हॅरी देशपांडे

ईस्ट इंडिया कंपनी हे भांडवलशाहीचेच रूप होते. तिच्या नफेखोरीतूनच ‘साम्राज्या’चा मार्ग रुंदावला. डॅलरिम्पल यांच्या ‘अ‍ॅनार्की’ची नवी ओळख..

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

इतिहासप्रेमींसाठी, विल्यम डॅलरिम्पल यांचे २०१९ मध्ये प्रसिद्ध झालले ‘द अ‍ॅनार्की’ हे पुस्तक म्हणजे एका व्यापारी कंपनीने संपूर्ण साम्राज्यावर ताबा कसा मिळवला याचे व्यापक विवेचन आहे. यातून लक्षात आलेली बाब म्हणजे १८ व्या शतकात भारत पादाक्रांत करण्यात एक बहुराष्ट्रीय महामंडळ म्हणून असलेले ईस्ट इंडिया कंपनीचे स्वरूप. त्या वेळी एक ब्रह्मास्त्र त्यांच्याकडे होते- ‘भांडवलशाही’, जे खासगी कंपनीच्या, म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीच्या आडून डागण्यात आले. वसाहतवादाची मूळ प्रेरणा असलेल्या भांडवलशाहीचे आयुध म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे महत्त्व आतापर्यंत लक्षात घेतले गेलेले नाही.

या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १७ व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरातमधील सुरत येथे व्यापार सुरू केला. या कंपनीमुळे घडलेले मोठे परिवर्तन म्हणजे गादीचा वारस ठरवण्याच्या पद्धतीत झालेला बदल. उदाहरणार्थ, मुघल सम्राटाच्या मृत्यूच्या वेळी त्याची मुले युद्ध करत आणि सर्वात शक्तिमान मुलगा उर्वरित वारसांचा नि:पात करून सिंहासनावर दावा सांगत असे. या पद्धतीत सम्राटाची मुले म्हणजे मर्यादित उमेदवार होते आणि नव्याने गादीवर बसलेला सम्राट, त्याच्या भावंडांची हत्या करून राजा झाला असेल, तर आव्हानांचा सामना करण्यास तो एकटा असमर्थ असे. कंपनीने कार्यकारी अधिकारी आणि मालकी यांच्यामध्ये विभागणी केली. मालकी वारसाहक्काची राहिली आणि व्हाईसरॉयसारख्या कार्यकारी अधिकाऱ्याला परिणामांसाठी जबाबदार धरले जाऊ लागले. हे घडत असतानाच अन्य भारतीय संस्थानिकांमध्ये वारसाहक्काने गादी मिळत असे. त्यामुळे दुर्बळ राज्यकर्ते राज्य करीत असत. अनेक ठिकाणी अननुभवी आणि असमर्थ राज्यकर्त्यांवर राज्याची धुरा सांभाळण्याची वेळ आली. त्यांनी एकमेकांशी युद्धे केली आणि वास्तविक त्यांनीच ईस्ट इंडिया कंपनीला हस्तक्षेप करण्यासाठी पाचारण केले.

ईस्ट इंडिया कंपनीकडे देशाचा कारभार चालविण्यासाठी अधिकार नसले, तरी ही मर्यादा तिच्यासाठी वरदान ठरली. पहिले कारण म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पैसे कमावण्यासाठी झालेली होती. सत्ता नसल्याने कंपनीला स्थानिक राज्यकर्त्यांना केवळ नाममात्र म्हणून ठेवावे लागले.

 तरीही विशेष अधिकारप्राप्त जीवनशैलीमुळे स्थानिक राज्यकर्ते आणि प्रजेतील महत्त्वाचे लाभार्थी खूश होते. त्यांच्यासाठी त्यांना देवासमान असलेला त्यांचा राजा सिंहासनावर असणे हेच खूप होते. दुसरीकडे ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक राजाच्या माध्यमातून जमीनदारी हक्क आणि अनुचित व्यापारी वर्तन यांच्या माध्यमातून भरपूर कमाई करण्यास सुरुवात केली. १८ व्या शतकाच्या शेवटी ब्रिटिशांचा भारतातील नफा २५ दशलक्ष रुपयांपेक्षा अधिक होता! 

ईस्ट इंडिया कंपनीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे तिच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे भत्ते. कंपनी त्यांना लुटलेल्या पैशातून मोठा हिस्सा भत्ते म्हणून देत असे. हे आज अस्वीकारार्ह असले तरी ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी सुरुवातीच्या महत्त्वाच्या काळात दूरदृष्टी असलेले, जोखीम पत्करणारे आणि नवीन कल्पना मांडणारे व त्याचबरोबर नफेखोर, निर्दय होते. आजही अमेरिकन कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्यांना त्यांच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर बोनस दिला जातो, जो पगारापेक्षाही जास्त असतो. मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष  व मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला किंवा अगदी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्यासहित सुप्रसिद्ध कार्यकारी अधिकाऱ्यांना बोनसमध्ये जेवढी रक्कम मिळते त्याच्या तुलनेत त्यांना मिळणारा पगार अगदीच नगण्य म्हणता येईल. वास्तविक, एलॉन मस्कने तर पगार घेण्यासच नकार दिला होता! मात्र टेस्लाने त्यांच्या कामगिरीचे उद्दिष्ट गाठले, तर त्याला स्टॉक ऑप्शन्समध्ये अब्जावधीची कमाई मिळते. असे असेल, तर हे नैसर्गिकच आहे की, एलॉन मस्क आणि ईस्ट इंडिया कंपनीचे व्हाईसरॉय यांना त्यांचा व्यवसाय वाढवून स्वत:ची श्रीमंती वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारच. या धोरणाचे निर्दय स्वरूप आजही कोणत्याही परिस्थितीत नफा कमावण्यासाठी प्रयत्न करीत असते. उदाहरणार्थ, ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच काही अमेरिकन औषध कंपन्या सक्रियपणे ग्राहकांना धोकादायक अमलीपदार्थसदृश औषधांकडे (ओपिऑईड्स) ढकलत आहेत.

सैनिकांना संस्थानिकांच्या फौजेपेक्षा जास्त पगार देणे कंपनीला शक्य होते. ते जमिनी इनाम मिळण्यास आणि निवृत्तिवेतनासही पात्र होते. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीकडे सर्वोत्तम स्थानिक सैनिक आकर्षित झाले. सावकारही कंपनीलाच कर्ज देणे पसंत करीत होते. कंपनी कर्जाची परतफेड करण्यातील कालमर्यादा पाळण्यात काटेकोर होती. कंपनीचा दुसरा ‘मास्टर स्ट्रोक’ होता तो म्हणजे स्थानिक राज्यकर्त्यांना ब्रिटिशांच्या तैनाती फौजा ठेवण्यास भाग पाडणे. त्यामुळे राज्यकर्ते अशा फौजांचा खर्च करीत होते, ज्यांच्यामुळे त्यांना उठाव करण्यात अडथळे येत होते. अशा प्रकारे सुरुवातीला भारतातील संपत्ती व्यापारातील तोटय़ाच्या रूपात लुटली जात होती. सन १८०० पर्यंत कापसाच्या निर्यातीमुळे भारतीयांना ब्रिटनपेक्षा व्यापारात खूप मोठा नफा मिळत होता. परंतु ब्रिटिश वस्त्रोद्योग कामगारांनी केलेल्या संपामुळे (१७७९ नंतर) भारतीय वस्त्रांवर ब्रिटनने जास्त कर लावले. हा ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवसायाच्या प्रारुपासाठी मोठा झटका असल्यामुळे कंपनीने व्यापाराच्या पद्धतीत बदल करून भारतातल्या कच्च्या मालाचे भाव पाडले. स्वस्तात मिळणारा कच्चा माल आणि स्थानिक कोळसा हे ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती घडवून आणणारे महत्त्वाचे घटक होते. ब्रिटिश वस्तू स्वस्त झाल्या तेव्हा भारतीय लोक तयार उत्पादनांचे ग्राहक झाले होतेच पण कच्च्या मालाचे स्वस्त पुरवठादारही होते. असा युक्तिवाद नेहमीच केला जातो की, ब्रिटिशांनी तंत्रज्ञान आणि आधुनिक व्यवस्थापन आणले. पण हे कधीही नाकारता येणार नाही की, कंपनीने जे जे केले ते सर्व त्यांचा व्यापार आणि कर अधिक वाढविण्यासाठीच होते. त्यांनी रेल्वे सुरू केली आणि धरणे बांधली ती कच्च्या मालाचे उत्पादन आणि कर वाढविण्यासाठी!

ब्रिटिशांनी भारतावर विजय मिळवला, त्याची पाळेमुळे आदल्या काही शतकांतील घडामोडींमध्ये होती. युरोप ११व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच सतत लढाया लढत होता. १३व्या शतकात मुघलांविरुद्ध असंख्य घनघोर लढाया झाल्या आणि त्यानंतर अनेक युरोपीय राज्यांमध्ये आपापसातल्या लढाया झाल्या. लढायांमधून सैनिकी क्षेत्रात सुधारणा झाली, जिचा स्वीकार करण्यास प्रत्येक जण उत्सुक होता.

भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सशस्त्र विरोध कधीही उपयोगाचा नव्हता तो का आणि ब्रिटिशांना घालवून देण्यासाठी महात्मा गांधींची अिहसेची धोरणे का आणि कशी महत्त्वाची होती, हे डॅलरिम्पल यांच्या पुस्तकातून समजते.  गांधीजींना हे समजले होते की, १८५७ पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीसाठी भारत हे एक व्यापाराचे, नफा कमावण्याचे ठिकाण होते. हाच प्रकार १८५८ मध्ये कंपनीऐवजी थेट ब्रिटिश राजघराण्याची सत्ता भारतावर प्रस्थापित झाल्यानंतरही कायम राहिला. तथापि, आपण स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून देशांतर्गत उत्पादनांवर अवलंबून राहण्यास सुरुवात केली, तेव्हा कंपनीच्या महसुलाची साधने आणि व्यापारातील नफा कमी झाला. शिवाय दुसऱ्या जागतिक महायुद्धातील आर्थिक फटक्यामुळे कंपनीला मोठय़ा प्रमाणावरील सैन्याची देखभाल करणे अशक्य होत गेले. भारतातील व्यवसाय अव्यवहार्य ठरले.

ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने एक आक्रमक व्यापारी राक्षस नसता, तर भारताला आज जे वैभव प्राप्त झालेले आहे ते प्राप्त झाले असते का? आपण त्या वेळच्या आक्रमकांचे व्यापारासाठीचे स्वरूप समजून घेऊ शकलो नाही, तर आपण चीनकडून केल्या जाणाऱ्या अशाच प्रकारच्या आक्रमणाला तोंड द्यायला तयार असू का? भारताला पुन्हा एकदा कच्च्या मालाचा निर्माता आणि तयार उत्पादनांचा ग्राहक बनण्याच्या धोक्याला पुन्हा तोंड द्यावे लागू शकते, ज्यामुळे आपली संपत्ती दुसऱ्या देशांमध्ये जाऊ शकते..

‘द अ‍ॅनार्की ’

लेखक : विल्यम डॅलरिम्पल

प्रकाशक : ब्लूम्सबरी इंडिया.

पृष्ठे : ५७६, किंमत : ३९९ रु.

harsh_deshpande@hotmail.com