‘माझ्याकडे एका वयस्कर पेशंटने दिलेल्या कबुलीनुसार, तिला स्वत:ला मूल झाल्यानंतरच तिला कळलं होतं की मुलं गुदद्वारातून होत नाहीत’ यासारखे वाक्य एरवी ग्राम्य विनोद करू पाहणारे किंवा किस्सेबाज ठरले असते. पण सुधीर कक्कर यांच्या ‘इंटिमेट रिलेशन्स : एक्स्प्लोअरिंग इंडियन सेक्शुअ‍ॅलिटी’ या पुस्तकात असे वाक्य येते तेव्हा ते गांभीर्यानेच वाचले जाते. विष्णुपुराण, ब्रह्मपुराण, वात्स्यायनाचे कामसूत्र आणि फ्रॉइड, एरिक फ्रॉम या आधुनिक मानसशास्त्रज्ञांचे दाखले देत ते पुस्तक वाचकाला भारतीय कामजाणिवेचे वेगळेपण सांगते. सायकोअ‍ॅनालिसिसच्या सिद्धान्तानुसार कामजाणीव ही केवळ काही अवयव वा क्रियांपुरती मर्यादित नसते, हे या पुस्तकातून तरी नक्कीच समजलेला वाचक मग, भारतीय कामजाणीव आणि भारतीय समाजजीवन यांचा पडताळा घेण्यासाठीही सिद्ध होऊ शकतो! अशी, वाचकाला विचारसज्ज करणारी अनेक पुस्तके सुधीर कक्कर यांनी लिहिली. त्यांचे निधन २२ एप्रिल रोजी झाले, तेव्हा ‘भारतीय सायकोअ‍ॅनालिसिसचे उद्गाते’ असा त्यांचा उल्लेख आवर्जून झाला. पण सायकोअ‍ॅनालिसिसस केवळ एक मार्ग आहे.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: विठ्ठल शानभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्यापेक्षा आध्यात्मिक शांती शोधणाऱ्यांच्या आपल्या देशाची ही घडण कशी आहे, कशामुळे आहे: महाभारत आणि बॉलीवूड चित्रपट; गांधी, टागोर आणि प्रेमचंद यांना खोडता न येणारे, तरीही  आताच्या भडकलेल्या धार्मिक भावनांसह राहणारे भारतीय हे असे का आहेत, याचा अभ्यास कक्कर यांनी केला. त्यासाठी ‘द इनर वल्र्ड : सायकोअ‍ॅनालिटिक स्टडी ऑफ हिंदू चाइल्ड अ‍ॅण्ड सोसायटी’ (१९८३) , ‘द अ‍ॅनालिस्ट अ‍ॅण्ड द मिस्टीक’ (१९९१)  ‘द कलर्स ऑफ व्हायोलन्स : कल्चरल आयडेंटिटीज, रिलिजन अ‍ॅण्ड कॉन्फ्लिक्ट’ ( १९९६), ‘द इंडियन्स : पोर्ट्रेट ऑफ अ पीपल’ (२००९, सहलेखिका कॅटरीना कक्कर) , ‘यंग टागोर : द मेकिंग्ज ऑफ अ जीनियस’ (२०१३) अशी पुस्तके लिहिली. ‘एक्स्टसी’, ‘द अ‍ॅसेटिक ऑफ डिझायर’, ‘क्रिमझन थ्रोन’, ‘डेव्हिल टेक लव्ह’ आणि ‘मीरा अ‍ॅण्ड द महात्मा’ यासारख्या कादंबरीमय, ललित पुस्तकांतूनही त्यांची प्रतिभा बहरली. पण विशेषत: गांधीजी आणि मॅडेलिन स्लेड ऊर्फ मीराबेन यांच्यावरील कादंबरीची २००४ ची आवृत्ती हा जणू इतिहासच आहे असे लोकांना वाटल्याने २०१८ च्या आवृत्तीत,‘गांधीजी आणि मीराबेन यांच्यातील पत्रव्यवहाराचा आधार या कादंबरीला असला तरी ‘मीराबेनची रोजनिशी’ आणि ‘रोमा रोलाँ यांना मीराबेनची पत्रे’ हा भाग कल्पितच आहे,’ असा खुलासा स्पष्टपणे करावा लागला. ही पुस्तके वाचून भारताविषयीची जाण अधिक उदारमतवादी करणे, हीच कक्कर यांना खरी आदरांजली ठरू शकेल.