रात्रीच्या नीरव शांततेत झोपायचे सोडून स्लोअर शहाणे जागरणच अधिक करत असे. या जागरणाला काही हेतू असे, असेही नाही. रात्र जसजशी गडद काळ्या शाईसारखी आसमंतात पसरू लागे, तसा याचा जागरणाचा उत्साह वाढे. कॉलेजात असताना अशा रात्री मग सगळे दिवे बंद करून स्लोअर टीव्ही पाहत असे. नव्वदच्या दशकाच्या अखेरीस स्लोअरचे कॉलेज सुरू असतानाच केबल टीव्ही नावाने प्रसिद्ध झालेली दूरसंचार क्रांती आली. या तारा बहुतांश मध्यमवर्गीय घरांच्या गच्चीवरील अँटेनांना चिकटल्याचा तो काळ. त्या तारांतून येणाऱ्या मजकुराने टीव्हीचा पडदा अधिक रंजक केला. जे त्या पडद्यावर दिसत होते, ते सगळेच मनोज्ञ किंवा प्रेक्षणीय होते असेही नाही. पण, आपल्याला खूप सारे ‘दिसायला’ लागले आहे आणि आपण ते ‘बघत’ आहोत, हे त्याबरोबर आलेले अप्रूप अधिक मोलाचे होते. स्लोअरच्या आयुष्यातही ही ‘दृश्ये’ बहार आणत होती.
एकदा कॉलेजात वाचन या विषयावर वर्गातच गटचर्चा सुरू होती. वाचनाचे महत्त्व, किती आणि कोणती पुस्तके वाचणे गरजेचे आहे वगैरे मुद्दे मांडले जात होते. स्लोअरने जरा दबकत दबकतच एक मुद्दा उपस्थित केला. त्याचे म्हणणे होते, ‘इथून पुढे वाचन पुरेसे पडेल? की, त्यात पाहणेही जोडायला हवे?’ या प्रश्नावर कुणीच काही बोलले नाही आणि नंतर वेगळाच मुद्दा येऊन स्लोअरचे हे दोन प्रश्न मागे पडले. त्या गटचर्चेपुरते त्याचे मुद्दे मागे पडले, तरी त्याच्या डोक्यातून ते जाणे शक्यच नव्हते. स्लोअर ते दोन प्रश्न घोळवत घोळवतच त्या दिवशी घरी आला. आल्या आल्याच त्याने ठरवले, की आज रात्री आपल्याला जास्त जागायचे आहे. जागरणाचा हेतूही स्पष्ट होता, त्या दोन प्रश्नांची उत्तरे शोधणे… मध्यरात्री सुरू करून उत्तररात्रीपर्यंत पाहायचा सिनेमा पाहून झाल्यावर स्लोअरने त्या रात्री का कुणास ठाऊक एक जुना अल्बम चाळायला घेतला. त्याच्या लहानपणापासून तरुण होईपर्यंतच्या काळाचे ठिपके त्या अल्बममध्ये साठवलेले होते. त्याच्या आई-वडिलांनी मोठ्या निगुतीने तो दिवाणाच्या एका कप्प्यात तलम अंथरुणाखाली ठेवला होता. अधेमधे तो बाहेर काढून स्मरणरंजनाचा खेळ खेळणे स्लोअरच्या कुटुंबाला आवडायचे. स्लोअर गोष्टीवेल्हाळ असल्याने त्या छायाचित्रांना चिकटलेल्या गोष्टी ऐकण्यात लहानपणी स्लोअरला भारी मौज वाटे. त्या छायाचित्रांमध्ये तो सगळा भूतकाळ आणि त्या गोष्टी जणू गोठवून ठेवलेल्या आहेत, याचे त्याला फार अप्रूप होते. तर, त्याही दिवशी त्याने असाच तो अल्बम स्मरणरंजनाचा खेळ खेळण्यासाठी उघडला, तेव्हा त्याच्या डोक्यात वाचणे आणि पाहणे याच्याशी संबंधित त्याला पडलेल्या दोन प्रश्नांचे आवर्तन सुरू होते.
‘स्लोअरने ‘त्या’ रात्री अल्बम पाहिला,’ ही गोष्ट पुढे सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगायला हवी, की स्लोअरला शालेय वयात वेगवेगळ्या काड्यापेट्यांची कव्हरं, चॉकलेटच्या वेष्टणावर येणारी टीव्ही मालिकांतील कलाकारांची, क्रिकेटपटूंची छायाचित्रं असं काहीबाही जमविण्याचा छंद होता. असाच छंद असलेल्या त्याच्यासारख्या काही जणांशी तो या छायाचित्रांची देवाण-घेवाणही करत असे. उद्देश हा, की आपल्याकडचे वैविध्य वाढले पाहिजे. शिवाय, क्रिकेटपटूंची काही आगळी-वेगळी पुस्तकेही त्या वेळी निघत. म्हणजे एखादा फलंदाज एखादा फटका मारतो आहे, हे चित्र हलत्या स्वरूपात पाहता यावं, अशा दृष्टीने तो फटका मारताना कोणकोणत्या वेगळ्या अवस्था होतात, याची चित्रं पानांवर काढलेली असत आणि ती सगळी पानं भर्रकन पत्ते पिसल्यासारखी उलटली, की तो फलंदाज तो फटका मारतानाचे दृश्य तयार व्हायचे. गोलंदाजाचेही तसेच. तो चक्क चेंडू टाकतो आहे, असा भास निर्माण व्हायचा. याचा परिणाम असा झाला, की गोष्ट फक्त शब्दांत नसते, तर दृश्यांच्या बारकाव्यांतही असते, याचे भान स्लोअर शहाणेला त्याच्याही नकळत येऊ लागले.
तर, हे भान ठेवूनच स्लोअर त्याही रात्री जुना अल्बम चाळत होता. त्या रात्री त्याने तो अल्बम अधिक बारकाईने पाहिला. त्याला लक्षात आले, की लहानपणापासून काढलेल्या छायाचित्रांची मिळून एक गोष्ट तयार होते आहे. फक्त त्याची गोष्ट नाही, तर तो ज्यांच्याबरोबर मोठा झाला, त्या आई-बाबांसह नातेवाईक, आप्त, मित्र परिवार अशा सगळ्यांची मिळून एक. पण, ही गोष्ट पाहताना छायाचित्रांतील हावभावांवर ती बेतून चालणार नाही, तर त्या हावभावांचेही नीट ‘डिकोडिंग’ करावे लागेल. म्हणजे, कॅमेऱ्याकडे कसे पाहायचे, हे नीट न कळल्याने उमटलेले अवघडलेले हावभाव वेगळे, कॅमेऱ्याचा फ्लॅश पडल्यामुळे मिटलेल्या डोळ्यांमागचे भाव वेगळे, छायाचित्र टिपणाऱ्याला चित्रचौकट न कळल्याने त्या चौकटीतून निसटलेले किंवा उगाच घुसडले गेलेले नेपथ्य वेगळे, रोल संपवायचा म्हणून काढलेल्या छायाचित्रांतील उदास निसर्गसौंदर्य वेगळे आणि कॅमेऱ्याच्या लेन्सवरच बोट ठेवून छायाचित्र काढले गेल्याने निर्माण झालेल्या अंधाराचे गुपित वेगळे. हे सगळे खोलात समजून घेतले, तरच गोष्ट संपूर्ण होते. हे समजून घेऊन स्लोअरने त्यावरून गोष्ट तयार केली आणि शीर्षक ठेवले, ‘अवघडलेपणाने मिटलेल्या डोळ्यांतून निसटलेल्या नेपथ्यातील सौंदर्य शोधणाऱ्या स्वप्नाचे अंधारातील गुपित!’
स्लोअरने जेव्हा ही गोष्ट लिहिली आणि हे शीर्षक त्याला सुचले, तेव्हा त्याला कल्पना नव्हती, की अजून २५ वर्षांनी अल्बम ही कपाटात जपून ठेवण्याची आणि स्मृती अनावर झाल्यावर त्याला स्पर्श करून हाताळण्याची गोष्टच राहणार नाहीये, तर तो केवळ मोबाइल फोनवरचे वेगवेगळे कप्पे उघडून बोटाने पुढे ढकलण्याचा चाळा होणार आहे. पण, स्लोअर जसा मोठा झाला, तसे हे अपरिहार्यपणे झालेच. अनिमिष नेत्रांनी मोबाइल फोनच्या पडद्याकडे शून्य अवस्थेत ‘पाहत राहणे’ हे नित्यकर्म आहे, असे नवे भान त्याला यामुळे आले. डोळ्यांसमोरून नेमके काय सरकते आहे आणि त्याची आपण गोष्ट तयार करू शकतो आहोत का, हेच त्याला कळेनासे होई.
नव्या भानासह स्लोअर जगू लागला, तेव्हा गरजांच्या यादीत अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबर स्मार्ट फोन, वायफायचाही समावेश झाला होता. कुठेही, कसेही नुसते ‘क्लिक’ या आवाजाने किंवा कॅमेऱ्यासमोर नुसते उभे राहण्याने फोटो निघू लागले. स्वत:ला आरशात ओशाळले वाटू नये, म्हणून ‘सेल्फी’ या आनंदी प्रकाराचीही निर्मिती झाली होती. त्याने स्लोअरसकट आजूबाजूच्यांचा अहं छान सुखावला होता. आता आपली ‘प्रतिमा’ चांगली का वाईट, हे आपणच ठरवणार, असा आत्मविश्वास आल्यासारखे वाटू लागले. पण, या जगण्यातली प्रारंभिक मौज संपल्यावर त्याला हे जगणे यांत्रिक वाटू लागले. फक्त हसरे चेहरे जाऊन प्रतिमांत भेसूर चेहरेही टिपले जाऊ लागले. ‘नव्याचा लवकर कंटाळा येण्याचा काळ सुरू झाला,’ असे वाक्य त्याने कधी तरी याच सुमारास आपल्या रोजदिनीत लिहिले. हे वाक्य लिहिल्यानंतर त्याला जाणवले, की नव्याचा कंटाळा येत असताना नव्या वेष्टणातील जुन्याचे आकर्षण मात्र वाढते आहे. जुने अमुक, जुने तमुक, जुन्याची नवलाई, जुने ते प्लॅटिनम असे पुकारे आजूबाजूला ऐकू येऊ लागले. स्लोअरला यामुळे प्रश्न पडू लागला, की नक्की अप्रूप कशाचे वाटायला हवे. त्याच वेळी त्याने ‘रिमिक्स’ हा त्याच्या कॉलेजकाळातच उगम पावलेला शब्द नव्याने ऐकला आणि त्याला उलगडले, की आपल्या जगण्याचीच आता भेळ झाली आहे. या आकलनाच्या दिवशीच त्याने पुन्हा दिवाणातून जुना अल्बम काढला आणि तो पाहण्यासाठी हातात धरला. मात्र, त्या दिवशी अल्बमची पाने त्याच्याच्याने पुढे उलटेनात. त्याने कारण शोधले, तेव्हा त्याच्या लक्षात आले, की तो अल्बमची पाने बोटाने पुढे ढकलू पाहत होता!