राजेश बोबडे

कधी कधी उपदेशकच समाजाचा विनाश कसे करू शकतात याबद्दल सजग करताना प्रचारक व कार्यकर्त्यांना उद्देशून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘साऱ्या जगातील घडामोडी आजवर बऱ्या-वाईट प्रचाराद्वारेच होत आल्या आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. निष्कामवृत्तीने लोकहिताच्या कार्याचा प्रचार करणारा वर्ग ज्या ज्या वेळी जागरूक होता, त्या त्या वेळी जग उन्नतीच्या शिखराकडे जात होते आणि स्वार्थप्रेरित किंवा अविचारी वृत्तीचे प्रचारक जेव्हा जगात वावरत होते, त्या वेळी जग मरणाच्या खाईकडे ओढले जात होते, ही गोष्ट इतिहासाच्या सूक्ष्म अभ्यासाने आपल्या लक्षात येऊ शकेल.’’

‘‘संत ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे जाणत्या लोकांवर, ‘जे जे आपणास ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करून सोडावे। सकळ जन।।’ याची फार मोठी जबाबदारी असते व ते जर ती इमानेइतबारे पार पाडत राहिले तर जगात सुखसमृद्धीचे सत्ययुग नांदायला काहीच अडचण राहत नाही. परंतु त्यांनीच जर आपले कर्तव्य सोडले आणि उलट आपल्या विद्वत्तेपासून धनोपार्जन करण्याचा सपाटा लावला तर जगाचा सत्यनाश व्हायलाही वेळ लागत नाही. जगात व विशेषत: भारतात जी स्थिती अनेक वर्षांपासून अनुभवास येत आहे तिचे कारण, जाणत्यांनी आपल्या कर्तव्यास तिलांजली देऊन, आपल्या बुद्धिमत्तेला स्वार्थाचे एक अमोघ साधन बनविले, हेच आहे! जाणत्यांनी मनुष्यहिताच्या व्यापक दृष्टीने, प्रेमाने व निष्कामबुद्धीने ज्ञानाचा प्रचार केला असता तर भारत आज जगाचे नेतृत्व करताना दिसला असता, एवढी भारताची थोरवी आहे. आमचे पंडित, पुराणिक, भिक्षुक, शिक्षक, पुढारी, कीर्तनकार व बुवा इत्यादी लोक आतापर्यंत प्रचार करीत आले नाहीत असे नाही, पण ‘आशाबद्ध वक्ता’ जगाला खरे ज्ञान काय देणार? बहुजन समाजाला काय सांगायचे हे सर्व त्यांच्याच हाती होते. अशा स्थितीत आपली पकड कायम राहून परंपरेने आपला फायदा होत राहील, असेच विचार समाजाच्या डोक्यात घुसवणे, त्यांच्यापैकी बहुतेकांना पसंत पडले व तशाच वाङ्मयाची, व्याख्यांनाची आणि कथाकीर्तनांची राळ त्यांनी समाजात उडवून दिली. धनवंतांकडून वर्षांसने सुरू राहावीत म्हणून त्यांची मने न दुखवता समाजास त्यांचे गुलाम करून सोडले आणि उपदेशाच्या नावाखाली उथळ व भ्रामक मनोरंजन करून लोकांचा बुद्धिभ्रंश केला. शस्त्राने प्रत्यक्ष वध करण्यापेक्षा बुद्धिभेद करणे हे अधिक भयावह व विनाशकारक असते, याचे प्रत्यंतर आजवर भारतास आलेच आहे. उपदेशकवर्गापैकी काही लोकांनी प्रामाणिकतेने समाजशिक्षणाचे पवित्र कार्य केले ही गोष्ट विसरता येत नाही, तथापि असे लोक बोटावर मोजण्याइतपतच होते. शिवाय ते निघून जाताच त्यांच्या उपदेशाचे स्वरूप पालटून टाकण्याइतके दक्ष बाकीचे लोक समाजात आहेतच! नाही का?’’ महाराज आपल्या भजनात म्हणतात,

उपदेश भी तो कष्ट है,

   सबको सुभीता है नहीं।

सत् बात को समझेबिना,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

   उपदेश फलता ही नहीं।।