अनेक लहान राज्यांपेक्षाही मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा असल्याची मिजास आगामी वर्षांत आणखीनच दिमाखाने मिरविली जाणार आहे. कारण, येत्या वर्षांचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीपेक्षा २२.७२ टक्क्यांनी मोठा, ३१ हजार कोटींचा पल्ला ओलांडणारा आहे. हा केवळ आकडय़ांचा खेळ आहे, की एवढय़ा आकडेमोडीनंतर मुंबईकरांच्या पदरात खरोखरीच नवे काही पडणार आहे, हा नेहमीप्रमाणे येत्या वर्षांच्या अखेरीस कराव्या लागणाऱ्या संशोधनाचा विषय होणार यात मात्र शंका नाही. कारण दरवर्षीच नवा अर्थसंकल्प येऊ घातल्यानंतर जुन्या अर्थसंकल्पातील आकडय़ांचा वास्तवाशी मेळ बसतो का, हे शोधावेच लागते. वर्षांनुवर्षांच्या अर्थसंकल्पाच्या अनुभवामुळे महापालिका आकडय़ांच्या खेळात करण्यात पटाईत झाली आहे, एवढा प्राथमिक निष्कर्ष मात्र बुधवारी आयुक्त सीताराम कुंटे यांनी सादर केलेल्या २०१४-१५ च्या अर्थसंकल्पावरून कोणासही काढता येईल. त्यामुळेच २०१३-१४ च्या सुधारित अर्थसंकल्पापेक्षा २७ टक्के अधिक रकमेचा अर्थसंकल्प मांडूनही मुंबईकरांची झोळी मात्र रिकामीच राहिली आहे. जकात कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत. चालू वर्षांत या करातून ७७४० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. मात्र राज्य सरकारचा एलबीटीचा निर्णय, त्यानंतर व्यापाऱ्यांनी केलेले आंदोलन आणि जकातीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी दाखवलेला गाफीलपणा यामुळे पालिकेच्या तिजोरीला प्रत्यक्षात ५४० कोटी रुपयांचा फटकाच बसला. मालमत्ता कराबाबतही पालिकेचे गणित चुकले. त्यामुळे खरे तर या वर्षी पालिकेची अर्थव्यवस्था गडबडणेच बाकी होते. मात्र फंजिबल एफएसआयने हात दिला आणि मालमत्ता करापेक्षाही अधिक उत्पन्न मिळवून देऊन पालिकेचा श्रीमंती आब राखला. मात्र या उत्पन्नामुळे फुगलेल्या तिजोरीतून मुंबईकरांचे कष्ट थोडे कमी करण्याचे प्रयत्न आयुक्तांनी केलेले नाहीत. निवडणूक वर्षांमुळे गेल्या वर्षी मुंबईकरांना केवळ करातून सुटका मिळाली होती. या वर्षीही करातून सुटका या बटबटीत अक्षरांत लिहिलेल्या वाक्याखेरीज आयुक्तांच्या भाषणातील इतर कोणतीही घोषणा अधोरेखित करण्यासारखी नाही. मुलुंडमध्ये ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाची सुरुवात आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी १०३५ कोटी रुपयांची तरतूद यापलीकडे या अर्थसंकल्पात काही नाही. नाही म्हणायला या पावसाळ्यात खड्डय़ांवरून हल्लाबोल झाल्याने पालिकेने पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात रस्त्याकडे तब्बल तीन हजार एकशे ३८ कोटी रुपये वळवले आहेत. मात्र यात आहे ते रस्ते गुळगुळीत करण्यावरच भर दिला आहे. डॉकयार्ड इमारत दुर्घटना घडल्यावर जाग आलेल्या पालिकेने तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी ५१९ कोटी रुपये बाजूला काढले आहेत. पालिकेचा अर्थसंकल्प या चार ओळीतच संपतो. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न या वर्षीही करण्यात येणार आहेत. म्हणजे, वर्षभरात या प्रयत्नांना गती मिळाली नसल्याचीच स्पष्ट कबुली आहे. गेल्या वर्षी संमत केलेल्या रकमेपेक्षा केवळ २५ टक्के रक्कम प्रकल्पावर आजतागायत खर्च केलेली आहे. कोणताही नवीन कर किंवा करात वाढ केली नसल्याचे अर्थसंकल्पीय भाषणात पुन्हा पुन्हा सांगण्यात येत असले तरी पाणीपट्टीत दरवर्षी होणारी आठ टक्के वाढ आणि सुधारित मालमत्ता कर यामुळे मुंबईकरांच्या खिशातून जास्तीचे पैसे जाणार आहेत. पुढील वर्षी जकातीतूनही अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. मात्र यातून मुंबईकरांच्या हाती काहीही लागणार नाही. चांदीचा मुलामा असलेला एका मातीचा घडा पालिकेने मुंबईकरांच्या हाती ठेवला आहे.