दुर्गा खोटे यांनी सन १९३६ मध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण केले, लीला चिटणीस १९३७, तर नलिनी जयवंत १९४१ पासून चित्रपटांत दिसू लागल्या. या साऱ्या महाराष्ट्रीय सुशिक्षित, मध्यवर्गीय वा उच्च मध्यमवर्गीय घरांतल्या महाराष्ट्रीय अभिनेत्रींनंतर तशीच कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या, पण अविभाजित पंजाबच्या उमा कश्यप १९४६ मध्ये ‘कामिनी कौशल’ या नावाने चित्रपटसृष्टीत आल्या. नलिनी जयवंत आणि पुढे १९४९ मध्ये उषा किरण यांना नायिका म्हणून हेरणारे दिग्दर्शक चेतन आनंद यांनीच कामिनी कौशल यांचे हे पदार्पण घडवून आणले. त्या दोघींसारखीच लहान चण, गोड चेहरा आणि बोलके डोळे तसेच आवाजातही गोडवा यांमुळे त्यांना यशही मिळाले. तेव्हापासूनच्या पाऊणशे वर्षांत आई आणि आजीच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन शुक्रवारी, वयाच्या शंभरीला अवघी दोन वर्षे उरली असताना झाले.

त्यांचे वडील वनस्पतीशास्त्रज्ञ. मुलीला अभिनयाची आवड जपण्यास प्रोत्साहन देणारे. फाळणीचा पायरव ओळखून आधीच दिल्लीत आले. पण या शिक्षित कुटुंबातही, ‘थोरली मुलगी वारली, आता तिच्या दोन मुलींच्या सांभाळासाठी अविवाहित धाकटीने मेहुण्यांशी लग्न करावे’ ही रूढी पाळली गेली. ‘हम आपके है कौन’ न होता, कश्यपांच्या घरातली ही अभिनेत्री विवाहबद्ध होऊन भाच्यांना प्रेमाने वाढवू लागली. हा प्रवास त्यांचे पती ब्रह्म के. सूद यांनीच ‘सिने ब्लिट्झ’कर्ते बी. के. करंजिया यांच्या साथीने ‘अॅन एलियन इन बॉलीवूड’ या आत्मचरित्रात मांडला आहे.

अभिनयाचा उत्तम आविष्कार दाखवणारे एखाददुसरे चित्रपटदृश्य या अभिनेत्रीबाबत आठवत नाही हे खरे, पण अभिनयाला वाव न देणाऱ्या भूमिकाही नेमाने, नेटाने त्या करत राहिल्या. दिलीपकुमारसह १९४९च्या ‘शहीद’मध्ये नायिकेची भूमिका करताना या जोडीच्या चर्चा वाढल्या होत्या. मात्र संसार सांभाळण्याला कामिनी कौशल यांनी प्राधान्य दिले. त्या वेळच्या नायिका दहाबारा वर्षे प्रमुख भूमिकांत दिसत, नंतर गायब होत किंवा मिळेल ती भूमिका करत. लीला चिटणीस यांनी याच ‘शहीद’मध्ये आईची भूमिका केली होती. पण कामिनी कौशल यांच्याकडे नायिका होण्यापूर्वीच प्रत्यक्ष आयुष्यात दोन मुलींना आईचे प्रेम देण्याची भूमिका आली होती. पडद्यावरचे ‘मातृत्व’ त्यांच्याकडे १९६३ च्या ‘भगतसिंग’मुळे आले. त्यापुढली सुमारे २५ वर्षे अशाच भूमिका त्यांनी केल्या. मग काही काळ विराम घेऊन, २००७ मध्ये नायकाची आजी म्हणून पडद्यावर त्या परतल्या. वयाची पस्तिशी नुकती ओलांडली असताना ‘शहीद भगतसिंग’मध्ये मनोज कुमारच्या आई म्हणून दिसण्यास त्या आधी तयारच नव्हत्या. अखेर ही भूमिका त्यांनी केली, पण त्याच वर्षीच्या ‘वक्त’मध्ये श्रीमती केदारनाथ (राजकुमार, सुनील दत्त आणि शशी कपूर यांची आई) या भूमिकेच्या पूर्वसूत्रात बलराज साहनी यांची पत्नी आणि ‘ऐ मेरी जोहराजबीं’ या गाण्यातली उत्सवमूर्ती म्हणून त्या अधिक शोभल्या.

कापडी बाहुल्या बनवणे, बालकविता रचणे असे छंदही बहिणीच्या दोन आणि स्वत:च्या तीन मुलांना वाढवताना त्यांनी वास्तवात जपले होते. त्यांच्या जाण्याने पडद्यावरल्या मातृत्वाचा आणखी एक चेहरा लोपला आहे.