रवींद्र महाजन auraent@gmail.com

शिक्षण मेकॉलेच्या कचाटय़ातून अद्याप सुटलेले नाही. तांत्रिक व पोटभरू शिक्षणावर एकांगी भर देण्याऐवजी भारतीय चिरंतन जीवनदृष्टीचा सांधा आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाला जोडून समतोल साधला पाहिजे..

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?

मागील दोन लेखांमध्ये आपण समाजविचार पाहिला. पाश्चात्त्य विचाराधारित सध्याच्या व्यवस्थांऐवजी यथाशीघ्र भारतीय चिंतनावर आधारित एकात्म मानव दर्शनप्रणीत व्यवस्थांकडे जाण्यासाठी शिक्षणपद्धतीत बदल करावे लागतील. कोणत्याही तत्त्वांना व्यावहारिक स्वरूप देण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. त्यातूनच पुढच्या पिढीत संस्कार, ज्ञान, रीतिरिवाज, जीवनशैली इत्यादी संक्रमित होतात. स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत शिक्षणाचा खूप प्रसार झाला असला, तरी अजूनही शिक्षण मेकॉलेच्या कचाटय़ातून सुटलेले नाही.

केवळ वैज्ञानिक, तांत्रिक व पोटभरू शिक्षणावर एकांगी भर दिल्याने मानवी मूल्यांची हानी होईल. आत्यंतिक भोगवादामुळे आज पाश्चिमात्य देशांना जसे अनेक सामाजिक, नैतिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तशीच वेळ आपल्यावरही येईल. म्हणून लोककल्याणकारी भारतीय चिरंतन जीवनदृष्टीचा सांधा आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाला जोडून समतोल साधला पाहिजे. 

वैशिष्टय़पूर्ण आध्यात्मिक, मानवतावादी तत्त्वज्ञानाबरोबरच भारतीयांची बौद्धिक क्षमताही जगप्रसिद्ध आहे. नवे युग हे ज्ञानयुग आहे, त्यात आपली ज्ञानसंपदा हा आपल्या प्रगतीचा आधार राहील. ज्ञानरचनावादात ज्ञाननिर्मितीकेंद्री, पर्यावरण संतुलनकेन्द्री, विद्यार्थी विकासकेंद्री आणि समाज विकासकेंद्री शिक्षणप्रणाली अपेक्षित आहे. समग्र व एकात्म दृष्टी, तत्त्वज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, जैविक तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, इ. तसेच हेतूपूर्ण व सफल जीवन या विषयांत भारत स्वत:च्या बौद्धिक क्षमतेच्या आधारावर झेप घेऊ शकतो. तेव्हा एकात्म मानव दर्शनाच्या प्रकाशात आपल्या शिक्षणाची पुनर्रचना (भारतीयकरण व अभिनवीकरण) करून हे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे.

प्राचीन पारंपरिक शिक्षण विचार

आपल्या देशात किमान पाच-सहा हजार वर्षांपूर्वीपासून ज्ञानपरंपरा अस्तित्वात आहे. वेद उपनिषद कालापासून ऋषी-मुनींच्या आश्रमशाळांत राजांची मुलेही सामान्यांच्या मुलांबरोबरच शिक्षण घेत असत. गुरुकुलपद्धतीतून विद्यार्थ्यांना श्रम, संयम, ज्ञानसाधना, प्रयत्नशीलता व सामूहिकता यांचे शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे मिळत असे. आधुनिक शिक्षणात हे कसे साधता येईल, यावर विचारमंथन व्हावे. काही मार्गदर्शक सुभाषिते..

१- मुक्ति हे ज्याचे गंतव्यस्थान आहे ते शिक्षण. -तैत्तिरीय उपनिषद

२- माणसाला चारित्र्यसंपन्न समाजोपयोगी बनविते ते शिक्षण. -याज्ञवल्क्य

३- मानवी शिक्षण म्हणजे निसर्गाकडून माणसाला मिळणारे प्रशिक्षण होय. -पाणिनी

४- देशउभारणीसाठी आवश्यक ते प्रशिक्षण व देशाविषयी प्रेम उत्पन्न करते ते शिक्षण. -कौटिल्य

५- मनुष्यात मुळात असलेल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. चारित्र्यनिर्मिती, मन:शक्तीची वाढ, बुद्धीचा विकास आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद ज्यातून मिळते, ते शिक्षण. -स्वामी विवेकानंद

६- जीवनाचे समग्र आणि एकात्म दर्शन ज्याद्वारे घडते तेच खरे शिक्षण. -जे. कृष्णमूर्ती

७- भावना, विचार, प्रेरणा यांचा सुसंवाद साधणे व सुसंवादी व्यक्तिमत्त्वाचे निर्भय स्त्री-पुरुष निर्माण करणे हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे. -जे. कृष्णमूर्ती

८. सोळा वर्षांपर्यंत स्वावलंबनाचे शिक्षण व सोळा वर्षांनंतर स्वावलंबनाने शिक्षण. -आचार्य विनोबा

शिक्षणाचा हेतू

शिक्षणाचा हेतू परिपूर्ण मानव घडवणे हा आहे. त्यासाठी चार गोष्टी जुळवाव्या लागतील- नैतिक आणि आध्यात्मिक उत्थान, सामाजिक सद्गुण (आत्मीय परस्परसंबंध, जबाबदारीची तयारी, देशभक्ती आणि पूर्णत्व) बाणवणे, शक्तीनिर्माण (शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक), व्यावसायिक क्षमतांचे व बुद्धीचे (उद्योजकता, उद्यमशीलता, व्यावसायिकता, सर्जनशीलता) उन्नयन.

शिक्षणाचा आशय

शरीर, मन, बुद्धी, आत्मा या चारही अंगांचे संतुलित पोषण व विकास व्हावा असे शिक्षण

१- शारीर ऊर्मी, गरजा यांचा समन्वित उपशम करण्याची क्षमता देणारे, उपजीविकाही समाविष्ट

२- मनाचा समतोल, संवेदनशीलता, संयम, एकाग्रता व निर्लिप्तता या मानसशक्तींचे संवर्धन करणारे, व्यक्तीतील मानव्याचा विकास व अंतिमत: शांती यांची प्राप्ती करून देणारे

३- अनुभूतिजन्य व बुद्धिगम्य ज्ञानाचे निरीक्षण, पृथक्करण, कार्यकारणभावनिश्चिती, व्यवस्थापन, उपयोजन, इष्टानिष्टविवेक, तारतम्य या क्षमता निर्माण करणारे विज्ञाननिष्ठा वाढविणारे; बुद्धिजन्य शिक्षण

४- व्यक्तीच्या आत्मीयतेचा परीघ, कुटुंब, परिसरसमूह, समाज, राष्ट्र, मानव्य, निसर्ग, विश्वात्मक तत्त्व येथपर्यंत विकसित करण्याची ऊर्मी व क्षमता वाढविणारे. याशिवाय व्यक्तिहित साधताना समाजहिताला बाधा येणार नाही, अशा व्यवस्थेसाठी योग्य मानसिकता, तसेच ऋणकल्पनेतून आलेली कर्तव्यभावना, शाश्वत विकास संकल्पना, निसर्ग संसाधनांचा संयत उपभोग, पर्यावरणाची जपणूक, प्रत्यक्ष कार्यानुभव अशा पैलूंवरही भर द्यावा लागेल.

अभ्यासक्रमाचा काही भाग देशभर समान असावा व उरलेला त्या प्रदेशानुसार ठरवावा.

शिक्षणाचे सिद्धांत

१ – मूल स्वत:च शिकते, शिक्षकांची भूमिका साहाय्यकाची असते. आचार्याच्या व्यक्तिमत्त्वातून उच्च तत्त्वे व जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी स्वरूपात संक्रमित  होतात.

२- एकाग्रता आणि निर्लिप्तता या दोन मूलभूत क्षमतांमुळेच व्यक्ती वेगाने शिकते.

३- विद्यार्थ्यांच्या निरोगी आणि वेगवान प्रगतीसाठी, त्याचा स्वत: परिपूर्ण होण्याचा ध्यास व प्रयत्नांबरोबरच परिसराशी आत्मीयतेचे संबंधदेखील पूरक. पुस्तकी शिक्षणाबरोबरच, थेट प्रयोग आणि अनुभव घेणे यांमुळे अर्थ लवकर समजतो.

४- सर्वागीण शिक्षणपद्धती स्वावलंबन, स्वाध्याय आणि कृतिप्रधानता यांच्यावर आधारित असावी.

५- मुलांची जन्मजात वृत्ती आणि क्षमतेप्रमाणे, व्यक्तीनुसार काही बाबींवर कमीजास्त भर हवा.

६- शिक्षणाद्वारे ज्ञान आणि वर्तनात बदल घडायला हवा. शिक्षणात चारित्र्यनिर्माण करणे जास्त महत्त्वाचे असले तरी चारित्र्यनिर्माण आणि कमाईक्षमता हे एकत्र गुंफणे आवश्यक आहे.

आचार्याचे महत्त्व

शिक्षकाचे ज्ञान, व्यक्तित्व, चारित्र्य, जीवनदृष्टी, प्रेम, संवेदनशीलता, ध्येयनिष्ठा, कर्तव्यतत्परता, न्यायबुद्धी, विवेक, राष्ट्रभक्ती, त्याच्या दैनंदिन आचारातून प्रकट व्हावयास हवेत. विद्यार्थी आपल्या निरीक्षक नजरेतून शिक्षकाकडे पाहत असतात. म्हणून शिक्षकाचे ‘आचरण’ आदर्शवत असावे. ही संकल्पना ‘आचार्य’ या संज्ञेतून व्यक्त होते.

शिक्षण क्षेत्र- व्यवस्था

शिक्षणव्यवस्था आपल्या जीवनदृष्टीवरच आधारित असली पाहिजे. शिक्षणक्षेत्र हे विद्यार्थीकेंद्री आचार्यप्रधान असले पाहिजे. शिक्षणव्यवस्थेची मूलतत्त्वे अशी असावीत-

१- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सुयोग्य विकास करण्याची क्षमता व गुणवत्तावर्धन हेच निकष शिक्षणव्यवस्थेसंबंधी असावेत.

२- शिक्षणक्षेत्र न्यायपालिकेसारखे स्वायत्त असावे. समाजातील संस्था व सक्षम व्यक्तींनी शिक्षणसंस्था काढून हे क्षेत्र सुयोग्यरीतीने समाजाच्या आधारावर सरकारी मदतीशिवाय चालवावे.

३- दहावीपर्यंतचे शिक्षण सर्वाना मोफत मिळावे.

४- परिसर शाळा हे सर्वसाधारण तत्त्व असावे.

५- दहावीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे. हिंदी, संस्कृत व इंग्रजी यांची सुयोग्य जोड द्यावी

६- सुयोग्य नियमनाअंतर्गत कोणालाही शिक्षणसंस्था चालवता आली पाहिजे, शिक्षकांना स्वत:च्या शाळा काढण्यास प्रोत्साहन द्यावे.

७ परदेशी मालकीच्या शिक्षणसंस्थांना बंदी. पण सर्व जगातून ज्ञानाचे स्वागत. परदेशी तज्ज्ञांचेही आवश्यकतेनुसार स्वागत. जगातील नव्या शिक्षणप्रयोगांचा अभ्यास

८- आपली पारंपरिक संशोधनपद्धती ही अनेकदा प्रचलित पाश्चात्त्य पद्धतीपेक्षा जास्त समुचित ठरू शकते. तिचा प्रसार झाला पाहिजे.

९- समाजविज्ञानशास्त्रांचे (समाजशास्त्र, समाजमानसशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीतिशास्त्र, मानववंशशास्त्र, अपराधशास्त्र) तातडीने भारतीयीकरण आवश्यक, कारण आपण अजूनही पाश्चात्त्यांची पाश्चात्त्य परिस्थितीसाठी लिहिलेली शास्त्रेच वापरत आहोत.

१०- वंचित तसेच स्त्रीवर्गाच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न आजही आवश्यक.

११- मागासवर्गासाठी आजही आरक्षणाची आवश्यकता आहे. पण हळूहळू मागासवर्गाच्या प्रगतीबरोबर त्याचे प्रमाण कमी होत होत ते समाप्त व्हावे. आरक्षणाबरोबर व नंतरही अशा गटांसाठी क्षमतासंवर्धनाचे विशेष कार्यक्रम राबवावेत.

१२- अरिवद आश्रम, गुरुकुले, रामकृष्ण मिशन, शांतिनिकेतन, नयी तालीम, ज्ञानप्रबोधिनी व तत्सम भारतीय शिक्षणप्रयोगांतील आवश्यक व शक्य तेवढा भाग राष्ट्रीय शिक्षणप्रणालीत घ्यावा.

१३- बाहेरील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींना शिक्षणपद्धतीतील अध्यापन, अनुभववर्धन इत्यादींत सहभागी करून घ्यावे.

१४- पालकांना शालेय शिक्षणव्यवस्थेत सहभागी करून घ्यावे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ घ्यावा.

१५- गुणवान शिक्षकांना विशेष प्रोत्साहन द्यावे.

१६- शिक्षणव्यवस्थेचा सतत आढावा घेऊन सुयोग्य बदल करीत राहावे. लेखक अभियांत्रिकी अधिस्नातक, व्यवस्थापन सल्लागार, तसेच स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ. भा. सहसंयोजक आहेत