्यकथा धर्मनिष्ठांना अंतिम सत्य सांगणाऱ्या वाटतात, जे धर्मनिष्ठ नसतील त्यांना त्या अवास्तव वा कल्पित वाटतात, तर सर्जनशील असलेल्यांना त्यात कलात्मक अभिव्यक्ती खुणावत असते. मिथ्यकथांकडे पाहण्याचे हे किमान तीन दृष्टिकोन गेल्या दोनेक हजार वर्षांत तरी एकमेकांपासून काहीसे अंतर राखून रुजलेले आहेत. पण मिथ्यकथांकडे पाहण्याच्या या तिन्ही दृष्टिकोनांचा काही प्रमाणात समन्वय आणि बऱ्याच प्रमाणात अनुसर्जन करण्याचा, त्यात समकाळाचा आशय धुंडाळण्याचा प्रयत्न फारसा होत नाही. झाला तरी त्याकडे वरील तिन्ही दृष्टिकोनांचे खंदे समर्थक काहीशा संशयानेच पाहतात. तसा संशय देवदत्त पटनायक यांच्या वाट्यालाही आला. मात्र, ते लिहिते राहिले अन् पाहता पाहता ‘बेस्टसेलर’ लेखक ठरले. तीसहून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर जमा झाली आहेत. मिथ्यकथा म्हणजे पूर्ण सत्य नसून, त्या कोणाचे तरी सत्य आहेत. ते सत्य कोणाचे का असेना, पण जाणून घेतले पाहिजे, ही त्यांची लेखन-भूमिका. यावर कोणास असा प्रश्न पडेल की, पण ते जाणून घ्यावेच कशासाठी? तर, त्याचेही उत्तर पटनायक यांनी देऊन ठेवले आहे ते असे : ‘संस्कृतींची विविधता जाणून घेण्यासाठी’! पटनायक यांच्या आजवरच्या बहुतेक पुस्तकांतून ती विविधता… भारतीय संस्कृतीअंतर्गत असली तरी… दिसली आहे. संस्कृतींच्या विविधतेत आपसूक गुंफला गेलेला समन्वयाचा धागाही त्यांनी ग्रीक मिथकांच्या भारतीय कथनपरंपरेचा वेध घेणाऱ्या त्यांच्या एका पुस्तकातून (‘ऑलीम्पस : अ‍ॅन इंडियन रेटेलिंग ऑफ ग्रीक मिथ’) पाच वर्षांपूर्वीच दाखवून दिला होता. आधुनिक समाजात प्रबळ ठरलेल्या भांडवलवाद, साम्यवाद, समाजवाद, विज्ञानवाद अशा विचारसरणींतील मिथकांचा कंगोराही त्यांनी त्यात उलगडून दाखवला होता. या पुस्तकाच्या पुढे जाणारे ठरावे, असे त्यांचे नवे पुस्तक प्रकाशित होत असल्याची बातमी सरत्या आठवड्यात आली. ‘ईदन : अ‍ॅन इंडियन रेटेलिंग ऑफ ज्युईश, ख्रिश्चन अ‍ॅण्ड इस्लामिक लोर’ हे त्या नव्या पुस्तकाचे शीर्षक. पश्चिम आशिया आणि दक्षिण आशिया यांच्यातील मिथ्य-बंध दाखवून देणारे हे पुस्तक पेंग्विन रॅण्डम हाऊसच्या ‘व्हायकिंग’ या प्रकाशन शाखेकडून येत्या सप्टेंबरात बाजारात येईल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Eden an indian retelling of jewish christian and islamic law book review abn
First published on: 10-04-2021 at 00:01 IST