‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक पदावर चित्रा रामकृष्ण यांची निवड जाहीर होणार, हे अपेक्षितच होते.   ‘एनएसई’ अशा लघुनामानेच ओळखल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या स्थापनेपासून, म्हणजे गेली १३ वर्षे याच संस्थेतील विविध अधिकारपदांवर काम करण्याचा अनुभव चित्रा यांच्याकडे आहे. एनएसईचे पहिले संचालक डॉ. रामचंद्र एच. पाटील यांनी ही संस्था अक्षरश शून्यातून घडवली, तेव्हा त्यांनी स्वत माणसे हेरली आणि त्यांना नवे काम दिले. जागतिकीकरण आणि वाढलेला पैशाचा ओघ यांची आव्हाने पेलून आर्थिक संस्थांत नवे नेतृत्व देऊ शकणारे हे जे निवडक तरुण होते, त्यांत चित्रा रामकृष्ण यांचा समावेश होता. त्याआधी आयडीबीआय (भारतीय औद्योगिक विकास बँक) या त्यावेळी नुकत्याच खुल्या स्पर्धेत उतरलेल्या बँकेत त्या अधिकारपदावर होत्या. ‘सेबी’ची- म्हणजे शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या राष्ट्रीय यंत्रणेचीही स्थापना झालेली नव्हती, तेव्हा ‘सेबी’चे नियम बनवण्यासाठीच्या पथकात त्यांचा समावेश झाला. तेथूनच पाटील यांनी त्यांना हेरले आणि ‘एनएसई’त आणले. ‘हे वळण माझ्या आयुष्याला दिशा देणारे ठरले’ असे चित्रा  नेहमीच सांगतात. सध्या त्या एनएसईच्या उप व्यवस्थापकीय संचालक आहेत. हे पद त्यांच्याकडे सहा वर्षांपूर्वी आले, तेव्हा मुंबई शेअर बाजारापेक्षा एनएसईमध्ये नोंदणी झालेल्या कंपन्यांची संख्या अधिक झालेली होती. यापुढे आपल्या संस्थेची  व्याप्ती वाढवण्यासाठी ग्राहक वाढले पाहिजेत, असे चित्रा यांनी ठरवले आणि अगदी मध्यमवर्गीय शेअर-गुंतवणूकदारांसाठी खास आर्थिक साक्षरता कार्यक्रम सुरू केला.  छोटे आणि मध्यम उद्योग शेअर बाजाराच्या गदारोळापासून दूर तरी राहतात किंवा बाजूला पडतात, हे चित्र बदलण्यासाठी चित्रा यांनी प्रयत्न सुरू केले आणि या ‘एसएमई’ उपक्रमाला यशदेखील येऊ लागले. ही धडाडी दाखवत असताना, मीडियाच्या झोतापासून संधी असूनही दूर राहण्याची कला त्यांना अवगत आहे. पाच वर्षांपूर्वीपासून त्यांचा समावेश भारतातील २५ ‘समर्थ महिलां’मध्ये (पॉवर विमेन) होतो. ‘एनएसई’चे पद एक एप्रिल २०१३ पासून त्यांच्याकडे आल्यावर हे सामथ्र्य आणखी वाढेल.