कलासमीक्षक  व लेखक जॉन बर्जर अलीकडेच निवर्तले. त्यांची महत्ता सांगताहेत, ‘लोकसत्ता’त २०१५ या वर्षी ‘कळण्याची दृश्य-वळणे’ हे सदर चालविणारे आणि कलाध्यापन क्षेत्रात प्रयोगशील असलेले कलासमीक्षक

तीन जानेवारीला कळलं की, दोन जानेवारीलाच जॉन बर्जर यांचं वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झालंय. ही बातमी कळताच आपल्या विचारविश्वाशी संबंधित एक दुवा निखळून गेलाय याची जाणीव झाली, मनात खंत निर्माण झाली. त्याच वेळी मनात जॉन बर्जर या नावाचा प्रतिध्वनी म्हणून ‘वेज ऑफ सीइंग’ व ‘सक्सेस अ‍ॅण्ड फेल्युअर ऑफ पिकासो’ या त्यांच्या पुस्तकांची नावं मनात उमटली.

आर्ट स्कूलमध्ये शिकताना ‘पाहावं कसं’ ही गोष्ट कोणी हात पकडून शिकवीत नव्हतं. चित्र कसं रेखाटावं, रंगवावं याचं तंत्र शिकत होतो; पण या तंत्राचा एक भाग म्हणून जगाकडे कसं पाहायचं, आपण ‘सहज नैसर्गिकपणे’ कसं पाहतो? अशा गोष्टीची चर्चा, त्याबद्दलची जाणीव होत नव्हती. त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता असायची. याच अस्वस्थतेतील शोधामध्ये मला एकाच वेळी काही पुस्तकं सापडली. जे. कृष्णमूर्तीचं शिक्षण व जीवनविषयक चिंतन व जॉन बर्जरचं ‘वेज ऑफ सीइंग’. दोन्ही पुस्तकांत ‘पाहणं’ या मानवी प्रक्रियेबद्दल विस्ताराने व थेटपणे चर्चा केली आहे. या पुस्तकांच्या समांतर वाचनाने माझे डोळे अक्षरश: उघडले.

आपल्याला डोळ्यांनी जग दिसतं, पण जे दिसतं त्याकडे पाहायचा ‘दृष्टिकोन’ हा समाजातील धार्मिक, आर्थिक, राजकीय, नैतिक इत्यादी मूल्यांनी घडविलेला असतो. या मूल्यांनिशी जगाचा अर्थ आपण लावतो व त्याच वेळी या अर्थाला दर्शविणाऱ्या प्रतिमा ललित व जाहिरात कलेमध्ये निर्माण होतात. प्रत्यक्ष वास्तव व त्या वास्तवाच्या कलांमधील प्रतिमा यांचा ‘अर्थ’ ठरविण्यामागील ‘दृष्टिकोन’ समान असल्याने दृष्टिकोनामुळे कलाकृतींचा ‘अनुभव’ निश्चित केला जातो. त्यातली सौंदर्यस्थळे निश्चित केली जातात व कलाकृतीचा रसास्वाद घ्यायची पद्धत कशी निर्माण होते, हे या पुस्तकांच्या समांतर वाचनाने लक्षात आलं. या गोष्टी कशा एकामागून एक घडत जातात, हे बर्जर यांच्या पुस्तकांतून सोदाहरण उलगडलं.

बर्जर यांचं छोटय़ा आकाराचं, ठळक टाइपातील अक्षरात मजकूर असलेलं पुस्तक एखाद्या मित्राप्रमाणे सहज संवाद साधतं, पाहण्याची वैयक्तिक व सामूहिक प्रक्रिया सांगतं (पुढे ‘वेज ऑफ सीइंग’ या पुस्तकाशी संबंधित बी.बी.सी.ने बनविलेली डॉक्युमेन्टरी पाहण्यात आली.). या संवादातून पाहण्याची प्रक्रिया, दृष्टिकोन व त्याचा संबंध ‘दृश्य भाषा’ तयार होण्याच्या प्रक्रियेशी कसा आहे ते एखादं गुपित सांगावं तसं कळतं.

चित्रामध्ये काय रंगवावं? हा पारंपरिक प्रश्न तेव्हा नेहमी सतावायचा; पण या प्रश्नाचा विचार करून ‘दृश्यभाषा’ म्हणजे काय, हे कळणार नाही, त्याचं भान येणार नाही, हे या पुस्तकानं कळलं. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तो दृष्टिकोन घडविणारे अनेक घटक, या दृष्टिकोनांमुळे जगाच्या अनुभवाचा लावलेला अर्थ, त्यातून तयार झालेल्या प्रतिमा व त्यांना पाहण्याची, त्यांचा आस्वाद घेण्याची पद्धत यांतील अन्योन्य संबंध या पुस्तकामुळे कळला. प्रतिमा निर्माण होण्याच्या प्रक्रियेतच त्यांना प्रतिसाद द्यायची पद्धत अंतर्भूत असते, याचं भान परिपक्व कलाकाराला असते. या भानातूनच तो त्याची दृश्यभाषा व शैली विकसित करतो, हे ‘वेज ऑफ सीइंग’ने शिकविलं. त्यामुळेच जॉन बर्जर व ‘वेज ऑफ सीइंग’ हे एखाद्या शब्दप्रयोगाप्रमाणे एकमेकांशी जुळले.

त्यानंतर समोर आलं ‘सक्सेस अ‍ॅण्ड फेल्युअर ऑफ पिकासो’. या पुस्तकानंही आधीच्या पुस्तकाप्रमाणं पिकासो, आधुनिक कला, कलाबाजार, त्यातील गुंतवणूक, त्यातले ताण-तणाव व त्यामुळं कळत-नकळतपणं कलाविचार व अभिव्यक्तींवर येणारी दडपणं, त्यामुळं येणारी हतबलता यांचा आधुनिक काळातील पहिला यशस्वी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसॅडर पाबलो पिकासो याचा दाखला देऊन उलगडून दाखविलं.

हे उलगडल्यामुळं पिकासोच्या रंगेल व गूढ प्रतिमेचे अनेक पदर उलगडून दाखविले गेले. ‘नटसम्राट’मधील नटसम्राटासारखीच एक प्रकारची शोकांतिका अंतर्मुख करून गेली.

आधुनिक कला व त्या कलेतील आधुनिकता तितक्याच तत्परतेने समजावून देण्यात बर्जरचं मोठं योगदान होतं. पुढे इंटरनेटच्या काळात गुगल, विकिपीडियाने बर्जरचं माहीत नसलेलं जीवन, चित्रकार, शिक्षक, लेखक, कवी, समीक्षकात्मक लिखाण असा मोठा पट समोर मांडला. त्यातून अनेक आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी समोर आल्या. म्हणजे त्याची चित्रकला, चित्रकला शिक्षक म्हणून काम करणे व समीक्षा यांतील संबंध वगैरे. एकुणात असं लक्षात आलं की, ही समीक्षा केवळ व्यावसायिकतेचा भाग म्हणून केलेली नाही. १९७२ साली बुकर सन्मान मिळालेला या लेखकाने डोळे मिटून जरी शेवटचा श्वास घेतला असला तरी त्यांच्या ‘वेज ऑफ सीइंग’ने माझ्यासारख्या अनेकांचे डोळे कायमचे उघडले आहेत!