– अतुल सुलाखे
वेदान्तो विज्ञानं विश्वासश्चेति शक्तय: तिस्र:
यासां स्थैर्य नित्य शांतिं – समृद्धीं भविष्यतो जगति।
– विनोबा १६ – ८ – १९५९
वेदांत, विज्ञान आणि विश्वास या तीन शक्ती आहेत. त्या स्थिरावल्या तरच या विश्वामध्ये निरंतर समृद्धी नांदेल. विनोबांच्या विचारांचे सार, भविष्यातील मानवी समाजाचे त्यांच्या मनातील चित्र याहून नेमक्या शब्दात सांगता येणार नाही. वर्ष १९५८ मध्ये त्यांनीच हा श्लोक लिहिल्यामुळे त्यावर वेगळय़ा टिप्पणीची गरज नाही.
साधारणपणे १९४२ पासून विनोबांनी आत्मज्ञान आणि विज्ञान यांचे ऐक्य कशाप्रकारे होऊ शकेल यावर चिंतन सुरू केले. तोवर त्यांच्या गीता चिंतनाचा पहिला टप्पा जनतेसमोर आला होता. गीतेचे तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणायचे, तर त्याला आधुनिक विज्ञानाची जोड द्यावी लागेल हे त्यांच्या ध्यानात आले. आत्मज्ञान आणि विज्ञानाचा मेळ बसावा त्याचा म्हणून त्यांनी विश्वास शक्तीची निवड केली.
विधायक आणि आधुनिक दृष्टीची ही कमाल म्हणायला हवी. यानंतर दशकभर ही दृष्टी घेऊन विनोबांनी कार्य केले. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये परंपरा आणि नवता यांचा मिलाफ दिसतो. कधी मूर्त स्वरूपात तर कधी अमूर्त. ही पूर्वपीठिका ध्यानात घेतली की त्यांच्या राजकीय दृष्टीची कल्पना येते.
या भूमिकेतूनच त्यांनी सत्याग्रहाचे नवीन रूप मांडले. विनोबांच्या मते, आधुनिक विज्ञान युगाच्या आरंभामुळे मानवी समाजाचे भौतिक आणि मानसिक रूप बदलून जाईल. या अणुयुगात मनुष्याचे मन बदलले तरच ही प्रजाती टिकेल. एरवी ती नष्ट होईल.
हे विज्ञानयुग मनुष्याला सांगते आहे की बाबा रे, तुझे मन जीर्णशीर्ण झाले आहे. ते फेकून दे आणि नव्या मनाचा स्वीकार कर. या नव्या मनाच्या साहाय्याने नवविचारांचा स्वीकार कर. जुनाट मन आणि जुनाट दृष्टी कायम ठेवशील तर विनाशाचा धोका समोर उभा आहे.
ते पुढे सांगतात, माणसाचे मन व्यक्तिगत असले तरी बुद्धी समाजामुळे विकसित होते. विज्ञान युगात व्यक्तिगत मनाचा आधार घेत सामाजिक बुद्धीचा त्याग केला तर मानसिक संघर्ष अटळ आहे. परिस्थिती अशीच राहिली तर होणारा संघर्ष फार भयानक असेल. त्यामुळे सत्याग्रह करुणामूलकच असला पाहिजे. स्वराज्यानंतरचे सत्याग्रह हे मागील अंकावरून पुढे अशा प्रकारचे आहेत. सत्याग्रह शब्दाची भीती वाटावी असे चित्र निर्माण झाले आहे. विज्ञानामुळे एका जागी बसून जगाला आग लावता येत असेल तर मग आपल्याला एका ठिकाणी बसून जगाला वाचवणारा, वैश्विक शांतता निर्माण करणारा मार्गही शोधला पाहिजे. त्यासाठी परम व्यापक बनून खोलात जाणे आवश्यक आहे.
ही भूमिका अतिआदर्शवादी, भाबडी आणि अपयशाला बोलावणे धाडणारी आहे अशी त्यांच्यावर टीका झाली. परंतु विनोबा जी भूमिका मांडत होते ती कोणत्याही टप्प्यावर कल्याणदायीच होती. कारण अंतिम कल्याणाचा मार्ग कोणत्याही टप्प्यावर आतबट्टय़ाचा नसतो. याउलट तडजोडीचा मार्ग स्वीकारला तर होणाऱ्या पतनाला सीमा नसते. विनोबांसमोरच या पतनाला सुरुवात झाली होती. तरीही विश्वात समृद्धी नांदण्याचा दुसरा मार्ग नाही याची त्यांना खात्री होती.
jayjagat24@gmail.com