तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तत्त्वज्ञानांची चर्चा करणारे अनेक लेख लिहिले आहेत, पैकी सर्वोत्कृष्ट लेख म्हणून याकडे पाहावे लागते. त्याचे कारण, या लेखात असलेली वाचकांस अंतर्मुख करीत त्यास क्रियाप्रवण करणारी प्रेरणा. ‘नवभारत’ मासिकाच्या जानेवारी १९५२ च्या अंकात तो प्रसिद्ध झाला होता, म्हणजे १९५१ च्या अखेरीस लिहिलेला काँग्रेस, मार्क्सवाद, रॉयवाद, नवमानवतावादाची आवर्तने तर्कतीर्थांच्या जीवनात येऊन गेल्यानंतरच्या काळातलं हे चिंतन असल्याने व त्याही वादांपूर्वी तर्कतीर्थांनी भारतीय दर्शने म्हणजे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत अभ्यासली असल्याने या लेखांतील विचार, निरीक्षणे, निष्कर्ष याला तार्किक आधार होतेे. या लेखाच्या प्रसिद्धीनंतर ‘दी रॅडिकल ह्युमॅनिस्ट’ या इंग्रजी साप्ताहिकाने आपल्या १० फेब्रुवारी १९५२ च्या अंकात या लेखाचे इंग्रजी भाषांतर प्रकाशित केले होते.

लेखाचे मूळ शीर्षक ‘आधुनिक भारतीयांतील तत्त्वज्ञानाचे दारिद्य्र’ असे आहे. या लेखात तर्कतीर्थ म्हणतात, ‘जगात जी दर्शने अबाधित सत्य सांगतात, ती विद्वन्मान्य होतात. सर्वच दर्शने सारखी स्वीकार्य नसतात. प्राचीन काळात भारत व ग्रीस हे देश तत्त्वज्ञान निर्मितीत आघाडीवर होते. पुढे ग्रीकांचा तत्त्वज्ञानाचा वारसा पाश्चात्त्य राष्ट्रांकडे आला. त्या राष्ट्रांनी नवनवीन तत्त्वज्ञानांची निर्मिती केली, असे भारतीय दर्शनांबाबत घडून आलेले नाही. आधुनिक भारतीय विद्यापीठांतून गेल्या शतकात (पहिल्या विद्यापीठांची स्थापना – १८५७) हजारो विद्यार्थी पाश्चात्त्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानांचा अभ्यास करून बाहेर पडले; पण त्या महाविद्यालये वा विद्यापीठांमध्ये नव्या दार्शनिक युगाचा प्रारंभ होईल, अशा निदर्शक प्रवृत्तींचा मागमूसही त्यांत सापडत नाही. हे कृतार्थतेचे तरी लक्षण आहे किंवा जाड्ड्याचे वा सुस्ततेचे. असेही म्हणता येईल की, कृतार्थतेतून उत्पन्न जाड्ड्याचे हे लक्षण आहे. कृतार्थतेने जिज्ञासा मरते व जिज्ञासा मेली म्हणजे विचार संपतो.

आधुनिक भारतीयांनी नवे तत्त्वज्ञान निर्माण न केल्यामुळे किंवा जुन्या तत्त्वज्ञानांचीच, मुळापासून बदललेल्या कलात्मक व विद्यात्मक नवविस्ताराशी संवादी अशी रचना न केल्यामुळे, आधुनिक भारतीयांपाशी तत्त्वज्ञानाचे दारिद्य्र आहे, असे तात्त्विकदृष्ट्या म्हणावे लागते. आजच्या जगातील विशिष्ट अनुभूतीचा परामर्श घेऊन तयार होणाऱ्या भारतीय तत्त्वदर्शनाच्या अभावामुळे भारतीयांचे वैचारिक दौर्बल्य भवितव्याबद्दल निराशा उत्पन्न करते. कारण तत्त्वदर्शन म्हणजे उत्कर्षाची सीमा गाठू पाहणारा मानवी विचारांचा साहसी विक्रम होय.

तत्त्वज्ञानाच्या उदयाची पार्श्वभूमी आधुनिक भारतीयांना लाभलेली नाही. तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीचे चार घटक असतात. (१) विश्वाच्या व जीवनाच्या अज्ञात भागांवर प्रकाश टाकणाऱ्या विद्यांच्या विस्ताराचे सातत्य. (२) नवनिर्मितीसाठी जीवन यश वा अपयशाच्या अंतिम प्रश्नांशी असलेला सामाजिक गरजा व तत्त्वदृष्टीचा संबंध. (३) वैचारिक स्वातंत्र्य भोगणाऱ्या, स्वैर, प्रतापी व आत्मविश्वाससंपन्न विचारवंतांचा तुटवडा. (४) पूर्ण सत्य व मोक्ष मानवाच्या कक्षेत सापडण्याची शक्यता आधुनिक माणसात दिसत नाही.

जे तत्त्वज्ञान आजच्या सामाजिक अनुभवांचा अर्थ सांगेल, विज्ञानाच्या वाढीस उपकारक सिद्धांतांचे दिग्दर्शन करील आणि जीवनातील अडचणींतून बाहेर काढणारा सामाजिक कर्मयोग दाखवील, तेच आजच्या भारतवर्षाचे तत्त्वज्ञान बनेल. असे तत्त्वज्ञान भारतात उदय पावण्याची पूर्वतयारी कोठेही दिसत नाही. बौद्धिक सामर्थ्याचे आव्हान मान्य करणारे तत्त्वज्ञान उत्पन्न होण्यास आवश्यक अशी वैज्ञानिक दृष्टी हा एक मोठा सद्गुण आहे, असा अभिनिवेश बाळगणारी शिक्षणपद्धती भारतीय विद्यापीठांत आली पाहिजे. समाज बदलण्याची प्रक्रिया दर्शविणाऱ्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. अलीकडे मान्यता पावलेला गूढ अध्यात्मवाद या दोन्ही आव्हानांस अपुरा आहे. जाणूनबुजून, बौद्धिक अशा विचार प्रक्रियेस तो पाठमोरा होतो आणि ज्वलंत सामाजिक प्रश्नांना काल्पनिक अव्यवहार्य व विसंगत उत्तरे देतो. तत्त्वज्ञानाच्या दारिद्र्याचे ते मुख्य गमक आहे.

तर्कतीर्थांचे प्रस्तुत विचार आत्मटीका व आत्मपरीक्षण यांचा संगम असून, तो वाचकांस विचारप्रवृत्त करतो. त्यामुळे यावर सार्वजनिक विचार व कृती होण्याची अपेक्षा करण्यास हरकत नसावी.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com