चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये (ओटीए) २०१० साली इतिहास रचला गेला. आणि आता येत्या २६ जानेवारी रोजी, राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही असाच नवा अध्याय लिहिला जाणार आहे. या दोन्ही घटनांमध्ये भारतीय सेना दलातील एकच महिला अधिकारी आहे- कॅप्टन दिव्या अजित कुमार..
 मित्रमैत्रिणींसोबत खेळण्या-बागडण्याच्या वयात दिव्याला खुणावत असे एनसीसीचा कडक पोशाख. शाळा, कॉलेज संपल्यानंतरही हा गणवेश घालूनच ती सर्वत्र वावरत असे. काहीही करून देशसेवेसाठी लष्करात जाण्याची तिची जिद्दच होती. यासाठी तिने मग अपार कष्ट व मेहनत घेतली. सर्व लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमताविषक चाचण्या पार केल्यानंतर तिला चेन्नईच्या ‘ओटीए’मध्ये प्रवेश मिळाला नसता तरच नवल. २०१० मध्ये या अकॅडमीचा दीक्षान्त सोहळा झाला. ६३ तरुणींसह २४४ जणांना लष्कराच्या सेवेत दाखल करून घेण्यात आले. सर्वाचे लक्ष लागलेल्या ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’चा मान कॅ. दिव्या यांना जाहीर झाला आणि तेव्हाचे लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दिव्याचे कौतुक केले. कारण लष्कराच्या इतिहासात महिला अधिकाऱ्याला हा बहुमान प्रथमच प्राप्त झाला होता. आणि आता पाच वर्षांनंतर, प्रजासत्ताक दिनी कॅ. दिव्या यांच्यावर लष्कर, नौदल आणि हवाई दलातील महिला तुकडींचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून सेना दलाच्या इतिहासात प्रथमच असे घडणार आहे. ‘आम्ही महिला सर्वच बाबतीत सक्षम असून युद्ध तुकडीतही सहभागी होण्याची आमची इच्छा आहे. लवकरच ती पूर्ण होईल,’ असा विश्वास व्यक्त करतानाच त्या तुकडीत आपलाही समावेश असेल, अशी आशा कॅ. दिव्या यांना वाटते.
बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या कॅ. दिव्या यांना नृत्याची आवड असून आपल्या कष्टप्रद आणि धकाधकीच्या दैनंदिन कामकाजातूनही भरतनाटय़म् या नृत्यप्रकाराचा सराव त्या नियमितपणे करतात. खेळामध्येही त्या मागे नाहीत. बास्केटबॉल आणि थाळीफेकीत त्यांना खूप गती आहे. गेली पाच वर्षे त्या लष्कराच्या हवाई संरक्षण तुकडीत कार्यरत असून कोणत्याही जबाबदारीच्या वेळी एक महिला म्हणून त्यांना कधीही डावलले गेले नाही, हे विशेष. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी असून त्यांच्या समक्ष सैन्य दलाच्या तिन्ही विभागांतील नारीशक्तीची ताकद संपूर्ण जगाला एक नवा संदेश देऊन जाईल यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Captain divya ajith first woman cadet in army to win the sword of honour
First published on: 23-01-2015 at 12:31 IST