scorecardresearch

Premium

अग्रलेख : ‘बाँगबाँग’चे ‘बिग बँग’!

गतशतकातले ऐंशीचे दशक म्हणजे जगभर राजकीय घडामोडींचे अस्वस्थ असे दशक. अमेरिका आणि सोव्हिएत संघराज्यादरम्यान अण्वस्त्रचाचणीबंदी आणि क्षेपणास्त्रघट करार होत होते, पण खुद्द सोव्हिएत संघराज्य अंतर्गत पोखरले जाऊन शकले होण्याच्या उंबरठय़ावर होते.

अग्रलेख : ‘बाँगबाँग’चे ‘बिग बँग’!

मार्कोससारखे निवडणुकीत विजयी होतात ते पाहून राजकीय निरीक्षक अवाक्  होतात. कारण निवडणुका पारखण्याची त्यांची दृष्टीच कालबा ठरू लागली आहे.

फिलिपिन्सच्या मार्कोस घराण्यातील पुढल्या पिढीला यश मिळाले ते ठोस कार्यक्रमामुळे नव्हे, तर कथानकामुळे आणि दुसऱ्या प्रभावी राजकीय घराण्याशी संधानामुळे..

Timeline-of-conflict-between-Israel-and-Palestinians-in-Gaza
इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे वैर कधीपासून आहे? आतापर्यंत कितीवेळा झाला संघर्ष?
Is Ukraines Counteroffensive Succeeding
विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्ध कोणत्या वळणावर आहे? युक्रेनचा प्रतिहल्ला यशस्वी ठरतोय का?
canadian pm justin trudeau reiterated allegations on india in killing of khalistani leader
भारताच्या ‘व्हिसाबंदी’नंतरही कॅनडाची ताठर भूमिका; खलिस्तानवादी नेत्याचे हत्याप्रकरण गांभीर्याने घ्यावे : ट्रुडो  
kim jong un meet putin
किम-रशिया यांच्यात लष्करी देवाणघेवाणीची शक्यता

गतशतकातले ऐंशीचे दशक म्हणजे जगभर राजकीय घडामोडींचे अस्वस्थ असे दशक. अमेरिका आणि सोव्हिएत संघराज्यादरम्यान अण्वस्त्रचाचणीबंदी आणि क्षेपणास्त्रघट करार होत होते, पण खुद्द सोव्हिएत संघराज्य अंतर्गत पोखरले जाऊन शकले होण्याच्या उंबरठय़ावर होते. त्याचा परिणाम म्हणजे पूर्व युरोपातील सोव्हिएत कुटुंबातील देश कम्युनिस्ट व्यवस्था झुगारून देऊ लागले होते. दुभंगलेला जर्मनी एकत्र होऊ पाहात होता. चीनमध्ये लोकशाहीवादी चळवळींचे विदारक दमनही याच दशकातले. या सगळय़ा घडामोडींमध्ये तुलनेने बिनमहत्त्वाचा असूनही ज्या देशाने जगाचे लक्ष वेधून घेतले, तो होता फिलिपिन्स. त्या देशातील अध्यक्षरूपी हुकूमशहा फर्डिनंड मार्कोस यांना तेथील जनतेच्या उठावासमोर नमते घ्यावे लागले आणि देशही सोडून परागंदा व्हावे लागले. जनआंदोलनाचा असा विजयी सुखान्त लोकशाही मूल्यप्रेमींसाठी आनंददायी, आश्वासक असाच. दमनपर्वातून बाहेर पडतानाच्या त्या सोनेरी क्षणांचे साक्षीदार असलेले अनेक जण आजही हयात आहेत. त्या फर्डिनंड मार्कोसच्या पाडावानंतर जेव्हा आज त्यांचेच वंशांकुर असलेले हे फर्डिनंड मार्कोस सत्ताधीश होताहेत, त्या वेळी या साक्षीदार मंडळींपैकी बहुतांची भावना हतबल उद्विग्नतेची असू शकेलही. परंतु या मार्कोस यांना जवळपास ५९ टक्के मते मिळाली आणि त्यांच्या पिताश्रींच्या पाडावानंतर झालेल्या प्रत्येक अध्यक्षीय निवडणुकीत आजवर इतक्या मोठय़ा मताधिक्याने कोणीही निवडून आलेले नाही. हे कसे काय घडले? मार्कोस कुटुंबीयांनी सत्तेवरून हकालपट्टी झाल्यावर देशाबाहेर पळून जाताना फिलिपिनोंची जी संपत्ती ओरबाडून लुटून नेली, त्याची मोजदाद अजूनही सुरू आहे. त्यापैकी जेमतेम अर्धी संपत्ती फिलिपिन्सच्या सरकारी तिजोरीत जमा झालेली आहे. शिवाय त्या लुटालुटीबद्दल किंवा त्या काळात केलेल्या अनन्वित अत्याचारांबद्दल मार्कोस कुटुंबीयांपैकी कोणीही एका शब्दानेही खेद व्यक्त केला नाही वा माफी मागितली नाही. या काही पूर्णत: विस्मृतीत जाव्यात इतक्या जुन्या घडामोडी नाहीत. तेव्हा नवे मार्कोस यांच्या यशोगाथेची चिकित्सा हतबल उद्विग्नतेतून होऊच शकत नाही. त्यासाठी अनेक घटकांचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त ठरते.     

त्यासाठी थोडे मागे जावे लागेल. फर्डिनंड मार्कोस थोरले हे १९६५ ते १९८६ इतका प्रदीर्घ काळ फिलिपिन्सच्या सत्ताधीशपदावर राहिले. अध्यक्षपदाची दुसरी टर्म संपण्याच्या वर्षभर अगोदर मार्कोस यांनी अवैध मार्गाने दीर्घकाळ सत्तेवर राहण्याची तयारी सुरू केली. विरोधकांची धरपकड करणे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी असे करता करता थेट लष्करी कायदा लागू करून तेथील पार्लमेंटलाच मार्कोस यांनी बरखास्त केले. १९७२ पासून सुरू झालेल्या या एकाधिकार कालखंडाला फिलिपिनो जनतेने आपल्या परीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण स्वत: निष्णात वकील असलेले मार्कोस यांनी तेथील न्यायपालिकेलाही वर्चस्वकक्षेत आणले. त्यामुळे त्यांच्या अत्याचारांविरुद्ध दाद मागण्याचा न्यायिक मार्गही बंद झाला. रस्त्यावरची आंदोलने होत होती आणि ती यथावकाश चिरडूनही टाकली जात होती. परंतु दडपशाहीमुळे पिचून-विझून जाण्याऐवजी जनतेतून प्रक्षोभ वाढतच होता. अत्याचार सुरू असतानाच मार्कोस कुटुंबीयांच्या ऐश्वर्यभोगाच्या कहाण्याही या असंतोषात भर घालत होत्या. सरकारी कर्जे वाढल्यामुळे कल्याणकारी योजनांवर, पायाभूत सुविधा उभारणीवर फार खर्च करता येत नव्हता. त्यामुळे लाखो गरीब फिलिपिनोंच्या हलाखीत भर पडत होती. पण त्याच वेळी मार्कोस कुटुंबीयांची अय्याशी वाढतच होती. मध्ययुगीन काळाला लाजवेल असे ऐश्वर्य मार्कोस यांच्या अध्यक्षीय प्रासादात दिसून यायचे. मार्कोस यांच्या बेबंद दडपशाही आणि निलाजऱ्या राहणीमानामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा स्फोट झाला १९८३ मध्ये. त्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मार्कोस यांचे प्रमुख विरोधक बेनिन्यो अक्विनो अमेरिकेतून फिलिपिन्समध्ये परतले, परंतु विमानतळावर उतरल्यानंतर काही क्षणांतच त्यांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. अक्विनो विलक्षण लोकप्रिय होते. त्यांच्या हत्येमागे मार्कोसच होते हे तपासण्याचीही गरज नव्हती. या घटनेतून उसळलेला जनक्षोभ पुढे मार्कोस यांच्या पतनास कारणीभूत ठरला. अक्विनो यांच्या पत्नी कोरी यांच्या पाठीशी फिलिपिनो जनता खंबीरपणे उभी राहिली. पुढे १९८६ मध्ये झालेल्या निवडणुकीत कोरी अक्विनो मार्कोस यांच्याविरोधात लढल्या. मार्कोस यांना विजयी घोषित केले गेले, परंतु त्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाले होते. मार्कोस यांच्याविरोधात फिलिपिन्समध्ये ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली, ज्यांना ‘पीपल पॉवर रिव्होल्यूशन’ असे संबोधले गेले. या क्रांतीचा रेटा निर्णायक ठरला आणि मार्कोस कुटुंबीयांना देश सोडून परागंदा व्हावे लागले. मार्कोस यांच्या पत्नी इमेल्डा यांनी जगभरातून जमवलेल्या ३०००हून अधिक वहाणजोडय़ा अध्यक्षीय प्रासादात आढळून आल्या. फ्रेंच सम्राज्ञी मारी आंत्वानेत यांच्या ‘भाकरी नाही तर केक खा’ या वाक्याइतकाच मुर्दाडपणा त्या वहाणप्रदर्शनातून प्रकटला. तरी फ्रेंचांपेक्षा फिलिपिनो अधिक सभ्य आणि क्षमाशील निघाले. त्यांनी मार्कोस यांना देश सोडून जाऊ दिले आणि फर्डिनंड यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मायदेशी परतू देऊन स्थिरावूही दिले.

संधीचा अचूक फायदा मार्कोस यांचे त्या वेळी युवावस्थेतील चिरंजीव फर्डिनंड ‘बाँगबाँग’ मार्कोस ज्युनिअर, त्यांच्या महत्त्वाकांक्षी मातोश्री इमेल्डा आणि भगिनी इमी यांनी उचलला. फिलिपिन्सच्या उत्तरेकडे मार्कोस यांच्या बालेकिल्ल्यात फिलिपिनो काँग्रेसची जागा, सिनेटची जागा, गव्हर्नरपद अशी पदे धनसंपत्तीच्या जोरावर जिंकून घेण्यात मार्कोस ज्युनिअर यशस्वी ठरले. त्याहीपेक्षा महत्त्वाचे कार्य त्यांनी हाती घेतले, ते होते ‘सुवर्णयुगाच्या स्मृतींना उजळा’ देण्याचे! मार्कोस थोरले यांचा काळ प्रगतीचाच नव्हता का, त्या काळात फिलिपिनोंचे काय वाईट झाले, उलट पायाभूत सुविधा आणि समृद्धीत भरच पडली ना, असे कथानक उभे करण्याचे आणि ते रुजवण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू झाले. एकीकडे मार्कोस यांनी लुबाडलेल्या संपत्तीचा हिस्सा फिलिपिन्सच्या सरकारी तिजोरीत परत आणण्यासाठी चौकशी आयोग काम करत असताना, आमची संपत्ती ही देशासाठीच जमवलेली होती. योग्य वेळ आली की आम्ही ती देशासाठीच वापरू, असा अविश्वसनीय दावा मार्कोस मंडळींनी केला. त्याहूनही अविश्वसनीय बाब म्हणजे, तो खरा मानून ‘मार्कोस युग’ पुन्हा अवतरावे यासाठी प्रार्थना करणाऱ्यांची संख्या वाढू लागली. गेल्या दहा वर्षांत समाजमाध्यमांतून या कथानकपेरणीचे प्रयत्न झाले. मार्कोस ज्युनिअर यांच्याकडे अध्यक्षीय निवडणूक लढवण्यासाठी जनतेसमोर मांडायचा कोणताही ठोस कार्यक्रम नव्हता. सत्तेवर आल्यावर जीवनमान बदलण्यासाठी अमुक करू वगैरे कोणतीही आश्वासने त्यांनी दिलेली नाहीत. केवळ फिलिपिन्समधील आणखी एक प्रभावी घराणे दुतेर्ते यांच्याशी संधान बांधून त्यांनी राजकीय विरोधाची धार कमी केली. रॉड्रिगो दुतेर्ते हे फिलिपिन्सचे मावळते अध्यक्ष, तर त्यांच्या कन्या सारा दुतेर्ते या फिलिपिन्सच्या भावी उपाध्यक्ष आणि मार्कोस यांच्या सहकारी. मार्कोस यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये त्या देशातील ग्रामीण आणि युवा मतदाराचा टक्का प्रचंड आहे.

या प्रारूपात आणखी एक बाब अधोरेखित होते. ती म्हणजे, निष्कलंक, निष्कपट, नि:स्पृह असल्याने जनाधार प्राप्त होतोच असे नाही. मार्कोस यांच्यासारखे निवडणुकीत विजयी होतात ते पाहून राजकीय निरीक्षक अवाक् होतात. कारण निवडणुका पारखण्याची त्यांची दृष्टीच कालबा ठरू लागली आहे. आज रोजच्या जगण्याची भ्रांत असलेल्या मतदारांना आकर्षक सादरीकरण आणि आधीच्या सरकारांच्या निष्क्रियतेचे कथानक यांच्या जोरावर जिंकून घेता येते, हे उमगलेल्या नेत्यांची संख्या जगभर वाढते आहे. ते सत्यकथन करतात का, किंवा निवडून आल्यावर वचनास जागतात का, याची भ्रांत निव्वळ अभ्यासकांपुरती मर्यादित राहिली आहे. फर्डिनंड मार्कोस ज्युनिअर यांचे बाँगबाँग हे टोपणनाव. या बाँगबाँग यांनी निवडणुकीत दाखवलेला मोठा धक्का राजकीय ‘बिग बँग’ ठरला. तो पहिला नव्हता आणि शेवटचाही नसेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bongbong marcos election victorious elections sight philippines marcos family generation political ysh

First published on: 13-05-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×