मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या ‘लीग ऑफ काँग्रेसमन’ची स्थापना मार्च, १९३९ मध्ये त्रिपुरी अधिवेशनात झाली होती. त्याचे कारण दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना करावयाच्या सहकार्याचा दृष्टिकोन व मार्ग हे होते. हे मतभेद विकोपाला जाऊन या गटाने काँग्रेसचा राजीनामा देऊन, बाहेर पडून डिसेंबर, १९४० मध्ये ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ची स्थापना केली. हा पक्ष आठ वर्षे कार्यरत होता. पुढे सत्तासंघर्ष, संधिसाधूपणा, भ्रष्टाचार, इ.चे राजकारणातील वर्चस्व व प्रभाव लक्षात घेऊन नवसमाज रचना व सेवा करण्याच्या उद्देशाने तो बरखास्त करण्यात आला. या बरखास्तीसाठी कलकत्ता येथे २६ ते ३० डिसेंबर, १९४८ या कालावधीत पार्टीचे जे अधिवेशन संपन्न झाले, त्याचे अध्यक्षस्थान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. या अधिवेशनात त्यांची उद्घाटन व समारोपप्रसंगी झालेली भाषणे महत्त्वाची ठरली होती. त्यानंतर ही मंडळी परस्पर विचारविनिमयार्थ दर दोन वर्षांनी वार्षिक अधिवेशन योजत असत. सन १९७३ च्या अधिवेशनात लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे मार्गदर्शन लाभले होते. याला संपूर्ण क्रांतीची पार्श्वभूमी होती. सन १९७५ च्या २६ डिसेंबरला अहमदाबादला संपन्न अशा अधिवेशनास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संबोधित केले होते. त्यास आणीबाणीची पार्श्वभूमी होती. ‘स्वातंत्र्य आणि सामाजिक दायित्व’ विषयावरील हे भाषण त्यांनी इंग्रजीत केले होते. ते ‘दि रॅडिकल ह्युमॅनिस्ट’ या रॉयवादाचे मुखपत्र असलेल्या इंग्रजी मासिकाच्या फेब्रुवारी, १९७६च्या अंकात ते प्रकाशित झाले होते. ते खरे तर मुळातूनच वाचावयास हवे.
त्यात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले होते ते की, आज जगात लोकशाहीपुढे दडपशाहीचे संकट उभे आहे. अशा वेळी वैचारिक आदान-प्रदानही त्यास एक पर्याय म्हणून उभा राहू शकतो. जेव्हा लोकशाही संकटात येते, तेव्हा अंतर्गत दबाव देखरेख आणि हस्तक्षेप तिचे रक्षण करू शकतो. लोकशाही ही मूलत: लोकजागृती आणि लोकसंघटनेचे लोकशिक्षण आहे. सन १९३०च्या दरम्यान जर्मनीत राष्ट्रीय समाजवादी, जर्मन राष्ट्रवादी आणि साम्यवादी एकत्र आले आणि त्यांनी दडपशाहीला पर्याय उभा केला. रुसोचा दृष्टिकोन यासंदर्भात लक्षात घ्यायला हवा. व्यक्तीपेक्षा पक्षाच्या सार्वभौमतेत वा नियंत्रणात नाही म्हटले तरी एकाधिकारशाहीपेक्षा कमी धोके राहतात. निरंतर स्वयंशिक्षणातून येणारी जागृती महत्त्वाची. स्वातंत्र्य ही शक्ती आहे. लोकशाहीत ती लोकप्रतिनिधींमध्ये असते. सत्ता ही शक्तीच असते. ती कोणत्या रूपात कोणास देतो, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे संरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. संस्थात्मक रचना सुरक्षित राहणे लोकशाहीसाठी आवश्यक असते. आणीबाणीच्या वातावरणात झुंडशाहीचा प्रत्यय येतो. निवडणुकीत समाजवाद आणि समृद्धीच्या घोषणा वेगळ्या नि प्रत्यक्ष कारभार पद्धती महत्त्वाची. पक्षीय स्पर्धेच्या राजकारणात विवेक सुटतो. तत्त्वापेक्षा व्यवहारास महत्त्व येते. मूलभूत पुनर्रचनेकडे लक्ष हवे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी दाखविलेल्या नवमानवतावादी विचारांना घेऊनच समाज पुढे गेला, तर त्यात समाजहित आहे. त्यातच स्थैर्य आणि समृद्धी शक्य आहे.
असा गोषवारा असलेल्या या भाषणात तर्कतीर्थांनी म्हटले आहे की, कोणतेही सामूहिक आंदोलन सर्वसाधारणपणे नैसर्गिक व भौतिक गरजांतून उद्भवत असते. अशा आंदोलनात उच्च मूल्ये आणि अधिकारांचे भान व जाणीव अभावाने असते. अशी जागृती यायची तर शिक्षणातून कार्यकारणमीमांसा आणि विवेकवाद रुजणे आवश्यकच नाही तर अनिवार्य असते. बंड वा क्रांतीसारखी कृती भुकेतून जितक्या तीव्रतेने जन्म घेते, तितकी तीव्रता अन्य कोणत्याही कारणात असू शकत नाही. फ्रेंच राज्यक्रांती स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांसाठी झाली खरी; पण त्यानंतर युरोपात आलेल्या अनेक सत्ता अनेक दशकांपर्यंत एकतंत्री कारभार करीत राहिल्या. त्या काळात जनता आपल्या प्राथमिक गरजांपासूनही वंचित होती. भारतीय लोकशाहीकडे या पार्श्वभूमीवर पाहात असताना लक्षात येते की, हे चित्र त्या चित्रापेक्षा काही वेगळे नाही. लोकतांत्रिक मानस असलेला समाज निर्माण करायचा असेल, तर लेखन, वाचन, भाषण, प्रचार, प्रसारस्वातंत्र्य हे बंधमुक्तच असायला हवे.