जागतिकीकरणामुळे आलेले अनिवार्य बदल असोत की राजकीय, सामाजिक घडामोडींचे पडसाद; आजची तरुण पिढी सर्वच पातळ्यांवर स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडताना दिसते.  गेल्या दोन दशकांपासून जागतिकीकरणासोबत भारतात आलेल्या प्रत्येक बदलास तरुण पिढीनं सर्वाधिक स्वीकारल्याचं चित्र आहे. साहजिकच जागतिकीकरण, भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती आणि त्यासोबत झालेल्या विविध घटनांचा सरळसरळ प्रभाव तरुण पिढीच्या विचारांवर पडलेला आहे. या विचारप्रक्रियेचंच कहानीरूपात मंथन करणारं ‘अ मॅव्हरिक हार्ट : बिटवीन लव्ह अ‍ॅण्ड लाइफ’ हे रवींद्र शुक्ला यांचं पुस्तक सध्या सोशल नेटवìकग साइट्सवर गाजत आहे. तरुण पिढीला केंद्रस्थानी ठेवून लिखाण करणारे चेतन भगत, रवींदर सिंग, दुजरेय दत्त यांच्या पुस्तकांच्या पंगतीत सामील झालेलं नवं पुस्तक, असं या पुस्तकाबाबत म्हणता येईल.
अलीकडच्या काळातील अनेक लेखकांच्या कादंबऱ्यांच्या कथासूत्राचं व्यासपीठ बनलेल्या आयआयटीसारख्या उच्चशिक्षण संस्थेतून सुरू होणारी ‘अ मॅव्हरिक हार्ट’ची कथा गेल्या वीसेक वर्षांत भारतात झालेल्या बदलांचं चित्रण करते. मुंबई आयआयटीमध्ये शिकणारे तीन विद्यार्थी -राहुल, नीरव आणि रिचिता- कॉलेजजीवनात भेटतात. कौटुंबिक पाश्र्वभूमी आणि विचारांची दिशा पूर्णत: वेगळी असतानाही ते एकमेकांचे जिवलग मित्र बनतात, पण कॉलेज संपता संपता त्यांच्या या मत्रीला फाटे फुटतात आणि तिघे एकमेकांच्या विरुद्ध दिशांना ढकलले जातात. राहुलवर प्रेम असतानाही रिचिताला आईवडिलांच्या मर्जीने लग्न करून अमेरिकेत स्थायिक व्हावं लागतं. नीरव आपल्या कुटुंबाचा उद्योग सांभाळत त्यात आणखी भरभराट आणण्यासाठी रात्रंदिवस झटू लागतो, तर कहाणीचा नायक असलेला राहुल परदेशातील शिष्यवृत्ती गमावून बसतो आणि त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. टॅलेंटच्या नावाखाली शिक्षणात फोफावलेली स्पर्धा आणि समाजव्यवस्थेतील भ्रष्टाचार यामुळे पेटून उठलेला राहुल स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरोधात उभा ठाकतो. त्याचा हा संघर्ष, नीरव आणि रिचिताच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना, त्या वेळची सामाजिक परिस्थिती असा प्रवास करत ही कहाणी सुफळ, संपूर्ण होते ती या मित्रांच्या मीलनानेच.
अत्यंत उत्कंठावर्धक कथासूत्र असलेली ही कादंबरी अनेक गोष्टींमध्ये उजवी आहे. लेखक रवींद्र शुक्ला स्वत: आयआयटीचे विद्यार्थी असून बराच काळ अमेरिकेतही वास्तव्यास होते. त्यामुळे तीन मित्रांच्या कॉलेज जीवनातील प्रसंग खरेखुरे वाटतील इतक्या प्रभावीपणे मांडले आहेत. प्रत्येक घटनांना वर्ष आणि वेळेचा संदर्भ दिलेला असल्याने ही कादंबरी सत्यघटनेवर आधारित असल्याचा आभास निर्माण करते. या कादंबरीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, अवघ्या तीन-चार प्रमुख पात्रांच्या माध्यमातून सध्याच्या तरुण पिढीच्या मानसिकतेचे, त्यांच्यासमोरील आव्हानांचे केलेले चित्रण. कौटुंबिक व्यवसायात प्रगती करत नेणारा नीरव ‘करिअरकेंद्री’ तरुणवर्गाचे प्रतिनिधित्व करतो, तर पतीपासून विलग झाल्यानंतर अमेरिकेसारख्या देशात स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारी रिचिता तरुणींतील जिद्द दाखवून देते. समाजव्यवस्थेशी संघर्ष करणारा राहुल ‘आदर्श समाजा’ची स्वप्ने पाहणाऱ्या आणि त्यासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी आहे. शिक्षण, व्यवसाय आणि नोकरी या क्षेत्रांतील स्पर्धा स्वत:च्या प्रगतीसाठी योग्य असली तरी तिचा अतिरेक घातक ठरू शकतो. आणि त्यातून शेवटी हाती अपयश येते, असा संदेश तरुण पिढीला देण्याचा प्रयत्नही लेखकाने केला आहे.
आयआयटी, आयआयएम यांसारख्या उच्चशिक्षण संस्थांचं वातावरण, तेथे फुलणारी मत्री, शिक्षण संपल्यानंतर नोकरीसाठी होणारा संघर्ष, कॉर्पोरेट जगतात टिकाव धरण्यासाठी असलेली स्पर्धा, या स्पध्रेमुळे राजकीय व्यवस्थेशी येणारा संबंध, भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचा समाजावर होणारा परिणाम अशा एकमेकांत गुंतलेल्या साखळीत कथासूत्र बांधून लिहिल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांची सध्या चांगलीच चलती आहे. चेतन भगत, दुजरेय दत्त यांसारख्या नव्या दमाच्या लेखकांच्या वेगळ्या पद्धतीच्या मांडणीमुळे अशा कादंबऱ्यांना तरुण वाचकवर्गही मिळत आहे. त्याच वाचकवर्गाला आकर्षति करण्यासाठी ही कादंबरी लिहिली गेली आहे. चांगले कथासूत्र व जोडीला गेल्या दशकभरातील अनेक घटनांचे संदर्भ यामुळे ही कादंबरी वाचाविशी वाटते. मात्र, लेखकाची मांडणी आणि गोष्ट सांगण्याची शैली यातील कमकुवतपणामुळे काही वेळा रसभंग होतो. अनेक फुटकळ प्रसंग उगाच पानन्पान लांबले आहेत, तर बऱ्याच महत्त्वाच्या घटना कधी घडून गेल्या हे कळतही नाही. एका प्रकरणात एकमेकांशी नुसती ओळख झालेले राहुल आणि रिचिता पुढच्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच एकमेकांचे जिवलग मित्र बनतात, हा फरक इतका आहे की, मागे पाने पलटून आपण एखादे पान सोडले तर नाही ना, अशी शंका येते. कधी प्रथमपुरुषी तर कधी अचानक तृतीयपुरुषी अशी निवेदनाची शैलीही गोंधळात आणखी भर टाकते. पण तरीही कादंबरी वाचनीय आहे.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक