डॉ. जयदेव पंचवाघ brainandspinesurgery60@gmail.com

मेंदूच्या आतल्या पाण्याच्या पोकळ्या सन १५१० पासून माहीत होत्या. आजार आणि उपचार यांवरलं संशोधन मात्र सन १८७५ नंतरचं..

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

मागच्या लेखात आपण मेंदूतील पोकळ्यांमध्ये हवा सोडून त्यानंतर कवटीचे एक्स-रे काढून मेंदूतील आजारांचं निदान करण्याची पद्धत १९१८ साली कशी सुरू झाली हे पाहिलं. या पद्धतीचे जनक डॉक्टर वॉल्टर डँडी यांचं मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया या शास्त्रातील योगदान इतर बाबतीतही मोठं आहे. कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला मेंदूत पाणी तुंबून दाब वाढण्याच्या आजारावर डँडी यांनी संशोधन सुरू केलं. मेंदूतील पोकळ्यांमध्ये तयार होणाऱ्या आणि त्या पोकळ्यांमधून बाहेर पडून मेंदू व मज्जारज्जूभोवती खेळणाऱ्या पाण्याचं अभिसरण काही कारणांनी अडलं, तर हे पाणी मेंदूमध्ये तुंबून होणारा आजार म्हणजे जलशीर्ष. (त्या काळात या आजाराबद्दल फारशी माहिती नव्हती).

डॉक्टर ब्लॅकफॅन यांच्यासह १९१३ च्या सुमाराला कुत्र्यांच्या मेंदूवर प्रयोग करून त्यांच्या मेंदूतील पोकळ्यांमध्ये अचानक अडथळा आला तर एकदम पाणी तुंबून जीवघेणं जलशीर्ष कसं होतं हे प्रयोग करून दाखवून दिलं. त्याचप्रमाणे अशा प्रकारे दाब वाढला असता प्राण्याच्या कवटीला छिद्र पाडून एका बारीक नळीद्वारे योग्य वेळात पाण्याचा दाब कमी केल्यास, बेशुद्ध होत चाललेला प्राणी परत एखादी जादू केल्यासारखा तरतरीत कसा होतो हेसुद्धा दाखवून दिलं.

जलशीर्षांचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारांच्या खोलात जाण्याची ही निश्चितच योग्य जागा नाही. पण मेंदू आणि मज्जारज्जूभोवती खेळणाऱ्या या पाण्याचा दाब वाढला असता हे पाणी बाहेर काढण्याचं तंत्र किंवा आतल्या आतच त्याचं अभिसरण करण्याची तंत्रं कशी निर्माण झाली हे उद्बोधक ठरावं.

शवविच्छेदनामुळे संशोधनाला गती

दुसऱ्या शतकात क्लॉडियस गॅलननं प्राण्यांच्या मेंदूतील पोकळय़ांबद्दल विस्तारानं लिहिलं आहे. त्या काळात मानवी शवविच्छेदनाला बंदी होती म्हणूनच बरीचशी निरीक्षणं,अनुमानं प्राण्यांच्या मेंदू रचनेवरून करण्यात यायची. १५ व्या शतकानंतर हळूहळू मानवी शवविच्छेदनं परत सुरू झाली.

खुद्द लिओनार्दो दा विंची याने मानवी मेंदूचं विच्छेदन करून काढलेलं, मेंदूच्या पोकळ्यांचं चित्र १५१० साली प्रसिद्ध झालं. त्याआधी, म्हणजे १५०५ साली, बैलाच्या मेंदूचं विच्छेदन करून त्यानं त्यातल्या पोकळ्यांचा अभ्यास केला होता. त्या पोकळ्यांत घातलेलं रंगीत द्रावण एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीत वाहत, सरतेशेवटी मेंदूच्या बाहेर येऊन त्याच्या आवरणाखाली साचतं हे त्यानं पाहिलं होतं. या पोकळ्यांची क्लिष्ट संरचना त्रिमितीमध्ये कळायला सोपी जावी म्हणून लिओनार्दोने त्या पोकळ्यांत पातळ केलेलं व प्रवाही असं रंगीत मेण घालून त्याचा साचा तयार केला होता. निरीक्षणाधारित विज्ञान अभ्यासाचा उदय होण्याचा हा काळ होता. त्याआधीची १५०० वर्ष निरनिराळ्या धर्मातील नियमांमुळे आणि धर्मगुरूंच्या जनमानसावरील आणि सत्तेवरील पकडीमुळे अशा प्रकारच्या अभ्यासाला बंदी होती.

ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतरची ही १५०० वर्ष होती. या काळात तीन नवीन धर्माची स्थापना झाली. (ख्रिश्चन, बौद्ध व मुस्लीम). वेगवेगळे नियम धर्मगं्रथांमधून लिहून आणि त्या विपरीत वागणे अमान्य ठरवून त्या आधारावर लोकांना शिक्षा देण्याचे उद्योग अखंड चालू होते. त्यापैकीच एक नियम शवविच्छेदन करण्यावर बंदी घालणारा होता. ज्या अभ्यासातून निसर्गातील सत्यापर्यंत पोहोचता येण्याची शक्यता होती, त्या अभ्यासाचा या धर्मसत्तेच्या प्रमुखांना तिटकारा होता.

१८७५ च्या नंतर..

साधारण इस १५०० ते १८७५ पर्यंतच्या काळात मेंदूच्या पोकळ्यांवर (व्हेंट्रिक्युलर सिस्टिम) अनेक व्यक्तींनी प्रयोग केले. मात्र मेंदूतील पाण्याची निर्मिती गुलाबी व लुसलुशीत दिसणाऱ्या आणि पोकळय़ांच्या कडांना लगडलेल्या ‘कोरोईड प्लेक्सस’पासून होते, त्यानंतर हे पाणी मेंदूतील एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीत वाहत जाऊन बाहेर पडतं आणि त्याचं अभिसरण होऊन सरतेशेवटी परत रक्तात शोषलं जातं. ही जी प्रक्रिया आज आपल्याला पूर्णपणे माहीत आहे, त्याची त्या काळी संपूर्ण माहिती नव्हती. ही गोष्ट सर्वप्रथम हेंड्रिक की (‘ी८) आणि मॅग्नस रिट्झियस यांनी १८७५ मध्ये सर्वप्रथम शोधली. हा मज्जासंस्थेच्या कार्यासंबंधीच्या अत्यंत महत्त्वाच्या शोधांपैकी एक शोध होता.

जलशीर्ष या आजाराचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यांच्यावर उपाययोजनासुद्धा बऱ्याच प्रकारच्या आहेत. त्यासाठी ही जागा अपुरी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे मेंदूतील पोकळ्यांमध्ये अचानक अडथळा निर्माण झाला आणि काही तासांत पाणी तुंबलं तर ती गंभीर परिस्थिती असते. असं झाल्यास लवकरात लवकर मेंदूचा सी. टी. स्कॅन किंवा एम.आर.आय. करून निदान निश्चित करून पाण्याचा दाब कमी करावा लागतो. दुसऱ्या प्रकारचा जलशीर्ष हा हळूहळू वाढत जातो. म्हणजे या प्रकारात पाण्याचा निचरा होण्याच्या प्रक्रियेतील अडथळा हा अगदी हळूहळू तयार होत जातो. अशा प्रकारच्या जलशीर्षांमध्ये व्यक्ती अचानक बेशुद्ध होत नाही तर काही दिवसांच्या किंवा महिन्यांच्या कालावधीत ही लक्षणे वाढत जातात. अशा प्रकारच्या आजारात तपासणी करून उपचार करता येतात.

जलशीर्षांचे हे दोन प्रकार सोडून आणखी एक प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. या प्रकाराला एनपीएच (ठढऌ) या नावानं ओळखलं जातं. या आजारात मेंदूतील पोकळ्यांमधला पाण्याचा दाब दिवसातला काही वेळ वाढलेला राहतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा दाब वाढण्याच्या ‘लाटा’ अधूनमधून येत राहतात. इतर वेळी हा दाब जवळपास‘नॉर्मल’ होतो. म्हणून या आजाराला नॉर्मल प्रेशर हायड्रोसिफॅलस हे नाव आहे अर्थात याचा शब्दश: अर्थ घेतल्यास दिशाभूल होण्याची शक्यता आहे! कारण ‘नॉर्मल’ दाब असेल तर आजार कसा? पण हे नाव याला चिकटलं आहे.

‘एनपीएच’ हा आजार विशेष करून वृद्धापकाळात होतो. पण क्वचित त्याआधीही होऊ शकतो. या आजाराच्या लक्षणांमध्ये लघवीवरचं नियंत्रण जाणं म्हणजे लघवी होणार असल्याची भावना निर्माण झाल्यानंतर बाथरूमपर्यंत जायच्या आतच ती होणं याचा समावेश आहे. दुसरं लक्षण म्हणजे चालण्यात फरक पडणं. छोटी छोटी पावलं टाकत व पुढं नेमकं कसं चालायला पाहिजे हे न कळल्यास माणूस जसा भांबावलेल्या पद्धतीने चालेल तसं हे चालणं असतं. त्याला नेमकं तोल जाणं असंही म्हणता येणार नाही. इंग्रजीत याला ‘अप्रॅक्सिया’ म्हणतात. तिसरं लक्षण म्हणजे व्यक्तीचा बुद्धय़ांक कमी होत चालला आहे असं आजूबाजूच्या लोकांना वाटणं. वारंवार विसरणं, बौद्धिक स्थिती गोंधळलेली राहणं इत्यादी.

आता हीच तीनही लक्षणं वृद्धापकाळात मेंदूची झीज झाल्यावरसुद्धा दिसू शकतात.

त्या वेळी मात्र ही लक्षणं दिसल्यास फारसे उपचार करता येत नाहीत. पण एनपीएचमुळे हा आजार असल्यास पाण्याचा दाब नियंत्रित पद्धतीने कमी करून यावर उपाय होऊ शकतो. फक्त या लक्षणांचा अन्वयार्थ लावण्यामधील गडबडीमुळे एनपीएचचं निदानच बऱ्याच वेळा होत नाही किंवा खूप उशिरा होतं.

सांगण्याचा मुद्दा असा की वयोमानानुसार काही व्यक्तींमध्ये उत्तरोत्तर विसरभोळेपणा वाढत जाणं, चालताना तोल जाणं आणि लघवीवर नियंत्रण न राहणं ही जी लक्षणं दिसतात ती बरी करणं अवघड असतं. मात्र, अगदी अशीच दिसणारी लक्षणं एनपीएच या आजारात दिसू शकतात आणि योग्य वेळी निदान झाल्यास एनपीएच बरा होऊ शकतो.

जलशीर्षांची उपाययोजना त्याच्या नेमक्या प्रकारावर ठरते. मेंदूतील पोकळीमधून सुरू झालेली नळी त्वचेखालून नेऊन पोटाच्या पोकळीमध्ये सोडणं, (व्हेंट्रिक्युलो पेरिटोनियल शंट) ही या आजारासाठी करण्यात येणारी सर्वात सर्वमान्य शस्त्रक्रिया. मात्र अशा प्रकारच्या नळीतून जो मेंदूतील पाण्याचा निचरा होतो तो त्यावर अधिक नियंत्रण असावं म्हणून या नळीमध्ये दाब मोजू शकणारी एक अत्यंत संवेदनशील ‘व्हॉल्व्ह’ असते. मेंदूतील दाब एका विशिष्ट प्रमाणाच्या वर गेला तरच मेंदूतील पाणी काही प्रमाणात पुढं सोडलं जातं. या नळ्यांच्या (शंट) प्रकारांमध्ये अनेक प्रकार आहेत. काही प्रकारच्या जलशीर्षांमध्ये उपयोगी ठरू शकणारी आणखी एक पद्धत म्हणजे मेंदूच्या पोकळीत एण्डोस्कोप घालून त्या पोकळीच्या तळाला साधारण एक सेंटीमीटरचं छिद्र तयार करणं. ही मेंदूच्या अगदी खोलवरच्या भागातील शस्त्रक्रिया असली तरी एण्डोस्कोप वापरल्यामुळे वीसएक मिनिटात संपते.

शस्त्रक्रियांचे जनक

१९२० पासून पुढची २० वर्षे डॉ वॉल्टर डँडी यांनी जलशीर्षांवर केललं संशोधन आजही अमूल्य आहे. त्याचबरोबर न्यूरोसर्जरीतील इतरही क्षेत्रात त्यांचं विस्तृत संशोधन आहे. त्या संशोधनांची व्याप्तीच इतकी आहे की लेखाची सांगता करण्याआधी डँडीने न्यूरोसर्जरीत केलेल्या संशोधनाची फक्त उजळणी करणंच शक्य आहे.

मेंदूच्या रक्तवाहिन्यांना येणारा फुगा (न्यूरिझम) छोटी क्लिप लावून बंद करण्याची शस्त्रक्रिया त्यांनीच प्रथम केली. व्हेस्टिब्युलर श्वानोमा ही अवघड समजली जाणारी गाठ पूर्णपणे काढून टाकण्याची पहिली शस्त्रक्रिया, पायनियल ग्रंथीवरील शस्त्रक्रिया, तीव्र चक्कर येण्याच्या आजारावर उपयुक्त ठरणारी मेंदूची शस्त्रक्रिया.. अशा अनेक शस्त्रक्रियांचे जनक डॉ. वॉल्टर डँडी होत.

चेहऱ्याच्या नसेच्या असह्य दुखण्यावर त्या काळची उपचार पद्धती (नसेचे विशिष्ट तंतू मेंदूच्या जवळ कापून टाकायचे) त्यांनी प्रथम शोधली.

डॉ. डँडीसारख्या व्यक्तींची प्रतिभा आणि कार्यच इतकं मोठं आहे की अनेक पानं पुरणार नाहीत.

तूर्तास इथेच थांबतो.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.)