पार्थ एम. एन.

शारदा उग्र आणि प्रदीप मॅगझिन यांच्यासारखे अपवाद वगळता, कुठे होते सगळे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेचं वाजतगाजत, थाटामाटात केलेलं उद्घाटन आणि भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांना दिल्ली पोलिसांनी केलेली धक्काबुक्की, मारहाण या दोन्ही घटना गेल्या महिन्यात एकाच दिवशी, काही किलोमीटर अंतरावर घडल्या आहेत हा विचारही सहजी पचनी पडणारा नाही. गेले सहा महिने साक्षी मलिक, विनेश फोगाट, संगीता फोगाटसारखे नावाजलेले कुस्तीपटू भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. अनेक महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर विनयभंगाचा, लैंगिक शोषणाचा आरोप केलेला असला तरी, अजून तरी त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई नाही.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आपल्या कुस्तीपटूंना पोलीस अटक करत होते, त्यांच्याशी गुन्हेगार असल्यासारखे वागत होते, त्याचवेळी हे ब्रिजभूषण नवीन संसद भवनाच्या उद्घाटनालाही सभागृहामध्ये हजर होते. आपल्याला मिळालेल्या अमानवी वागणुकीच्या विरोधात मग कुस्तीपटूंनी, आपण कठोर परिश्रमाने मिळवलेली पदकं गंगेला अर्पण करायचं ठरवलं. जागतिक कुस्ती संघटनेनेही या आंदोलनाची दखल घेतली आणि त्यांच्यावरल्या पोलिसी कारवाईचा निषेध केला.
दरम्यान, भारतातली मुख्य प्रवाहातली टीव्ही चॅनेल्स मात्र सत्तेत असलेल्यांच्या ‘ठामपणे पाठीशी उभी’ राहिली! भारत सरकारने या कुस्तीपटूंवर किती पैसे खर्च केलेले आहेत त्याचा आकडा काही पत्रकारांनी वाचून दाखवला. जणू काही सरकारने त्यांच्यावर पैसे खर्च केल्यामुळे आपल्यावर होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात त्यांचं तक्रार करणं कृतघ्नपणाचं होतं! काही चॅनेल्सनी तर या आंदोलनाला नाटक म्हटलं. याचं राजकारण होत असल्याचाही आरोप केला. पण आरोपी राजकारणी असेल, तर त्याच्या विरोधात होणारं आंदोलन बिगर राजकीय कसं असू शकेल? हे नाटक आहे असा आरोप करणाऱ्यांनी ब्रिजभूषण यांच्यावरल्या आरोपांकडे, ते कधीपासून होत आहेत, त्या आरोपांना संबंधित अधिकाऱ्यांनी कसा प्रतिसाद दिला आहे यावर एक नजर टाकली तरी पुरेसं आहे.

ब्रिजभूषण यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतात. २०१२ ते २०२२ या काळात भारतात आणि परदेशात झालेल्या विविध स्पर्धामध्ये त्यांनी कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केला, त्यांचा छळ केला. धमक्या दिल्या. एका महिला कुस्तीपटूच्या आरोपानुसार, ब्रिजभूषण यांनी तिला तिचा टीशर्ट वर घ्यायला सांगितला आणि श्वासोच्छ्वास तपासण्याचा बहाणा करत तिच्या पोटावरून हात फिरवला. त्यानंतर तिला दुखापत झालेली असताना आपल्या लैंगिक मागण्या मान्य केल्या तर कुस्ती संघटना तिच्या उपचारांचा खर्च करेल असंही सांगितलं.
अनेक महिलांनी त्यांच्यावर अयोग्य वर्तनाचा आरोप केलेला आहे. ब्रिजभूषण यांनी एकटीला गाठू नये म्हणून सर्व महिला क्रीडापटू एकत्रच बाहेर पडत, असंही यात म्हटलंय. पंतप्रधानांच्या कार्यालयालाही आपण याची माहिती दिली असल्याचा उल्लेख या तक्रारीत आहे.

या घटनेचं रिपोर्टिग पहिल्यांदा केलं ते ‘द पिंट्र’ या वेबसाइटमध्ये काम करणाऱ्या अपूर्व मंधानी नावाच्या तरुण पत्रकाराने. त्यानंतर खरं तर इतर कोणाही पत्रकाराने एफआयआरमधल्या तक्रारींवर आपलं लक्ष केंद्रित केलं असतं, पण तसं घडलं नाही.जानेवारी महिन्यात कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर त्यांना भेटले आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासनही दिलं. मेरी कोम आणि योगेश्वर दत्त यांच्यासारख्या क्रीडापटूंचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली.

ही तक्रार लैंगिक छळाची असल्यानं यात गोपनीयता अतिशय महत्त्वाची होती. पण फेब्रुवारीत दत्त यांच्या प्रशिक्षकाचा एक व्हिडीओ बाहेर आला. कॅमेऱ्यासमोर या प्रकरणाचे तपशील तर हे प्रशिक्षक देत होतेच, शिवाय ब्रिजभूषणच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचं दत्तने आपल्याला सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली.कुस्तीपटू अर्थातच नाराज झाले, नि:पक्षपाती चौकशी होईल यावरचा त्यांचा विश्वास उडाला आणि त्यांनी आपलं आंदोलन पुन्हा सुरू केलं. तोपर्यंत दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखलही करून घेतलेला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात तो दाखल करून घेण्यात आला.

जूनच्या पहिल्या आठवडय़ात ब्रिजभूषण यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीनं आपली तक्रार मागे घेतली. ब्रिजभूषण यांच्या दहशतीमुळे हे घडलं असं मत मोठय़ा प्रमाणात व्यक्त करण्यात आलं. गेल्या आठवडय़ात दिल्ली पोलिसांनी अखेर आपली चार्जशीट दाखल केली ज्यात ब्रिजभूषणचं नाव होतं. पण अर्थातच बाल लैंगिक शोषणाचा (पॉक्सो) गंभीर आरोप नव्हता. दिल्ली पोलीस हे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हाताखाली येतात. त्यामुळे भाजप ब्रिजभूषण यांना का वाचवत आहे असा प्रश्न खरं तर स्वाभाविकपणे विचारला जायला हवा होता.‘इंडियन एक्सप्रेस’चा अपवाद वगळता मुख्य प्रवाहातल्या फार माध्यमांनी हा प्रश्न विचारला नाही. मात्र, ‘न्यूजलाँड्री’त काम करणारा तरुण पत्रकार बसंत कुमार यानं आरोपीचं संपूर्ण व्यक्तिचित्रं लिहून या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पूर्व उत्तर प्रदेशात बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिजभूषण यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे ३० गुन्हे दाखल असल्याची माहिती कुमारने शोधून काढली. ब्रिजभूषण यांच्या एका व्हिडीओत तर आपण कसा एक खून केलेला आहे हे त्यांनी मोठय़ा अभिमानाने सांगितलेलं आहे. मतदारांत दबदबा, हाती गुंडांची फौज, पैशाचा माज आणि जातीचा प्रभाव असलेला हा माणूस भाजपच्या निवडणूक- यशासाठी फारच महत्त्वाचा. स्वत:च्या, तसंच पूर्व उत्तर प्रदेशातल्या आसपासच्या इतर अनेक मतदारसंघांमध्ये त्यांचा प्रभाव आहे.
थोडक्यात, सत्ताधाऱ्यांनी महिला कुस्तीपटूंच्या न्यायाच्या बदल्यात आपलं निवडणुकीतलं यश बळकट केलंय. थोडासा कणा असलेले पत्रकार या दोन्हीचा संबंध सहजच लावू शकले असते. कुस्तीपटूंची साक्ष अधिक संवेदनशीलतेनं मांडू शकले असते. अण्णा आंदोलन याच मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी कसं कव्हर केलं होतं ते जरा आठवून पाहा!

या प्रकरणातून दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात : महिलांना लैंगिक छळ होत असल्याची तक्रार करणं आजही किती कठीण आहे याची जाणीव ठळकपणे होते. समाज असो की प्रसारमाध्यमं वा पोलीस, कोणीही त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहिलं नाही.दुसरी गोष्ट म्हणजे, या प्रकरणात मुख्य प्रवाहातली माध्यमं तर उघडी पडलीच, पण क्रीडा पत्रकारांचं मूग गिळून गप्प बसणंही अधोरेखित झालं. आपल्या देशातल्या क्रीडा पत्रकारितेचं आजचं स्वरूप यातून स्पष्ट झालं. साक्षी मलिकने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली तेव्हा या सगळय़ांनी टाळय़ा पिटल्या, लेख लिहिले. आज ती जणू त्यांच्यासाठी अस्तित्वातच नाही. ज्या तरुण पत्रकारांना या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी हा धडा आहे. शारदा उग्र आणि प्रदीप मॅगझिन यांच्यासारख्या बुजुर्ग पत्रकारांचा अपवाद वगळता बहुतेक क्रीडा कॉमेंटेटर्सनी गप्प बसणं पसंत केलंय. खेळावर आपलं प्रेम असतं तेव्हा त्या क्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला रस असायला हवा. ती कव्हर करण्याचा ध्यास असायला हवा.

पण आपल्या देशातली क्रीडा पत्रकारिता सर्वसाधारणपणे क्रिकेटभोवती फिरते. आणि जय शहा हे आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष. दिल्लीच्या पोलिसांनी क्रीडापटूंशी केलेल्या व्यवहारावर टीका करायची म्हणजे जय शहा यांच्या वडिलांना प्रश्न विचारण्यासारखं! तसं केलं तर मोठय़ा क्रिकेटपटूंपर्यंत पोचण्याचा मार्ग तर बंद होऊ शकतोच, पण नोकरीवरही गदा येऊ शकते. म्हणूनच आपले देवासमान मानले जाणारे क्रिकेटपटू या प्रकरणाबाबत अवाक्षरही काढत नाहीत. ८३च्या विश्वचषक जिंकणाऱ्या संघातल्या क्रिकेटपटूंनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असं पत्रक काढलं. अनिल कुंबळे, इरफान पठाण, हरभजनसिंग यांनी जाहीरपणे कुस्तीपटूंच्या बाजूने भूमिका घेतली. नीरज चोप्रा, अभिनव बिंद्रा या खेळाडूंनीही स्पष्टपणे बोलणं पसंत केलंय. पण हे अपवाद म्हणायला हवेत.

इंग्लंड वा ऑस्ट्रेलियात आजही क्रीडा पत्रकार ठामपणे आपली मतं मांडतात. कोणाही मोठय़ा खेळाडूवर टीका करताना ते कचरत नाहीत. खेळाडू वा अधिकारी यांच्यापासून ते अंतर ठेवून असतात; तरीही वेळोवेळी त्यांना मुलाखत द्यायला खेळाडू तयार असतात. कोणत्याही दबावाशिवाय ते आपलं काम करू शकतात. भारतामध्ये क्रीडा पत्रकारिता म्हणजे आज केवळ जनसंपर्क झालाय. आणि जर जनसंपर्कच महत्त्वाचा ठरणार असेल तर कुस्तीपटू आणि त्यांचा लैंगिक छळ याविषयी कोणाला आस्था वाटण्याचं कारणच काय? ब्रिजभूषण, कोण आहेत ते?

Story img Loader