scorecardresearch

सांस्कृतिक क्रांतीचा वारसा

सांस्कृतिक क्रांतीच्या या विस्फोटाला या महिन्यात ५० वर्षे होत आहेत.

सांस्कृतिक क्रांतीचा वारसा
राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या कार्यप्रणालीमुळे अनेकांना सांस्कृतिक क्रांतीची आठवण होऊ लागली आहे.

चीनमधील सांस्कृतिक क्रांतीच्या दोन महत्त्वाच्या कार्ययोजना म्हणजे साम्यवादी पक्षातील जे कोणी माओच्या तत्त्वज्ञानाशी एकनिष्ठ नसतील त्यांचे शुद्धीकरण करायचे, अन्यथा उच्चाटन करायचे. सांस्कृतिक क्रांतीच्या या विस्फोटाला या महिन्यात ५० वर्षे होत आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या राजकीय मोहिमांमधूनही क्रांतीसदृश परिस्थितीची भीती अनेकांना जाणवते आहे.
चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांनी सध्या राबवलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेने जनतेत वैषम्याची भावना उत्पन्न होत असल्याचा अनेक अभ्यासकांचा दावा आहे. याला कारण आहे, भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत अनेकांवर होत असलेल्या कारवायांच्या जोडीला चीनमधील मर्यादित विचारस्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. यामुळे अनेकांना चीनमधील सांस्कृतिक क्रांती काळाची आठवण होऊ लागली आहे. सांस्कृतिक क्रांतीचा विस्फोट झाला, त्याला या महिन्यात ५० वष्रे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही तुलना अपरिहार्य आहे. चीनमध्ये सध्या हयात असलेल्या वरिष्ठ पिढीच्या मनपटलावर माओ त्से तुंगची सांस्कृतिक क्रांती आणि सन १९८९ मधील तिआनमेन चौकातील घटना खोलवर कोरल्या गेल्या आहेत. दुसरीकडे, सांस्कृतिक क्रांतीच्या आठवणी पूर्णपणे पुसून टाकायच्या नाहीत, मात्र त्या काळासंबंधी फारशी चर्चाही घडू द्यायची नाही, असे धोरण चीनच्या साम्यवादी पक्षाने अगदी अलीकडच्या काळापर्यंत अमलात आणले आहे. साम्यवादी पक्षासह त्या काळाचा अनुभव घेतलेल्या सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवणारी ही तथाकथित सांस्कृतिक क्रांती होती तरी काय?
चीनमध्ये समाजवादी गणराज्याची स्थापना झाल्यानंतर देशाचे नेतृत्व माओकडे होते, पण साम्यवादी पक्षात आíथक धोरणांवरून दोन गट पडले होते. माओला समाजवादी संरचना निर्माण करण्याची आणि त्यातून साम्यवादाकडे वाटचाल करण्याची घाई झाली होती. परिणामी त्याला शेत-जमिनीसह सर्व उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण करायचे होते. दुसऱ्या बाजूला, लीऊ शाओची आणि डेंग शियोिपग यांच्या गटाला सावधपणे समाजवादी व्यवस्थेला ठोस रूप द्यायचे होते. समाजवादाच्या प्राथमिक अवस्थेत शेतकरी कुटुंबांचा काही प्रमाणात जमिनीवरील हक्क तसेच छोटे उद्योजक व सेवा क्षेत्रातील छोटे-मोठे व्यापारी इत्यादींची अर्थव्यवस्थेतील भूमिका महत्त्वाची असेल अशी या गटाची भूमिका होती. लीऊ आणि डेंग यांची मांडणी अधिक योग्य होती, याबाबत आता काही सन्माननीय अपवाद वगळता, समाजवादी अर्थतज्ज्ञांचे एकमत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे साम्यवादी पक्षाच्या अर्थकारणातील नेमक्या भूमिकेवरून या दोन गटांमध्ये कमालीचे मतभेद होते. राष्ट्रीयीकृत शेती आणि उद्योग यांच्यावर साम्यवादी पक्षाने नियंत्रण स्थापन करून सर्वाच्या गरजा पूर्ण होतील एवढे उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित करावे ही लीऊ आणि डेंग गटाची धारणा होती. उत्पादनाच्या समान वितरणाची जबाबदारी साम्यवादी पक्षाने आपल्या शिरावर घ्यावी असा त्यांचा आग्रह होता. या दृष्टिकोनाला माओचा तात्त्विक विरोध नव्हता. मात्र, राष्ट्रीयीकृत शेती व उद्योगधंद्यांवर पकड बसवल्यानंतर साम्यवादी पक्षातच भांडवली प्रवृत्ती विकसित होऊन समाजाचे दोन वर्गात विघटन होईल, अशी माओची भीती होती. साम्यवादी पक्ष हा ‘आहे रे’ वर्ग आणि सर्व जनता ही ‘आहे रे’ वर्गावर विसंबलेला वर्ग! या दुसऱ्या वर्गाच्या दैनंदिन गरजा जरी पूर्ण होणार असल्या तरी अपेक्षित असलेली समानता समाजात प्रत्यक्षात उतरणार नाही ही माओची खंत होती. साम्यवादी पक्षाच्या नेतृत्वात अर्थव्यवस्था उभारणीच्या ‘सोविएत मॉडेल’ला माओने स्पष्ट पर्याय दिला नाही. मात्र, या मॉडेलमधून अपरिहार्यपणे निर्माण होणाऱ्या साम्यवादी पक्षातील भांडवलशाही प्रवृत्तींचे उच्चाटन करण्याची प्रक्रिया अविरत सुरू असावी हा माओचा आग्रह होता. पुढे-पुढे माओला प्रकर्षांने जाणवायला लागले की साम्यवादी पक्षातच भांडवलशाही प्रवृत्तींच्या विरुद्ध अविरत संघर्ष करत राहणे अशक्य आहे. त्याऐवजी भांडवलशाही प्रवृत्तीच निर्माण होणार नाही अशी व्यवस्था तयार करणे अधिक गरजेचे आहे. म्हणजेच ज्या-ज्या बाबींमुळे भांडवलशाही प्रवृत्ती तयार होऊ शकते त्यांनाच समूळ नष्ट करायचे ज्याला माओने ‘कामगारांची महान सांस्कृतिक क्रांती’ असे नाव दिले. सोविएत संघाच्या पतनानंतर माओची साम्यवादी भांडवलशाहीची भीती दुरापास्त नव्हती याची अनेकांना खात्री पटली आहे.
सांस्कृतिक क्रांतीच्या दोन महत्त्वाच्या कार्ययोजना होत्या. एक, साम्यवादी पक्षातील जे जे कोणी माओच्या तत्त्वज्ञानाशी एकनिष्ठ नसतील त्यांचे शुद्धीकरण करायचे, अन्यथा उच्चाटन करायचे. यांत, कोण एकनिष्ठ नाही हे ठरवण्याचे सर्वाधिकार माओ व त्याच्या समर्थकांना होते. दोन, समाजांतील चार जुनाट प्रवृत्तींना समूळ नष्ट करायचे. या चार जुनाट प्रवृत्ती होत्या- परंपरा, संस्कृती, सवयी आणि विचार! धर्मगृहे व धर्मग्रंथ, प्राचीन हस्तलिखिते व कलाकृती तसेच ऐतिहासिक स्मारक असलेल्या क्रांतीपूर्व काळातील इमारती हे सर्वच प्रतिगामी प्रवृत्तींना चालना देणारे मानले जाऊन त्यांना नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. या दोन्ही कार्ययोजनांवर अंमल करण्यासाठी प्रत्येक कार्यस्थळी माओ समर्थक युवकांनी ‘रेड गार्ड’च्या शाखा स्थापन केल्या. माओचे तत्त्वज्ञान असलेले ‘लिटिल रेड बुक’ वाचून भारावलेल्या रेड गार्ड्सला प्रत्यक्ष माओने ‘मुख्यालयावर बॉम्बवर्षांव’ करा असा आदेश दिल्याने चीनमध्ये गृहयुद्धसदृश परिस्थिती तयार झाली. सन १९६६ ते १९६८ या काळात प्रत्येक कार्यस्थळी रेड गार्ड विरुद्ध साम्यवादी पक्ष असा संघर्ष होऊन रेड गार्डची सरशी झाली. कार्यस्थळी ‘लाल विरुद्ध तज्ज्ञ’ हा अनावश्यक संघर्ष तयार करण्यात येऊन विषयातील तज्ज्ञांपेक्षा मार्क्‍सवादी तत्त्वज्ञानाचे जाणकार अधिक महत्त्वाचे हे िबबवण्यात आले. सन १९६९ पर्यंत माओच्या पक्षांतर्गत विरोधकांचे उच्चाटन झाले होते मात्र राजकीय अनागोंदीचा अर्थव्यवस्थेवर भीषण परिणाम झाला होता. असे म्हणतात की, रेड गार्ड्सने माओचे चित्र असलेले फलक एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बनवले की उद्योग क्षेत्रात स्टीलची टंचाई झाली. खुद्द माओला उद्वेगाने म्हणावे लागले की ‘मला माझी विमाने परत द्या’ कारण त्यासाठी आवश्यक स्टील चीनमध्ये उपलब्ध नव्हते. माओने तयार केलेल्या रेड गार्ड्सच्या भस्मासुराला अखेर त्यानेच जेरबंद केले. शहरी भागांत सांस्कृतिक क्रांतीची उद्दिष्टे यशस्वी झाल्याचे सांगत त्याने रेड गार्डस्ला ग्रामीण भागात जाण्याचे आदेश देत त्यांची पांगापांग केली. अधिकृतपणे सांस्कृतिक क्रांतीचा काळ १९६६ ते १९७६ (माओचे निधन) सांगण्यात येत असला तरी सन १९७० नंतर माओने सावरासावर करण्याचाच अधिक प्रयत्न केला.
सांस्कृतिक क्रांतीमुळे चीनच्या साम्यवादी पक्षाने तसेच माओने जनमानसातील प्रतिष्ठा गमावली. याची जाणीव डेंग शियोिपगला होती. पुढे डेंगच्या नेतृत्वात चीनच्या साम्यवादी पक्षाने सांस्कृतिक क्रांतीच्या प्रयोगाला अपयशी ठरवत माओ व त्याच्या पाठीराख्यांना यासाठी जबाबदार ठरवले. मात्र यामुळे माओने चीनच्या क्रांतीत आणि नंतरच्या जडणघडणीत दिलेल्या एकूण योगदानाचे अवमूल्यन करता येणार नाही हेसुद्धा ठणकावून सांगितले. सांस्कृतिक क्रांतीसदृश परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची जाहीर ग्वाही डेंगच्या साम्यवादी पक्षाने दिली. यंदा, सांस्कृतिक क्रांतीच्या पन्नाशीला, पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘पीपल्स डेली’ वर्तमानपत्राच्या अग्रलेखात याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. त्याचबरोबर, सांस्कृतिक क्रांतीचे मुडदे खणून काढत साम्यवादी पक्षाला बदनाम करू पाहणाऱ्यांना इशारासुद्धा देण्यात आला आहे. सांस्कृतिक क्रांतीच्या अनुभवाचे तीन दूरगामी राजकीय परिणाम चीनमध्ये बघावयास मिळतात. एक, लीऊ आणि डेंग यांच्या आíथक धोरणांची सरशी होत आíथक सुधारणांना सुरुवात झाली. दोन, साम्यवादी पक्षाचे नेतृत्व मोडीत निघणे म्हणजे अराजकाला आमंत्रण ही डेंगसारख्या कट्टर मार्क्‍सवादी नेत्यांची धारणा अधिक प्रबळ झाली. तीन, साम्यवादी पक्षामध्ये व्यक्तिकेंद्रित राजकारण होणे आणि साम्यवादी नेत्यांची वलयांकित प्रतिमा तयार करणे धोकादायक असल्याचे सामूहिक मत तयार झाले. आजच्या घडीला, क्षी जिनिपग यांची कार्यप्रणाली व्यक्तिकेंद्रित व वलयांकित राजकारणाकडे झुकणारी असल्याने त्यांच्या राजकीय मोहिमांमधून सांस्कृतिक क्रांतीसदृश परिस्थितीची भीती अनेकांना जाणवू लागली आहे.

 

परिमल माया सुधाकर
लेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट,
पुणे येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.
त्यांचा ई-मेल : parimalmayasudhakar@gmail.com

मराठीतील सर्व चीन-चिंतन ( Chin-chintan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या