पहिल्या महायुद्धाला या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. या युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांनी केलेल्या लेखनातून या युद्धाची एक वेगळीच बाजू समोर येते. आणि ती तुकोबाच्या ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतर्बा मन आणि जग’ या अभंगाची प्रचीती देते. त्यातील निवडक पुस्तकांविषयी..
पहिले महायुद्ध हे विसाव्या शतकातले पहिले संकट होते, ज्याने नंतर संकटांची साखळी निर्माण केली. २५००० पोती भरतील एवढी पुस्तके व अभ्यासपूर्ण लेख या विषयावर प्रकाशित झाले आहेत. मराठीत मात्र दि. वि. गोखल्यांचे एकमेव नितांतसुंदर पुस्तक या विषयावर आहे.
युद्ध संपल्यानंतर साधारण दहा वर्षांनी त्याचे प्रतिसाद साहित्यात उमटू लागले. जे सनिक युद्धात लढले होते, त्यांच्या आठवणी वा अनुभव कविता, कथा आणि कादंबऱ्यांच्या रूपाने प्रसिद्ध होऊ लागले. त्याने शौर्य, कीर्ती, स्नेह, प्रेम, देशाभिमान, निष्ठा या शाश्वत समजल्या जाणाऱ्या मूल्यांविषयी शंका उपस्थित केल्या. अन्रेस्ट हेिमग्वे या युद्धात रुग्णवाहिकेचा चालक होते. युद्ध त्याने जवळून अनुभवले. ‘फेअरवेल टू आर्मस्’ ही त्याची कादंबरी १९२९ साली प्रकाशित झाली. त्यातल्या नायकाची युद्धात उद्ध्वस्त झालेल्या एका गावात अजूनही देशप्रेमात बुडालेल्या नव्या सनिकाशी गाठ पाडते. नायक त्याला म्हणतो, ‘‘ज्या गोष्टी देदीप्यमान वाटल्या होत्या त्या तशा नव्हत्या.. खरे तर कीर्ती, आदर, धर्य, समर्पण हे सगळे गलिच्छ शब्द आहेत, कृत्रिम आहेत. त्यांना कसलाही अर्थ नाही. फक्त नद्यांची, गावांची, माणसांची, रस्त्यांची, रेजिमेंटची नावे हेच शब्द खरे आहेत. त्यांना प्रतिष्ठा आहे.’’ हेच हेिमग्वेने युद्धाच्या आधी लिहिले असते तर ते कोणालाही कळले नसते. ही शोकांतिका कोणत्या एका देशाची नव्हती, ती सार्वत्रिक होती. जर्मन लेखक एरिक रिमार्के याच्या ‘ऑल क्वायट ऑन वेस्टर्न फ्रंट’ या कादंबरीच्या सुरुवातीलाच एक सनिक आपल्या मरणोन्मुख सहकाऱ्याचा बूट आपल्याला बरोबर होतो की नाही ते पाहत असतो.
‘द वर्ल्ड ऑफ यस्टरडे’ हे स्टीफन झ्वाइगचे आत्मचरित्र महायुद्धाच्या प्रारंभीचे युरोपचे मनोहारी चित्र उभे करते. तो लिहितो, ‘‘बागेत गर्दीपासून जरा दूर बसून मी पुस्तक वाचण्यात बुडून गेलो होतो. पुस्तक माझ्या अजून लक्षात आहे. मेरेशोव्हस्कीचे ‘टॉलस्टॉय अँड डोस्टोव्हस्की’. पुस्तकात मग्न असतानाही लोकांचा गजबजाट, पक्ष्यांचा किलबिलाट, संध्याकाळच्या वाऱ्याच्या मंद झुळका व त्यावर स्वार होऊन बागेच्या एका कोपऱ्यातून येणारे बँडचे मुलायम असे संगीत मला जाणवत होते. त्यातले बँडचे संगीत अचानक व अनपेक्षितरीत्या थांबले. ते थांबले तसे मी पुस्तकातून वर पाहिले. लोकांची हालचालही थांबली होती व बँडचे वादक वाद्य्ो गोळा करून जाऊ लागले. लोकांची गर्दी त्या वादकांच्या जागेवर जे पत्रक नुकतेच लावण्यात आले होते त्या दिशेने जाऊ लागली. ऑस्ट्रियाच्या सिंहासनाचा वारस असलेल्या फ्रान्झ फíडनांड व त्याच्या पत्नीची सर्बयिामधल्या साराजोव्हो येथे हत्या करण्यात आल्याचे त्यावर लिहिले होते.’’ महायुद्धापूर्वीच्या युरोपीय जनजीवन जाणून घ्यायचे असल्यास ‘द वर्ल्ड ऑफ यस्टरडे’ला पर्याय नाही.
 नेपोलिअनच्या युद्धानंतर १०० वर्षांनी हे युद्ध झाले. दरम्यान तंत्रज्ञान वेगाने पुढे गेले. त्याचा परिणाम युद्धावरही झाला. १८७० तो १९१४ या काळात १,८०,००० मलांचे रेल्वेचे जाळे युरोपात तयार झाले होते. जर्मन सेना विभागाने सनिकी तुकडय़ांच्या हालचालीसाठी ११,००० रेल्वे गाडय़ांचे टाइम टेबल तयार ठेवले होते. जर्मन-फ्रान्सच्या सीमेवर अनेक छोटी छोटी खेडी होती. त्या ठिकाणी मलभर लांबीचे फ्लॅटफॉर्म किती तरी आधीच बांधून तयार ठेवण्यात आले होते. युरोपच्या युद्धाबद्दलच्या कल्पना रेल्वेने पार बदलून गेल्या. खास्तीन वुल्मर या रेल्वेचा इतिहास लिहिणाऱ्या लेखकाने ‘इंजिन्स ऑफ वॉर’ या पुस्तकात रेल्वेला ‘शस्त्र’ म्हटले आहे.
युरोपातील लोकांच्या मनात युद्धाबद्दलच्या कल्पना अति रम्य होत्या. प्रारंभी रोमांचक वाटणाऱ्या युद्धाने त्या सुरू झाल्या होत्या; पण काही महिन्यांत युद्ध संपेल अशी अपेक्षा असताना त्याचे खंदकाच्या लढाईत रूपांतर झाले आणि ते लांबले. सनिकांचे युद्धकालीन जीवन कसे होते? रॉबर्ट ग्रेव्ह याचे ‘गुडबाय टू ऑल दॅट’ हे पुस्तक अजूनही यासाठी संदर्भ म्हणून वापरले जाते. तो लिहितो- ‘‘खंदकातले युद्ध हे क्रूर होते आणि त्यातले रोजचे जीवन हे कठीण व कंटाळवाणे होते. देशभक्तीचे नाव चुकूनही कोणी खंदकात काढत नसे. वर्तमानपत्रातल्या शौर्याच्या गोष्टींना खंदकातले सनिक हसत. घरी घडणाऱ्या गोष्टींचा पारिणाम सनिकांच्या मनावर होत असे. त्यासंबंधीची असाहाय्यता त्यांना घेरून टाके.’’ या संदर्भातली ग्रेव्हची आठवण चटका लावणारी आहे. तो लिहितो, ‘‘रात्रीच्या वेळी मी राऊंडवर होतो. पहाऱ्यावरचा एक सनिक मशीनगनच्या जाळीवर मान टाकून पडलेला दिसला. मी सनिकाच्या जवळ गेलो व त्याला हलवले. तसे माझ्या लक्षात आले की, त्याच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती. आपल्या बंदुकीची नळी त्याने तोंडात धरली होती व एका पायातला बूट व मोजा काढून त्याने पायाच्या अंगठय़ाने बंदुकीचा चाप ओढला होता. त्याने असे का केले, असे त्याच्या जोडीदाराला विचारताच तो म्हणाला, ‘‘सर, आज त्याचा कडेलोट झाला. आपल्या प्रेयसीच्या नवीन मित्राबद्दल त्याला आजच समजले.’’ चौकशी अधिकाऱ्याने म्हटले, ‘‘मी काही याची आत्महत्या म्हणून नोंद करत नाही. त्याच्या घरच्यांना लिहा की, त्याला शूराचे मरण आले.’’
जॉन किगान या ब्रिटिश लष्करी इतिहासकाराचे ‘द फर्स्ट वर्ल्ड वॉर’ हे पुस्तक हा महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. या युद्धाची जन्मकथा, शस्त्रांची वाहतूक, तंत्रज्ञान, वाटाघाटी, संहाराची भयानकता आणि त्याचे परिणाम असा अनेक अंगांनी विचार करणारे हे पुस्तक आहे. ‘द फेस ऑफ बॅटल’ हे किगानचे आणखी एक नावाजलेले पुस्तक. प्रत्यक्षात रणांगणावर काय घडते याचा विचार करून किगानने सॉमच्या लढाईबद्दल जे लिहिले आहे, ते अतिशय भयानक आहे.
युद्ध जर एवढे भयंकर आहे, तर सनिक का लढतोय, असा प्रश्न आपल्या ‘फेस ऑफ द बॅटल’ या पुस्तकात  किगानने विचारला आहे. तर तो नेहमीच लढतो असे नाही, असे उत्तर त्यानेच दिले आहे. भयंकर संहार व खंदकातल्या जीवनाला सनिक कंटाळले होते. प्रत्येक देशाच्या सन्यात बंडखोरीची प्रकरणे घडली. सॉमच्या लढाईत आक्रमणासाठी खंदकाबाहेर पडावे लागू नये म्हणून काही सनिकांनी स्वत:ला जखमा करून घेतल्या. अधिकारी वर्गाला या सर्वावर मात करून सनिकांचे मनोधर्य टिकवावे लागे. तोफगोळ्यांच्या स्फोटाने झाडे उन्मळून पडत व स्फोटाच्या आवाजाने सनिक गोठून जात. ‘ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार कैसा झुंजू’ असे तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची परिस्थिती होई. अशा वेळी तुकडीला आक्रमण करण्यासाठी बाहेर काढणे अत्यंत अवघड असे. ३०७ सनिकांना भित्रेपणासाठी गोळ्या घालण्यात आल्याची नोंद आहे.
 पॉल फ्युसेलने ‘द ग्रेट वॉर अँड मॉडर्न मेमरी’ हे आपले पुस्तक आपल्या अधिकाऱ्याला अर्पण केले आहे. ‘‘अधिकारी कसा असला पाहिजे हे मी त्याच्याकडून शिकलो होतो आणि ज्या कोणाची ऐकावयाची तयारी असेल त्याच्या समोर मरेपर्यंत या व्यक्तीविषयी बोलायची माझी तयारी आहे.’’ सनिक त्याच्या अधिकाऱ्यासाठी लढतो. निष्पाप, निष्कपट भावना व मानवी वृत्तींसंबंधीचे गोड अज्ञान यांना जोरदार धक्का या महायुद्धाने दिला. या युद्धाच्या स्मृती इंग्रजी भाषेने आणि साहित्याने ज्या प्रकारे जपल्या आणि त्यांना आकार दिला त्याचा वेध पॉल फ्युसेलने घेतला आहे.
जॉन मेसफिल्ड या कवीने ऑर्डर्ली म्हणून या युद्धात हॉस्पिटलमध्ये काम केले. तो आत्मचरित्रात लिहितो, ‘‘युद्ध ही भयानक गोष्ट आहे हे खरे आहे. त्यात धाडसाच्याही काही गोष्टी घडतात; पण भयानकतेकडे दुर्लक्ष करून केवळ धाडसावर लिहिणे हे जुनी मढी उकरण्यासारखे आहे. हे काम आपण अनेक वर्षे फावल्या वेळात घरी बसून करत आलो आहोत. ते करण्यात कसलेही शौर्य नाही.’’ एडमंड ब्लुनडेनच्या ‘अंडरटोन्स ऑफ वॉर’सारखे पुस्तक वा युद्धात सनिक म्हणून भरती झालेला जारोस्लाव हासेकचे ‘द गुड सोल्जर स्वेजक’ हे परत परत वाचण्यासारखे आहे. स्वेजकला त्याच्या घरी काम करणारी स्त्री म्हणते, ‘‘अखेर आपल्या फर्डिनांडला त्यांनी मारले तर.’’ तो विचारतो, ‘‘कोणचा फर्डिनांड? मला तर दोन फर्डिनांड माहीत आहेत. एक केमिस्टकडे निरोप्या म्हणून काम करतो, तर दुसरा गावातली कुत्र्यांची घाण गोळा करतो. यांपैकी कोणालाही मारले तरी आपले काहीही नुकसान नाही.’’ उपहासाची प्रसन्न पखरण हे या पुस्तकाचे वैशिष्टय़. या युद्धाने असे साहित्यिक दिले- ज्यांनी युद्ध जसे पाहिले- अनुभवले तसेच त्याबद्दल लिहिले. त्याला कोणतीही देशभक्तीची, शौर्याची, तत्त्वज्ञानाची झालर लावली नाही.
अशा अनेक पुस्तकांतून उलगडत गेलेली पहिल्या महायुद्धाची गोष्ट येथेच संपत नाही. पहिले महायुद्ध थांबले व हळूहळू त्याचे दुसऱ्या महायुद्धात रूपांतर झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Books on war
First published on: 15-11-2014 at 12:40 IST