साप्ताहिक ‘सकाळ’, पुणेमध्ये ‘असा मी, असा मी’ सदर सन १९९० मध्ये प्रकाशित होत होते. त्या सदरातील हा संपादित प्रश्नोत्तर मजकूर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा असल्याने महत्त्वाचा ठरतो.
पुन्हा संधी मिळाली तर कोण व्हायला आवडेल?
आवडी-निवडीच्या पलीकडे मन गेले आहे. अनंत विश्वामध्ये आपण एक कण आहोत, हा अनुभव सर्व वासनांपलीकडे आहे. सर्व विश्वाबद्दल आदर उत्पन्न होतो.
विशेष छंद : उच्च तात्त्विक आणि वैज्ञानिक ग्रंथांचे, नव्या संशोधनांचे वाचन.
टी.व्ही.वर काय पाहायला आवडते? : विकासाभिमुख जीवनाबद्दल आशा उत्पन्न करणाऱ्या घटना.
महत्त्वाकांक्षा : विद्यासंपादन. ती करीत राहिलो.
आनंदाचा प्रसंग : देश साम्राज्यशाहीच्या दोरखंडातून मुक्त झाला तो स्वातंत्र्य दिन!
निराशेचा क्षण : हिटलरने लोकशाही, जगातील मांगल्य नष्ट करण्याचा निर्णय घेतला तो क्षण.
देव मानता का? : विश्वाची चैतन्यशक्ती मानतो; पण ती अवर्णनीय व अनिर्वचनीय आहे. या शक्तीचा विश्वचिंतनाबरोबर अनुभव येतो.
आपला स्वभाव कसा आहे असे तुम्हाला वाटते? : शांत, निर्वेध, मधुर राहावे, असा नित्य प्रयत्न असतो.
राजकीय मते : समाज लोकसंमत कायद्याने चालावा. राजसत्ता जुलमी होण्याचे भय असते, अशी सत्ता समाजावर कधी असू नये. स्वातंत्र्य हे जीवनमूल्य आहे. सर्व मानवजात विश्वकुटुंबात्मक होईल, असा विकास होणे आवश्यक आहे. अण्वस्त्रे ही मानवी जीवनाला धोकादायक आहेत, ती नाहीशी होऊन सर्व सुखी व्हावेत.
आवडते लेखक : लेखक आवडतात; पण नेमके सांगता येणार नाही.
आवडलेली पुस्तके : प्रश्न विचार करायला लावणारा आहे. पुस्तके आवडतात; पण नेमकी सांगता येणार नाहीत.
आवडती नाटके : कालिदास आणि शेक्सपिअरची नाटके आवडतात. गडकरींचीही आवडतात.
आवडते गायक / गायिका : कुमार गंधर्व, भीमसेन जोशी.
आवडते चित्रपट : पाहत नाही; कसे सांगणार..?
आवडते कलावंत : कलांची यादी करावी लागेल.
आवडते गाव / शहर : वाई
आवडते गाणे / कविता : आठवत नाही
मित्र : पु. ल. देशपांडे, गोवर्धन पारीख, यशवंतराव चव्हाण, किसन वीर, नानजकर.
आवडता पोशाख : गांधी टोपी, नेहरू शर्ट, जाकीट, खादीचा पांढरा शुभ्र पोशाख!
आवडता खाद्यापदार्थ : खूप आहेत.
आवडता खेळ / खेळाडू : खेळ आवडतात; पण नेमके नाव सांगता येणार नाही.
जीवनावर प्रभाव टाकणारी व्यक्ती : केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे), महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय.
सर्वांत प्रिय गोष्ट : सांगणे कठीण, पण मैत्री.
जीवनविषयक तत्त्वज्ञान…
विश्वजीवनविषयक अनेक प्रश्न उलगडले नाहीत. जीवन का अस्तित्वात आले, याचा उलगडा होत नाही आणि होईल असे वाटत नाही. अस्तित्व हे महान गूढ आहे. ईश्वराची संकल्पना सर्वांना प्रिय आहे. ईश्वर हे अंतिम सत्य आहे, असे सर्व धर्म मानतात. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल तर्कशुद्ध पुरावा अजून कोणालाच देता आलेला नाही; म्हणून तो श्रद्धेचा विषय आहे. ‘अप्रमेय’ असे ईश्चराचे विशेषण आहे.
drsklawate@gmail.com