डॉ. उज्ज्वला दळवी

रुग्णसंख्येचा भार झेलणाऱ्या डॉक्टरांच्या अनेक अभ्यासांकडे पाहिलं तरीही निष्कर्ष हाच : ‘समानुभूती’ जमली पाहिजे!

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

‘‘मला भीती वाटते. डॉक्टर, माझा कॅन्सर बरा होईल ना?’’ पेशंटने काकुळतीने विचारलं.

डॉ. नगारेंनी प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, ‘‘नर्स, यांचा आजचा रिपोर्ट कुठे? हं, ठीक आहे. उद्या अ‍ॅडमिट व्हा. परवा करू ऑपरेशन.’’ त्रोटक, तुटक संभाषण संपलं. पेशंट नर्सबरोबर बाहेर गेला. त्याच्या मनातली भीती थोडीशी वाढलीच!

डॉ. नगारेंच्या शिक्षणाचा, कौशल्याचा लौकिक मोठा होता. त्यांनी ऑपरेशन उत्तम केलं. जखम भरेपर्यंत रोज आले, जखम पाहून हाताखालच्या डॉक्टरांना त्यासंबंधी सूचना दिल्या. ते पेशंटशी बोललेच नाहीत. त्याच्या शंकांचं निरसन दूरच राहिलं. हाताखालच्या डॉक्टरांनी, नर्सेसनी जखमेची काळजी घेतली. रक्तदाब, नाडी, ताप अचूक नोंदला. पण एक माणूस म्हणून पेशंटला सतत दुर्लक्षित, उपेक्षित वाटत राहिलं.

इतर उपचारांसोबत पेशंटला माणूस म्हणून सहानुभूतीची आवश्यकता असते हे डॉक्टरांना कळतच नाही का? यावर बर्कले विद्यापीठात संशोधन झालं. मेडिकल कॉलेजात शिरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात दुसऱ्याच्या दु:खाविषयी सहानुभूती (सिम्पथी) उपजतच असते. सुई टोचून तपासासाठी रक्त काढणं, इंजेक्शन देणं, जखमा शिवणं अशा टप्प्याटप्प्याने त्याला दुसऱ्यांच्या वेदनांशी अधिकाधिक सामना करावा लागतो. सहानुभूतीमुळे तो त्या सगळय़ा वेदना, ते दु:ख आपलंच असल्यासारखं अनुभवतो. पुढे रोजच अनेक जखमी, आजारी लोकांशी संबंध येतो. हळूहळू तो दु:खभार पेलणं कठीण होतं. भावनांच्या अतिरेकामुळे वैचारिक काम जमेनासं होतं. ते टाळायला, स्वसंरक्षणासाठी मेंदू पळवाट शोधतो. तो बधिर, निगरगट्ट होतो. सतत पेशंटच्या दु:खाशी सामना करणाऱ्या कॅन्सरतज्ज्ञांमध्ये तर फक्त बावीस टक्के डॉक्टर पेशंटच्या भावना जाणायचा प्रयत्न करतात असं २००७ सालच्या त्या सर्वेक्षणात समजलं. 

शिकागो विद्यापीठात डॉक्टरांच्या मेंदूची सर्वसामान्यांच्या मेंदूशी ‘एफ-एमआरआय’ (फंक्शनल मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग) तंत्राने तुलना करणारा मोठा अभ्यास झाला. काय समजलं त्याच्यावरून? पेशंटला अ‍ॅक्युपंक्चरच्या सुया टोचताना डॉक्टरांच्या मेंदूतली विचारकेंद्रं अधिक काम करतात. पण त्यांची भावनाकेंद्रं सर्वसामान्यांच्या तुलनेत फार कमी काम करतात. म्हणजे भावना जाग्या होतात आणि  विचारकेंद्रं त्यांना दडपून टाकतात का? ते समजून घ्यायला शास्त्रज्ञांनी तिथल्या विजेच्या प्रवाहांचाही अभ्यास केला. तेव्हा कळलं की डॉक्टरांच्या मेंदूत समदु:खी भावना जाग्या होतच नाहीत. तशी संवेदनाशून्यतेची ढाल बाळगली की व्यावसायिक विचारांत भावनांची अडगळ होत नाही. पेशंटला बरं करणं हे एकच वैचारिक ध्येय या मेंदूत असतं.

पेशंटला बरं करणं हेच तर डॉक्टरांचं काम.. सगळय़ा वैद्यकीय परीक्षांत, इंटरवूंत, कामाच्या अहवालांत डॉक्टरांच्या त्याच ज्ञान/  कौशल्याला महत्त्व दिलं जातं. शिवाय जसजशी पेशंटची संख्या, कामाचा बोजा वाढतो तसतसा पेशंटशी बोलायला मिळणारा वेळ कमी होत जातो. सुमारे ७० टक्के डॉक्टर पेशंटचं बोलणं मध्येच थांबवून पुढचा पेशंट बोलावतात. निमूटपणे बिनचूक कामाचा उरक वाढवणं गरजेचं ठरतं.

पण कित्येकदा पेशंटची शारीरिक समस्या उमगायला त्याच्या भावनांचा अडसर दूर सारावा लागतो. एखादी तरुणी अवघड जागचं दुखणं सांगायला लाजते. हर्नियाच्या ऑपरेशनने नपुंसकत्व येईल या गैरसमजाने हादरलेला पैलवान दुखणं न सांगता नुसतं आकांडतांडव करतो. प्रदीर्घ आजारपणामुळे हताश झालेला पेशंट, ‘बरं आहे,’ म्हणताना फक्त सुस्कारतो.  त्यांनी दडवलेल्या गोष्टीबद्दल निर्विकारपणे प्रश्न विचारले तर साराच विचका होतो. त्या समस्या तटस्थपणे सोडवणं योग्य नसतंच.

काही डॉक्टरांना मात्र तशा पेशंटच्या भावना जपणं, त्यांची मन की बात काढून घेणं छान जमतं.

ज्ञानाचं, विचाराचं पाठबळ 

‘‘मला भीती वाटते. डॉक्टर, माझा कॅन्सर बरा होईल ना?’’ हाच प्रश्न विचारल्यावर डॉ. पगारे म्हणाले, ‘‘या प्रकारचा कॅन्सर बरा होऊ शकतो. आपण ऑपरेशन करून कॅन्सरचा बहुतेक भाग काढूनच टाकू. उरलेल्या भागासाठी रेडिओथेरपी, केमोथेरपी वगैरे उपाय करू. आम्ही सतत लक्ष ठेवणारच आहोत. तुमचे बाकीचे रिपोर्ट उत्तम आहेत. कधी करूया ऑपरेशन?’’ डॉक्टरांनी पेशंटच्या मनातली भीती जाणली. त्यांनी कसलंही खोटं आश्वासन दिलं नाही. दोन-तीनच वाक्यं बोलले. तेवढय़ाने पेशंटला धीर वाटला.‘‘काय, कसं वाटतंय?’’ असं  ऑपरेशननंतरदेखील रोज हसतमुखाने विचारत डॉक्टरांनी पेशंटच्या हरेक शंकेला समाधानकारक उत्तर दिलं.

डॉ. पगारेंना पेशंटच्या मनातली भीती आणि तिचं कारण बरोब्बर समजलं. ते समजणं त्यांच्या वागण्याबोलण्यातून पेशंटपर्यंत पोहोचलं. त्यांचं व्यावसायिक ज्ञान वापरून त्यांनी ती भीती कमी केली, पेशंटला धीर दिला. दुसऱ्याच्या मनातल्या समस्येकडे त्याच्या दृष्टिकोनातून बघता येणं , त्याची समस्या समजून घेणं आणि ती आपल्याला समजली आहे हे आपल्या वागण्यातून त्याच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे सम-अनुभूती ऊर्फ समानुभूती (एम्पथी).  तिला ज्ञानाचं, विचाराचं पाठबळ असतं. ती जाणीव पेशंटपर्यंत पोहोचवायला बोलायचीही गरज नसते. नजरेतून, हलक्या थोपटण्यातून, इतर देहबोलीतूनही ती भावना सहज पोहोचते. आपण पुरेसं व्यक्तही न केलेलं दु:ख डॉक्टरांनी ताडलं या जाणिवेने पेशंटला दिलासा मिळतो, तो मोकळेपणाने बोलायला लागतो आणि संभाषणाच्या ओघात आजारामागची कित्येक कोडी सहज उकलतात.  सध्याच्या वैश्विक खेडय़ात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातला, वेगळय़ाच वांशिक-धार्मिक-सांस्कृतिक घडणीचा, निराळय़ा आजारांच्या संगतीत वाढलेला पेशंट समोर येऊ शकतो. त्याच्या आजाराकडे त्याच्याच दृष्टिकोनातून बघणं जमलं तरच निदान बिनचूक होतं.

सम-अनुभूतीमध्ये पेशंटच्या वेदना, समस्या जाणूनही ती समस्या दुसऱ्याची आहे, आपली नाही याचं भान सतत बाळगणं आवश्यक असतं. तसं केलं तरच पेशंटचं दु:ख समजल्यावरही त्याचा भार सोसावा लागत नाही. उलट त्याच्याशी कणवेने वागल्याचं ‘व्यावसायिक समाधान’ मिळतं. विचारशक्ती अधिकच समृद्ध होते. तसं संतुलन ज्यांना जमत नाही त्यांना सहानुभूतीचा भार होतो. तो झटकताना ते अलिप्त, निर्विकार होत जातात. बिनचूक कोरडेपणाने वागतात. पण पेशंटचं दु:ख दिसत तर असतं. त्याला पुरेसा न्याय न दिल्याची अपराधी टोचणीही असते. रोजचं काम फत्ते न झाल्याची रुखरुख असते. व्यावसायिक समाधानाऐवजी मनात नकारात्मक भावना साचत जातात. कामाचा उत्साह घटत जातो. व्यावसायिक थकवा लवकर येतो. ऑस्ट्रेलियातल्या १४००० डॉक्टरांच्या सर्वेक्षणात तसं संतुलन न जमणाऱ्या डॉक्टरांच्यात मानसिक आजारांचं आणि आत्महत्येचंही प्रमाण अधिक असल्याचं आढळलं.

समानुभूतीमुळे डॉक्टरांच्या मेंदूतल्या भावनाकेंद्रांवर बोजा येत नाही. विचारकेंद्रांना निदान, उपचार यांचे योग्य निर्णय ठरवायला मोकळीक राहते. साहजिकच समानुभूती दाखवणारे डॉक्टर पेशंटना अधिक भावतात. ते प्रत्येक वेळी गरजेला त्यांच्याचकडे जातात, त्यांनी सांगितलेली औषधं नियमितपणे घेतात, बरं वाटल्याची दिलखुलास पावती देतात. माणुसकीवर आधारलेलं डॉक्टर-पेशंट नातं पक्कं होतं. मग त्या डॉक्टरांवर निष्काळजीपणासाठी खटलेही क्वचित होतात. इतकंच कशाला, समानुभूती दाखवली की पेशंटची सर्दी लवकर बरी होते असं विस्कॉन्सिन विद्यापीठातल्या अभ्यासात दिसलं; तर फिलाडेल्फियाच्या जेफरसन इन्स्टिटय़ूटमधल्या मधुमेह्यांच्या रक्तातली साखर आणि कोलेस्टेरॉलसुद्धा कह्यात राहायला त्याने मदत झाली.

भावनांवर प्रयत्नपूर्वक ताबा

डॉक्टर आणि पेशंट दोघांनाही फायद्याची असणारी समानुभूती काहीजणांना अनुभवातून साध्य होते. पण ती जितक्या लवकर अंगी बाणवली जाईल तितका समाजाला फायदा होईल. म्हणून तिला प्रोत्साहन द्यायला लंडनमध्ये ‘बािलत सोसायटी’ नावाची चर्चामंडळं १९५०पासूनच सुरू आहेत. तिथे डॉक्टर आपल्या पेशंटविषयीचे भावनिक अनुभव सांगून त्यांच्यावर चर्चा करतात. २०१६पासून इंग्लंडमध्येच ‘श्वात्र्झ राउंड्स’मध्ये अनेक शाखांतले तज्ज्ञ मिळून पेशंटच्या मानसिक-सामाजिक समस्यांविषयी विचारांची देवाणघेवाण करू लागले आहेत. हार्वर्डला तर एम्पथेटिक्स नावाचे वर्गच भरतात. तिथे विद्यार्थ्यांना वेगवेगळे भावनिक पेच सोडवायला, स्वत:च्या भावनांवर प्रयत्नपूर्वक ताबा मिळवायला, पेशंटच्या भावना ओळखायला रीतसर शिकवलं जातं. लहान वयातच त्यांना समानुभूती अंगी बाणवायचे धडे मिळतात. 

भारतात अजून तसे वर्ग नाहीत. तसे धडे जगभरातल्या सगळय़ाच डॉक्टरांना लहान वयातच मिळाले तर डॉक्टर-पेशंट नात्याला नवा हुरूप येईल. त्या नात्यातून कायमची निसटू पाहणारी माणुसकी, विश्वास आणि गोडवा पुन्हा नव्याने प्रस्थापित होतील. जगाच्या आरोग्यव्यवस्थेला नवं टॉनिक लाभेल.

लेखिका वैद्यकीय व्यवसायात होत्या.

 ujjwalahd9 @gmail. com