‘कीर्तनी येई सद्गुरू राया, मतिमंद मी काहीच नेणे, सांख्य अथवा गुणा’ अशा निरूपणाने सुरुवात करत महाराजांनी ‘पुंडलिक वरदा हारी विठ्ठल’ असा गजर करताच समोर जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाने जोरदार प्रतिसाद दिला. तो बघून ते क्षणभर भारावले. मुलीच्या साक्षगंधावरून कितीही टीका झाली तरी श्रोते आपल्यावर तेवढेच प्रेम करतात, तेव्हा स्पष्टीकरण देण्याची संधी आज साधायचीच असे मनाशी ठरवत त्यांनी व्यासपीठावरील देवाला साष्टांग दंडवत घातला.

बळेच डोळ्यात पाणी आणत ते म्हणाले, ‘हे देवा, ईश्वरा, भगवंता, मी उभ्या आयुष्यात कधीही चुकलो नाही. होय, मी म्हटले ‘लग्न होता साधे साजिरे, तरी होतील ना पोरे, मग कशाला हवा रे डामडौल’ पण हे सारे माझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या गरिबांसाठी होते. त्यांनी थाटामाटात लग्ने करू नयेत असे मला सांगायचे होते. माझे अनेक भक्त श्रीमंत आहेत. माझ्यावर अपार प्रेम करूनही ते त्यांच्याकडील लग्नात भरपूर पैसा खर्च करतात. त्यावर कुणी बोलत नाही. तुझ्या कृपेने मी श्रीमंत झालो व मुलीच्या इच्छेचा मान राखला तर एक बाप म्हणून मी काय गैर केले तूच सांग देवा! प्रबोधन करणे हा माझा व्यवसाय आहे. तो मी इमानेइतबारे करत असताना माझ्या खासगी आयुष्यात इतरांनी नाक खुपसण्याची गरज काय? आता मी ‘लग्न करता महागडे, एक पाऊल पडते पुढे, तरी चार शब्द खडे, सुनावती’ असे म्हणायचे काय? तूच कौल दे आता देवा! ‘देवा मी एक पामर, काय खोटे, काय खरे, आता धाव रे सत्वर, वाचिव मला’

आजवर मी भरपूर बिदागी घेतली असली तरी झिजलो मात्र गरिबांसाठी. त्यात कधी खंड पडू दिला नाही. हे ठाऊक असूनही टीकाकारांना जलनवायू सुटण्याचे कारण काय? तिरुपती बालाजीनेसुद्धा लग्नासाठी कर्ज काढले होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच भक्त त्याला पैसे दान करतात. माझी तर तीही अपेक्षा नाही. मिळेल त्या बिदागीवर समाधान मानणारा मी माणूस. त्यातून चार पैसे उधळले तर एवढे विचारजंतू वळवळण्याचे कारण काय? त्यातल्या एकाने मला तुकारामांचा दाखला देत ‘ऐसे संत झाले कळी, तोंडा तंबाखूची नळी’ असे हिणवले. त्यानंतर रागाच्या भरात मी डोक्यावरचा फेटा उतरवण्याचा निर्णय जाहीर केला. नंतर घरच्यांनी तसेच शेकडो श्रोत्यांनी किमान लग्न होईपर्यंत तरी असे करू नका या शब्दात विनवले. मग मात्र मी खंबीर होत टीकाकारांना सामोरा गेलो व लग्न आणखी धूमधडाक्यात करीन, असे जाहीर केले. हाच खंबीरपणा आयुष्यभर जोपासण्यासाठी आता तुझी साथ हवी आहे देवा!

लोक म्हणतात धनवानांना धर्म नसतो. ना जात असते ना पंथ. माझे तसे नाही देवा. माझा पंथ कीर्तनकाराचाच. साठवलेला पैसा अशा समारंभातून उधळला तर गरिबांचेच भले होते. अर्थव्यवस्थेला चालना मिळते हे या टीकाकारांना कोण समजावून सांगणार? तेव्हा देवा आता तूच कौल दे. ‘केले सारे गरिबांसाठी, तेच लागले माझ्या पाठी. आता सांग मी कुठल्या गाठी, बांधूनी ठेवू!’ यानंतर महाराज हमसून हमसून रडू लागले. अख्खा मंडप आता देव काय कौल देतो याकडे डोळ्यात प्राण आणून बघू लागला. तेवढ्यात देवासमोरचा दिवा विझला. मंडपात देवाने कौल नाकारला अशी चर्चा सुरू झाली व श्रोते उठून जाऊ लागले. ‘अरे, थांबा, हा कौल नाही, दिवा वाऱ्याने विझला’ असे महाराज ओरडून सांगू लागले पण ऐकायला कुणी थांबलेच नाही.