महेश सरलष्कर

संसदेत गंभीर चर्चा होणेच अपेक्षित असते; पण नव्या संसद इमारतीमधील पहिल्या चार दिवसांत हे गांभीर्य जाणवले का?

गाजावाजा करत सुरू झालेले संसदेचे विशेष अधिवेशन संपले. महिलांच्या आरक्षणाचे विधेयक संमत झाले. नेहरूकालीन इतिहास बाजूला ठेवून खासदारांनी संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही दिली. मग, भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी मोदींना खोटे ठरवले. निशिकांत दुबे यांच्यासारखे लढवय्ये भाजप नेते बिधुरींच्या वाह्यातपणाचे खापर विरोधकांवरच फोडत आहेत. हिंदूत्वाच्या विचारांसाठी लढणाऱ्या भाजपच्या नेत्यांची पाठराखण केली जाते, बिधुरींचीही केली जात असेल तर नवे काही नाही. या वादापलीकडेही अनेक गोष्टी चार दिवसांच्या अधिवेशनात घडल्या.

हेही वाचा >>> अग्रलेख : गुणवत्तेच्या बैलाला..

संसदेचे विशेष अधिवेशन विरोधकांना अंधारात ठेवून केलेला सुनियोजित इव्हेन्ट होता. मोदींच्या नेतृत्वाची खुंटी हलवून बळकट करणारा उत्सव होता. मोदींनी संसदेत चार दिवसांमध्ये सहा वेळा भाषण केले. त्यातही एकाच दिवशी सलग तीन भाषणे केली. या सहाही भाषणातील मुद्दे कमी-अधिक फरकाने सारखेच होते. दोन भाषणे अतिदीर्घ होती, ती ऐकताना भाजपचे वरिष्ठ मंत्री सभागृहात जांभया देत होते. मध्यवर्ती सभागृहात मोदींचे भाषण ऐकतानाच भाजपचे काही खासदार गप्पांत मश्गूल होते. काही खासदार मोबाइलवर चॅटिंग करत होते. या कार्यक्रमातून संसदेच्या जुन्या वास्तूला निरोप दिला गेला, तिथून मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्री-नेते नव्या इमारतीत गेले. मग मोदींनी नव्या लोकसभेत भाषण केले, तिथून ते राज्यसभेत गेले; तिथे त्यांनी भाषण केले. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले म्हणून लोकसभेत छोटेखानी भाषण केले. मग मोदींनी राज्यसभेत रात्री उशिरा आभाराचे भाषण केले. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता! मध्यवर्ती सभागृहातील निरोपाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मोदी सत्ताधारी-विरोधी खासदारांच्या भेटीगाठी घेत होते. एका कोपऱ्यात मोदींचे राज्यसभेतील एक कट्टर विरोधक खासदार उभे असलेले दिसले. या पत्रकार खासदारांची राज्यसभेतील मुदत आता संपत आलेली आहे. मोदी या खासदारांसमोर थांबले, त्यांनी खासदारांच्या पाठीवर थाप मारली आणि मिनिटभर ते या खासदारांशी बोलत होते. मोदींच्या विरोधी खासदाराशी झालेल्या हास्यविनोदाची चर्चा रंगली होती!

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : एस. जयचंद्रन

नव्या संसद इमारतीमध्ये इतकी गर्दी झाली होती की, जणू जत्रा भरली असावी. महिला आणि शाळकरी मुला-मुलींचे लोंढे आत जा-ये करत होते. त्यांना महिला आरक्षणाचे महत्त्व पटवून दिले जात असावे. दोन्ही सभागृहांच्या बाहेर लांबलचक रांगा लागल्या होत्या. नव्या संसद इमारतीत कुठे काय आहे याची तिथल्या कर्मचाऱ्यांनादेखील माहिती नाही तर बाहेरून आलेल्या भाजपच्या तमाम महिला कार्यकर्त्यांना कुठून कळणार? अनेकदा ही मंडळी वेगळय़ाच कक्षात घुसत होती. कोणी पिण्याच्या पाण्यासाठी धावत होते, कोणी कँटीन शोधत होते. भाजपने दिल्ली, राजस्थान, गुजरात इथूनही शेकडोच्या संख्येने लोक नव्या संसद इमारतीच्या दर्शनासाठी आणले होते.

आले कोण कोण?

संसद भवनातही दरवर्षी देशभरातून मोठय़ा संख्येने लोक अधिवेशनाचे कामकाज पाहायला येत असत. संसदेच्या आवारात नेहमीच गर्दी असे, त्यामुळे नवी संसद इमारत पाहायला लोक आले तर नवल काहीच नाही. यापूर्वी संसदेला असे जत्रेचे स्वरूप कधीच आलेले पाहिले गेलेले नाही. राज्यसभेत प्रेक्षक कक्षामध्ये अत्यंत शांतता पाळावी लागते. पण हा नियम धुळीला मिळाला होता, प्रेक्षक कक्षाचा औचित्यभंग करून ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा दिल्या गेल्या. त्याविरोधात ‘तृणमूल काँग्रेस’च्या खासदाराने आता राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहिले आहे.

भाजपमध्ये अनेक ‘स्टार कलाकार’ आहेत, जसे बिधुरी आहेत तसेच केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर आहेत. ठाकूर यांनी बॉलीवूडमधील आपले नेटवर्क वापरून संसदेमध्ये बॉलीवूडमधील काही आघाडीच्या अभिनेत्रींना आमंत्रित करून अशी काही वातावरण निर्मिती केली होती की, त्या अभिनेत्रींचा तिथला वावर पाहून त्यांनीच महिला आरक्षण विधेयक संमत केले असल्याचा भास व्हावा! नव्या संसद इमारतीच्या मध्यवर्ती भागामध्ये ‘संविधान कक्ष’ उभारण्यात आला आहे. तिथे संविधानाची प्रत ठेवली गेली आहे. त्याच्या आजूबाजूला भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक पैलू पाहायला मिळतात. ठाकूर सभागृहापेक्षा संविधान कक्षामध्ये अधिक व्यग्र होते. सलग चार दिवस मुंबईहून एकामागून एक अभिनेत्री येत होत्या. त्यांच्याभोवती पत्रकारांचा, बाहेरून आलेल्या महिलांचा, मंत्र्यांचा-नेत्यांचा गराडा पडला होता. या अभिनेत्री चोख मेकअप करून आलेल्या होत्या. पण, दिल्लीत प्रचंड उकाडा होता. तळपत्या सूर्यामुळे त्या हैराण झालेल्या होत्या. त्यातच त्यांना चॅनलवाल्या पत्रकारांना बाइट द्यावा लागत होता.

भाजपच्या एका माजी मंत्र्याला संसदेत आलेल्या एका अभिनेत्रीची भेट घ्यायची होती. बिहारमधील हे उर्मट भाजप नेते कामापेक्षा मंत्रिपदावरून उचलबांगडी झाल्यामुळे अधिक प्रकाशझोतात आले होते. जुन्या संसदेच्या मुख्यद्वारासमोर नव्या संसदेचे मकरद्वार असून तेच आता मुख्यद्वार बनले आहे. इथून खासदार-मंत्री ये-जा करतात. या मकरद्वाराच्या पायऱ्यांवर घामाने निथळलेली एक अभिनेत्री बाइट देत होती. हे माजी मंत्री पायऱ्या उतरून पुढे निघाले. त्यांचे लक्ष मात्र या अभिनेत्रीकडे होते. त्यांनी आपल्या साहाय्यकाला कार आणायला सांगितली, ते कापर्यंत गेलेही, पण ते मागे वळले, पुन्हा पायऱ्या चढून ते अभिनेत्रीपाशी गेले. त्यांनी तिच्या भोवतीचा गराडा बाजूला केला, स्वत:ची ओळख करून दिली. अभिनेत्रीने नम्रपणे त्यांचा नमस्कार स्वीकारला. मग या माजी मंत्र्यांची कळी खुलली, ते कारमध्ये बसून निघून गेले.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : जिनपिंग यांचा प्रभावच ‘लुप्त’?

विसर कोणाचा?

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दाखवलेल्या उत्साहाची दखल सभागृहात घेतली जाणे साहजिक होते. बॉलीवूडच्या नटय़ांना आमंत्रण देऊन बोलवले जात असेल तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूना का नाही, असा प्रश्न विचारला गेला. पण त्यांना बोलावले जाण्याची शक्यता नव्हती. विशेष अधिवेशनाचे चार दिवस मोदींचे होते, त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आरक्षण विधेयक संमत झाले. भाजपने इतिहास निर्माण केला, त्याचे श्रेय त्यांनी मोदींना दिले. संसदेत आलेल्या अभिनेत्रींनी मोदींचे कौतुक केले. विरोधकांचे म्हणणे होते की, निदान चंद्रयान मोहिमेची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांना तरी बोलवायचे. त्यांना निमंत्रण दिले असते तर महिला शास्त्रज्ञांचा सन्मान झाला असता. सिनेमाच नव्हे तर वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये स्वत:च्या मेहनतीने, बौद्धिक क्षमतेने, कौशल्याने यशाच्या पायऱ्या चढलेल्या अनेक महिला या देशात असताना भाजपच्या मंत्र्यांना फक्त बॉलीवूडच कसे दिसले? संसद इमारत हा कर्तव्यपथ नव्हे, जिथे संध्याकाळी गवतावर बसून शिळोप्याच्या गप्पा माराव्यात. इथे गंभीर चर्चा होतात, राजकीय मुद्दय़ांवर मते मांडली जातात, लोकांचे प्रश्न उपस्थित केले जातात. तिथे उथळपणाला प्रोत्साहन कशासाठी द्यायचे असा विरोधकांचा सवाल चुकीचा नव्हे!

विशेष अधिवेशनाचा एकमेव अजेंडा महिला आरक्षण विधेयक हाच होता. दोन्ही सदनांमध्ये हे विधेयक संमत करायचे असल्यामुळे कामकाज चार दिवस चालले. लोकसभेत विधेयकावर चर्चा होत असताना राज्यसभेत चंद्रयानवर चर्चा केली गेली. त्यातून निष्पन्न काय झाले हे कोणालाही कळले नाही. लोकसभेत चंद्रयानची चर्चा होत असताना सभागृहात अमित शहा वगैरे वरिष्ठ मंत्री नव्हते. त्यामुळे भाजपच्या रमेश बिधुरीसारख्या उथळ खासदारांना रान मोकळे होते. बिधुरी सभागृहामध्ये बागेत फिरल्यासारखे वावरत होते. लोकसभाध्यक्षांच्या आसनाच्या मागे दोन्ही बाजूला दोन दरवाजे आहेत. एखाद्या लहान मुलाप्रमाणे बिधुरी दरवाजा उघडून शोधाशोध करताना दिसले. तिथे काहीच नाही असे हातवारे करत ते पुन्हा गप्पा मारण्यात गुंग झाले. मग, त्यांना चंद्रयानावर बोलण्याची संधी मिळाली, तिचे त्यांनी ‘सोने’ केले. बिधुरींचे विचार इतके ‘लक्षवेधी‘ होते की, त्यापुढे भाजपच्या मुख्यालयात महिला कार्यकर्त्यांनी केलेले मोदींचे स्वागत, मोदींचे सातवे भाषणही फिके पडले. नव्या संसद इमारतीतील विशेष अधिवेशनाचे हे चार दिवस इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिले गेले आहेत. पुढील पिढय़ांसाठी ते ‘मार्गदर्शक‘ ठरू शकतील.

mahesh.sarlashkar@expressindia.com

Story img Loader