स्वातंत्र्योत्तर काळात, १९५२ च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीआधी क्रांतीचे नारे सुरूच असताना एका प्रवचनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : देशात आज जिकडेतिकडे क्रांतीच्या गर्जना सुरू आहेत. सर्वाना याची जाणीव झाली आहे की, देशात आज क्रांती होणे आवश्यक आहे, मग ते कोणत्याही पंथ- पक्षाचे लोक असोत! पण ही ‘क्रांती’ म्हणजे तरी काय? धामधूम, गुंडगिरी, अराजकता म्हणजे क्रांती असे म्हणता येईल का? नाही.. क्रांती ही विध्वंसासाठी नव्हे तर शांती प्राप्त व्हावी म्हणून करावयाची असते. सर्वाना क्रांतीची भूक लागली आहे. याचाच अर्थ हा की देशाचे जीवनमान फारच खाली आले आहे. याची जाणीव सर्वाना झाली आहे. अर्थात या स्थितीत बदल होणे, परिवर्तन होणे आवश्यक आहे हे परिवर्तन म्हणजेच क्रांती! परंतु अलीकडे लोक क्रांतीचा अर्थ रक्तपात, हाणामारी करू लागले आहेत, तो चुकीचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रांतीच्या अपरिहार्यतेविषयी महाराज तरुणांना उद्देशून म्हणतात : जग हे नेहमीचेच क्रांतिशील आहे; क्रांती हा त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे. जग सदैव क्रांतीचे गीत गात चाललेले असते. जगातील अशी कोणतीच वस्तू नाही की ज्यामध्ये क्रांती होत नाही. जग या शब्दाच्या मुळातच क्रांतीचा ध्वनी साठवलेला आहे. धान्य पेरून त्यांना त्यांची विशिष्ट फळे आल्यावर कापणी करावी लागते आणि तेच धान्य पुन्हा मिळावे म्हणून हाती आलेली धान्यबीजे फिरून भूमीत पेरावी लागतात. याप्रमाणे नेहमीच होत राहणाऱ्या क्रांतिचक्रातून जगाचे जीवन समृद्ध होत असते. जगाच्या आंदोलनात मध्यिबदू कायमचा टिकत नसतो, कोणत्या तरी बाजूला अधिक-उणेपणा येतोच, आणि तो घालवून फिरून घडी बसविण्याकरिता क्रांती करावीच लागते.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara the inevitability of revolution rashtrasant tukdoji maharaja amy
First published on: 22-05-2023 at 01:24 IST