scorecardresearch

Premium

अन्वयार्थ : व्याजदरवाढीने भागणार नाही.. 

एखाद्या रुग्णाला औषधांच्या मात्रा वारंवार पाजूनही तो बरा होत नाही, तेव्हा ते दीर्घकालीन आजाराचे एक निश्चित लक्षण मानले जाते.

anvyartha rate of interest
संग्रहित छायाचित्र

एखाद्या रुग्णाला औषधांच्या मात्रा वारंवार पाजूनही तो बरा होत नाही, तेव्हा ते दीर्घकालीन आजाराचे एक निश्चित लक्षण मानले जाते. काही वेळा अशा उपचारांचा दुष्परिणामही होतो आणि तो मूळ इलाजापेक्षा जड ठरू शकतो. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्ह या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी परवा रात्री केलेल्या भाषणामध्ये चलनवाढीच्या चिकट विकारावर मात करण्यासाठी व्याजदर वाढीची दीर्घकालीन मात्रा सुरूच राहणार, असे म्हटले आहे. या मात्रेचा दुष्परिणाम म्हणजे अर्थव्यवस्था आक्रसणार आणि त्यातून मंदीसदृश परिस्थिती उद्भवणार. त्यांच्या या भाषणाने जगभरच्या बाजारांमध्ये कसा हलकल्लोळ उडाला आणि त्यातून बडय़ा कंपन्यांचे समभाग कोसळून त्यांचे अब्जावधीचे नुकसान कसे झाले, याविषयी ‘आठ मिनिटांत सत्यानाश’ छापाची रोचक वर्णने माध्यमांनी केली आहेत. परंतु बाजारापलीकडे पाहायचे झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर दिसते. चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी चलनतरलता गोठवणे आवश्यक असते. यासाठी हमखास यशाचा मार्ग म्हणजे व्याजदरवाढ अशी जगभरातील अर्थ विश्लेषक आणि अर्थ नियोजकांची धारणा आहे. आज अमेरिका, युरोपपासून भारतापर्यंत मध्यवर्ती बँकांचे प्रमुख हेच करताना दिसतात. परंतु करोना आणि युक्रेन युद्ध या दोन घडामोडींमुळे जगभरातील अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेत असताना, व्याजदर वाढवून कर्जे महाग करणे हे दुधारी शस्त्र ठरू शकते आणि ते कुठवर वापरावयाचे, ही खरी तारेवरची कसरत ठरते. जेरोम पॉवेल यांनी फेडरल रिझव्‍‌र्हच्या परिषदेमध्ये केलेल्या आठ मिनिटांच्या भाषणात, व्याज दरवाढ यापुढेही होत राहील असा इशारा दिला आहे. या व्याजदरवाढीमुळे अमेरिकी उद्योग आणि कुटुंबे यांना क्लेश सहन करावे लागतील. पण चलनवाढ आटोक्यात आणली नाही, तर हे क्लेश अधिक तीव्र असतील, असा त्यांच्या भाषणाचा मथितार्थ. अमेरिकेमध्ये इंधन व ऊर्जा, घरभाडे, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्यात येण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. एकमेव आशेची किनार म्हणजे बेरोजगारीचा दर सध्या नीचांकी आहे. पण करोनोत्तर अर्थव्यवस्था सावरत असताना, मोठय़ा प्रमाणात खोगीरभरती झालेल्या या बऱ्याच रोजगारांचे स्वरूप तात्पुरते आहे. चढय़ा व्याजदरांमुळे एका टप्प्यावर उद्योगवृद्धी थांबेल, त्या वेळी उत्पन्नही पुरेसे नसेल. अशा वेळी तगून राहण्यासाठी उद्योगांना नोकरकपात, वेतनकपातीकडे वळावेच लागेल, असे हे चक्र आहे. पॉवेल हे नजीकच्या भविष्यात व्याजदर कपातीकडे वळतील, असा तेथील संस्थात्मक गुंतवणूकदारांचा होरा होता. पॉवेल यांच्या खणखणीत आणि परखड भाष्याने तो खोटा ठरवला. त्यामुळेच अमेरिकी आणि भारतासह जगभरातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये गुंतवणूकदारांची गाळण उडाली. मार्च महिन्यापासून फेडरल रिझव्‍‌र्हचे व्याजदरवाढीचे सत्र सुरू झाले. सव्वादोन ते अडीच टक्के व्याज दरवाढ आतापर्यंत झालेली आहे. येत्या काही दिवसांत अर्धा टक्के ते पाऊण टक्का दरवाढ पुन्हा एकदा होऊ शकते. पुढील काही महिने व्याजदर वाढ कशा प्रकारे करावी लागेल, अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा राहील, क्लेश किती काळ सहन करावे लागतीत याविषयी पॉवेल यांचे स्पष्ट आणि परखड आडाखे आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, ते मांडता येण्याचे त्यांना असलेले स्वातंत्र्य हे त्यांच्या धोरणांच्या यशस्वितेशी थेट निगडित आहे.

health supplement pills marathi news, health supplement pills benefits marathi, health supplement pills effects on body marathi news
Health Special: आरोग्यपूरक गोळ्या – कोणी घ्याव्यात? किती घ्याव्यात?
Five Foods To Eat on Empty Stomach First Thing In Morning Detoxing Stomach Intestine Constipation Cure In Marathi Indian Dishes
रिकाम्या पोटी ‘या’ पाच भारतीय पदार्थांचं सेवन केल्याने प्रत्येक सकाळ होईल सुंदर; पोट स्वच्छ होत नसेल तर पाहाच
Exercising 150 mins week to prevent heart attacks Study says it may not be enough if you have sugary health drinks
दर आठवड्याला व्यायाम करता? पण साखरयुक्त पेय घेऊन सर्व मेहनत वाया घालवता; संशोधनाबाबत काय सांगतात डॉक्टर….
Mouni Amavasya
Mauni Amavasya 2024 : मौनी अमावस्येला या राशींना होऊ शकतो बक्कळ धनलाभ, तुमची रास यात आहे का?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anvyartha interest rates will not increase patient drugs long term illness ysh

First published on: 30-08-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×