प्रदीप आपटे

Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक

नेपाळच्याही पलीकडून आडवी वाहणारी त्सांगपो नदी हीच ब्रह्मपुत्र असेल का? यासारख्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी १८७८ मध्ये पहाडांचा पंडित, पण रूढार्थाने अशिक्षित अशा किंटुपची नेमणूक झाली. त्याने काम चोख केले; पण..

श्री. ना. पेंडसे ई. एम. फॉर्स्टरना भेटायला गेले होते. (फॉर्स्टर हे ‘पॅसेज टू इंडिया’,  ‘गॉडेस ऑन दि हिल’सारख्या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक). दोघे बोलतबोलत फिरायला म्हणून बाहेर पडले तेव्हा फॉर्स्टर श्रीनांना म्हणाले, ‘‘जरा नदीकाठाने चक्कर मारू या.. इथे या छोटय़ा प्रवाहालाच नदी म्हणायचे धाडस करतात! कारण इथल्या लोकांनी गंगा किंवा ब्रह्मपुत्र कुठे पाहिली आहे!’’

बाहेरून आलेल्या युरोपियनांना हिंदुस्थानातल्या या नद्या बघून अतोनात विस्मय वाटत असे. यापैकी अनेकांच्या प्रवासवर्णनांत तो व्यक्त झाला आहे. गंगेची उगमस्थाने तीर्थस्थान म्हणून बोलबाला असलेली आणि ‘ख्यात’ होती. पठारी सपाट देशी  गंगा साक्षात सागरसदृश होते. बंगाल उपसागराला भिडण्याआधी तिचे उपप्रवाही फाटे आणि तिच्यात विलीन होणाऱ्या नद्या यांचे अजब जटाजाल मैलोन्मैल पसरते. त्या जटा नकाशावर रेखण्यात जेम्स रेनेल आणि त्याच्या सहकाऱ्यांना पुरेशा निराळ्या कष्टप्रद मोहिमा कराव्या लागल्या होत्या.

असाच गूढ वाटणारा, फार विस्तीर्ण भाग व्यापणारा आणि दमछाक करणारा जलौघ म्हणजे ब्रह्मपुत्र! याला स्त्रीलिंगी ‘नदी’ नव्हे तर पुल्लिंगी ‘नद’ म्हणतात! कारण तो ब्रह्माचा पुत्र आहे. या ब्रह्मपुत्राचे लांबच लांब पात्र, पर्वतरांगेत खोल दऱ्यांतला धडकी भरविणारा खळाळ आणि पुढला अवाढव्य जलौघ, त्याचे विनाशी महापूर, अचानक मोहरा वळवून भलतीकडे होणारा पात्रबदल या सगळ्याच पैलूंमुळे नाठाळ ठरलेला ब्रह्माचा मुलगा प्रश्नचिन्हांचे गाठोडे ठरला होता. ब्रह्मपुत्राचा उगम कुठे आहे? तो कुठे कुठे सरळ वाहतो आणि कुठे वळसे घेतो? त्याला येऊन मिळणाऱ्या नद्यांचे जाळे याची पूर्ण कल्पना नव्हती.

जी काही त्रोटक माहिती होती त्यातून तीन समस्या फार काळ भेडसावत होत्या. या नदाचा नेमका उगम कुठला? हिमालय पर्वतरांगांच्या तिबेटमधल्या भागामध्ये त्सांगपो ही भलीथोरली नदी आहे तिलाच पुढे ब्रह्मपुत्र संबोधले जाते का? की ही त्सांगपो पुढे इरावडी ऊर्फ ऐरावती या ब्रह्मदेशातील नदीला मिळते? ब्रह्मपुत्रचा अवाढव्य प्रवाह तिबेटातून आसाम, अरुणाचल प्रदेश आणि बंगाल (आताचा बांगलादेश) असा पसरतो. सासरी जाणाऱ्या मुलीचे नाव बदलावे तशी त्याची नावे बदलतात. या अवाढव्य जलौघाला येऊन मिळणाऱ्या अनेक छोटय़ामोठय़ा नद्या, त्याचे ढासळते किनारे, गाळ साचत-साचत त्यांचा थोडाफार बदलणारे सरकते मार्ग आणि या जलौघाचे पुढे होत गेलेले जटांसारखे फाटे सुंदरबनातून समुद्रात विलीन पावतात त्याचे तपशील.. या सगळ्याचे विश्वसनीय रेखाटन करणे फार जिकिरीचे, आव्हानांनी बरबटलेले काम होते.

या जडजंबाळ प्राकृतिक ‘अस्मानी’ रूपाखेरीज समस्या होती ती या निरनिराळ्या प्रदेशांमधल्या ‘सुलतानीं’ची. या नदीच्या प्रवाहापर्यंत पोहोचण्याकरिता नेपाळ- तिबेटच्या राजवटींची संमती मिळणे दुरापास्त असायचे. त्याखेरीज आसाम, अरुणाचल प्रदेश भागातल्या आदिम आदिवासी समूहांचेही भयप्रद अडथळे होते. त्यांच्या ‘स्वत:च्या’ हद्दीत कुणी पाऊल टाकणे म्हणजे ‘मरणाला आवतण’ अशी सर्वसाधारण ख्याती होती. ‘पंडित’ नामी सिंगसारख्या लोकांनी प्रयास करूनदेखील त्सांगपोची मार्गक्रमणा आणि तिचे ब्रह्मपुत्राशी असणारे संधान उलगडण्यात यश आले नव्हते. माहिती होती पण तुटक तुटक आणि अपुरी. निरीक्षणे सदोष आणि विसंगत भासत होती.

हार्मान नावाचा मोठा जिद्दी, कष्टाळू अधिकारी आसाम, सिक्कीम दार्जिलिंग भागात सर्वेक्षण करीत होता. त्याने एक नवीन प्रयत्न करायचा घाट घातला. किंटुप नावाचा एक शिंपी सिक्कीमचा रहिवासी होता. तिबेट आणि अन्य डोंगरी मुलखाची यात्रा करणाऱ्यांना वाटा दाखविणारे, मालवाहू मदत करणारे हरकामे लागत. तो अशा यात्रेकरू सेवेत निष्णात होता. त्याने नेमीसिंगबरोबर १८७८-७९ मध्ये सहायक म्हणून काम केले होते. तो अतिशय धडधाकट, चपळ आणि तडफदार होता. त्याचे सर्वेक्षण विभागातले टोपणनाव होते ‘केपी’! त्याला ‘येरुलुंग त्सांगपो’ नदीचा ‘ग्याला सिंग दोंग’पर्यंतचा मार्ग नीट ठाऊक होता. मात्र खुद्द त्यालाच सर्वेक्षण निरीक्षक म्हणून पाठविण्यात एक अडचण होती.

तो बव्हंशी निरक्षर होता! जुजबी अक्षरांपलीकडे त्याला वर्णन लिहिणे, हिशोब करणे, नोंद लिहिणे बिलकूल अवगत नव्हते. म्हणून हार्मानने एका चिनी लामाला हाताशी धरले. आणि किंटप ऊर्फ ‘केपी’ला त्याचा सहायक म्हणून बरोबर धाडायचे असे ठरविले. पण या शोधमोहिमेत एक वेगळी रीत राबवायची होती. त्यानुसार हार्मानला अगोदर कुणामार्फत तरी संदेश धाडायचा. त्यांना टिनच्या डबीवजा पुंगळ्या दिल्या होत्या. मग कालांतराने जसजसे पुढे मार्गक्रमणा होईल त्या त्या टप्प्याला छोटे ओंडके तयार करायचे. ओंडक्यांना बीळ पाडायचे. टिनच्या पुंगळीत संदेश दडवून ती बंद करायची आणि ओंडके नदीच्या प्रवाहात सोडून द्यायचे. संदेश मिळताच हार्मान ते ओंडके हेरून पकडायला नाक्यावर माणसे बसविणार व प्रवाहात ‘वाहत’ आलेले ‘ओंडके’ पकडणार; मग त्यातल्या नोंदी ‘उतरून’ घेणार. किंटुपकडे पुंगळ्याचे सामान, दिशादर्शक चुंबकसूची आणि एक पिस्तूलही दिले गेले. मुख्य नोंदी करायचे काम चिनी लामा बुवा करणार असे ठरले होते.

पहिले काही दिवस चिनी लामा ठीक होते. पुढे त्यांनी आपले रंगढंग दाखवायला सुरुवात केली. तो ‘केपी’ला खासगी गुलामासारखे वागवू लागला. एका टप्प्याला त्यांनी एका घरी मुक्काम केला. तो प्रवासी सोयीचा थांबा होता. लामांनी त्या थांब्याच्या मालकिणीशी प्रेमसंधान बांधले. आणि मुक्काम वाढलाच.. चांगला चार महिन्यांनी! पण एक दिवस त्या मालकाने लामा व बायको दोघांना ‘रंगेहाथ’ पकडले. चिनी लामाने गयावया करून, मालकाशी सौदा करून आपली सुटका करून घेतली. पण त्यात केपीलाच २५ रुपयांचा खर्च करावा लागला! कारण लामाने सुटकेच्या बदल्यात ‘केपी’ला गुलाम म्हणून विकले होते! स्वत:च्या सुटकेसाठी केपीला २५ रुपये मोजावे लागले. पुढे लामाने एका सरकारी मठात हाच प्रयोग केला. एवढेच नव्हे तर आपण काय हेतूने इथे आलो हेदेखील उघड सांगून टाकले. त्यामुळे ‘केपी’च्या स्वत:जवळ लपवलेल्या पिस्तूल वगैरे चीजवस्तू जप्त करण्यात आल्या. लामाने ‘केपी’ला मठासाठीचा गुलाम म्हणून देऊन टाकले आणि आपली सुटका करून घेऊन लामा तेथून गायबच झाला.

बिचारा केपी तेथे गुलाम म्हणून खितपत राहिला. पण त्याने आपल्या कष्टाळूपणामुळे एका धर्मगुरूची मर्जी संपादली आणि तीर्थयात्रेसाठी रजा मागितली, ती त्याला मिळालीदेखील! यात्रेकरूंसारखा भिक्षा मागत, वाटेतल्या प्रवाशांची हमाली मदत करत त्याने गुजराण चालू ठेवली; पण चिकाटीने तो पुढे जात राहिला.

अशी गुलामीची तब्बल दोन वर्षे त्याने सोसली होती. त्याला आपल्याला नेमून दिलेल्या कामगिरीचा बिलकूल विसर पडला नव्हता. एक प्रतिष्ठित कुटुंब दार्जिलिंगकडे जाणार आहे याची त्याला खबर मिळाली. त्यांच्या जथ्याबरोबर त्याने हार्मानला संदेश पाठवायची सोय केली. आणि ठरल्याप्रमाणेच काष्ठ-ओंडके गोळा केले. त्यात पुंगळ्या खोवून धाडायला सुरुवात केली.

दरम्यान पण दोन वर्षांच्या काळात हार्मान आणि त्याला ओळखणारे जवळपास सर्व अधिकारी बदलून किंवा सोडून गेले होते. त्यांना ‘केपी’ने धाडलेला संदेश कसा पोहोचणार? त्यामुळे त्याने धाडलेले खुणेचे ओंडके अडवून घ्यायला कोण हुकूम देणार होते? ती सगळी खटाटोपी मेहनत शब्दश: पाण्यात वाहून गेली होती.

पण सर्व परिक्रमा संपवून परत येईपर्यंत ‘केपी’ला याचा काहीच सुगावा नव्हता. एवढे सगळे रस्ते, नदीचे चढउतार- ती कुठे ईशान्येला वळते, मग तिथून दक्षिण वाहिनी कुठे होते, काठाची गावे, त्यांची काठाकाठाने येणारी अंतरे.. वगैरे सगळे त्याच्या स्मरणात होते. अखेरीस काही अधिकारी त्याची कैफियत ऐकायला तरी हवे? सर्वेक्षण कचेरी असे गृहीत धरून चालली होती की लामा आणि ‘केपीं’ना पकडून कैदेत टाकले किंवा ते वाट चुकून हरवले! अखेरीस मोठय़ा मिनतवारीनंतर त्याची विलक्षण कथा आणि प्रवास वृत्तान्त ऐकायला एक अधिकारी नेमला गेला. ‘केपी’चा सगळा वृत्तांत नोंदला गेला खरा; पण त्याची विश्वसनीयता कशी जोखायची हा एक यक्षप्रश्न होताच!!

त्याची ‘जबानी’ नोंदवली गेली. त्याने सांगितलेली  एक गोष्ट मोठी लक्षणीय होती. त्याच्या निरीक्षणांवर आणि वर्णनांवर विश्वास ठेवायचा तर त्यापैकी महत्त्वाचा निष्कर्ष काय? ‘त्सांगपो नदी म्हणजेच ब्रह्मपुत्र’! पण यावर शिक्कामोर्तब व्हायला आणखी तीन दशके लोटायला लागली! एफ. जे. बेले आणि इतर अनेकांनी त्याने निव्वळ स्मरणाने दिलेले तपशील, दिशा आणि वळणे योग्य आणि वास्तव असल्याचा निर्वाळा दिला.

त्याने एका ठिकाणी उंच धबधबा आहे असे सांगितल्यामुळे मात्र मोठी उत्सुकता तयार झाली होती. बराच काळ त्या धबधब्याचा वेध घेण्यात लोटला. परंतु ‘त्सांगपो हा ब्रह्मपुत्र प्रवाह?’ हा प्रश्न सोडविण्याचे श्रेय आणि त्या प्रवाहाच्या उलटसुलट दिशांचे जवळपास अचूक वर्णन मात्र त्याच्या खात्यावर म्हणावे तसे गौरवपूर्ण रीतीने गोंदले गेले नाही. इतका दासानुदासपणाचा छळ सोसून एवढय़ा जुन्या भंडावणाऱ्या प्रश्नाचे निराकरण केल्याचे श्रेय त्याच्या परिश्रमातून लाभले होते. पण इतर पंडितांना मिळाला तशा सन्मानाला आणि पारितोषिकांना तो पारखाच राहिला. नैनसिंगाला रायबहादूरपद आणि काही गावांचा महसूल नेमून दिला गेला होता. पण बिचारा ‘केपी’! दिली ती भरपाई पत्करून पुन्हा आपल्या मूळ सहायक हमाल- वाटाडेपणाच्या पेशाकडे परतला! कारण निरक्षरपणामुळे लौकिकरीत्या त्याचे पांडित्यपद गौण मानले गेले! एवढे सगळे श्रेय एका अविद्येने हरपले?

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com