हरयाणातील बाबा रामपाल याचा सशस्त्र शिष्य परिवार आणि पोलीस यांच्यातील चकमकीत सहा जणांना मरणाला सामोरे जावे लागणे ही घटना केवळ संतापजनक नाही, तर राजकारण्यांनी लाडाकोडाने मोठय़ा केलेल्या अशा बाबांच्या अघोरी साम्राज्यांचे भयावह दर्शन घडवणारीही आहे. भारतीय संतपरंपरेत अतिशय मानाचे स्थान मिळवलेल्या संत कबीर यांचा अनुयायी म्हणवून घेणाऱ्या बाबा रामपालने खरोखरीच कबीर वाचले आहेत काय, अशी शंका त्याचे वर्तन पाहून यावी. पंजाब उच्च न्यायालयाने अटक करण्याचा आदेश दिल्यानंतर आपल्या आश्रमातील अनुयायांना पोलिसांच्या अंगावर धावून जायला सांगणे आणि त्यासाठी पेट्रोल बॉम्ब, बंदुकी आणि अ‍ॅसिड बल्ब तयार ठेवणे ही भारतीय संतांची शिकवण नक्कीच नाही. यापूर्वी २००६ मध्ये आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांच्याबद्दल अनुदार उद्गार काढल्याबद्दल दोन समाजांमध्ये हिंसक दंगल घडून आली होती. त्यामध्ये काही जणांना जीवही गमवावा लागला होता. त्या घटनेतील सहभागाबद्दल रामपाल याच्याविरुद्ध उच्च न्यायालयात खटला उभा राहिला. खून आणि खुनाचा प्रयत्न यासाठी त्याला बावीस महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. २००८ मध्ये जामिनावर सुटल्यानंतर बाबा रामपाल याने हिस्सार येथे आपल्या आश्रमाची उभारणी केली. न्यायालयीन कारवाई सुरू असताना ४२ वेळा अनुपस्थित राहिल्याबद्दल न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर बाबाच्या अनुयायांनी हल्लाबोल केला. हरयाणा व उत्तर प्रदेशात बाबा रामपाल याचे अनुयायी मोठय़ा संख्येने आहेत आणि ते रामपालला देवासमान मानतात. या बाबाची अटक टाळण्यासाठी हे अनुयायी इतक्या मोठय़ा संख्येने आश्रमात जमा झाले की, महिला व मुलांचे मानवी कडे भेदून त्याच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अटकाव झाला. यामागे राजकीय अभयदान हे कारण असल्याचेही उघड झाले. राजकारण्यांच्या आश्रयाने स्वत:चे संस्थान उभे करणाऱ्या बाबांना कोणताही पक्ष वज्र्य नसतो. राजकारण्यांनाही, त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ उठवून आपली पोळी भाजून घेण्याची गरज असते. लोकशाही जीवनपद्धतीत सर्वमान्य कायदे आणि त्यांची प्रतिष्ठा नेहमीच महत्त्वाची मानली गेली असली तरीही अशा पुढाऱ्यांसाठी लोकशाही हा केवळ एक फार्स असतो. समाजातील तेढ मिटवून जीवनमार्गात सुधारणा घडवण्यासाठी सारे आयुष्य वेचणाऱ्या भारतीय संतांच्या परंपरेचे आपण पाईक आहोत, असे जर बाबा रामपाल सांगत असेल, तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा? समाजातील दु:खांचे हरण करण्याच्या नावाखाली प्रचंड मालमत्ता निर्माण करणारे अनेक आश्रम आजही भारतात कार्यरत आहेत. आपला पंथ हाच सर्वश्रेष्ठ असे आजवर कधीही न सांगणाऱ्या संतांनाही लाजेने मान खाली घालायला लागेल, असे वर्तन जेव्हा घडते, तेव्हा लोकशाही तत्त्वेच पायदळी तुडवली जातात. बाबा रामपाल याने न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित होते; परंतु पंथीय अध्यात्माचा लढाऊ बाणा दाखवत आपल्या अस्मितेचे अश्लाघ्य दर्शन जे गेल्या काही दिवसांत साऱ्या देशाला झाले, ते कोणत्याही पातळीवर समर्थनीय ठरणारे नाही. बाबा रामपालच्या आश्रमात शस्त्रांचा साठा असल्याची माहिती असतानाही, हरयाणा शासनाने त्याकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न विचारला जात असताना शासन हतबल असल्याचे चित्र दिसते आहे. न्यायालयीन सत्तेला आव्हान देण्याची अशी हिंमत लोकशाही क्षीण होण्यास कारणीभूत ठरत आहे. बाबा रामपाल याच्या अटकेच्या निमित्ताने जे निर्लज्ज दर्शन झाले, त्यास राजकारण्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.