‘‘भारत अनेक वेळा परतंत्र का झाला? भारत पाश्चात्त्यांच्या पाठीमागे का राहिला? या प्रश्नांना तेथे त्यावेळी मूलभूत महत्त्व आले होते. हे प्रश्न नीट सुटत नव्हते. अत्यंत जाचक वाटत होते आणि अजूनही ते तसेच जाचक व कधीही न सुटणारे वाटतात. या प्रश्नांची छाननी सर्वांगीण रीतीने सुरू होती. हे प्रश्न सामाजिक व राजकीय परिवर्तनाशी संबद्ध होते. त्यामुळे मी आणि माझ्याबरोबरचे अनेक विद्यार्थी सामाजिक सुधारणा व राजकीय स्वातंत्र्याचे आंदोलन यांमध्ये सक्रिय भाग घेऊ लागले.
असहकारिता (१९२०-२१) व सविनय कायदेभंग (१९३०-३२) या दोन्ही चळवळींमध्ये आम्ही भाग घेत असताना सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या आंदोलनाची तात्त्विक शास्त्रीय बैठक शोधत राहिलो. मी गांधीवादाशी काही काळ एकरूप राहून काम करत होतो. त्यानंतर एम. एन. रॉय यांची भेट झाली आणि गांधीवादी विचारसरणीच्या बंधनातून बाहेर पडलो. सामाजिक व राजकीय साम्यवादी क्रांतीचा ध्येयवाद माझ्या विचारांचे कायमचे प्रेरणासूत्र झाले. या प्रेरणासूत्रामुळेच मी हिंदू धर्म व हिंदू संस्कृती यांची मौलिक समीक्षा करण्याचे धाडस केले. भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला जे अनेक मूलगामी धोके आहेत, त्या धोक्यांतून भारत बाहेर पडल्याशिवाय भारतीय एकात्मता स्थिरावणार नाही. हे धोके परंपरागत संस्कृती व समाजरचना यांच्या मौलिक रचनेतच सोवळे ओवळे, जातिसंस्था, अस्पृश्यता, चातुर्वर्ण्य इत्यादी तत्त्वांच्या रूपांनी भरलेले आहेत.
भारत स्वतंत्र झाल्यावर भारतामध्ये सामाजिक व राजकीय समतेवर आधारलेली संपूर्ण क्रांती होईल, अशी अपेक्षा मात्र मी इतर अनेकांप्रमाणे कधीही मनाशी बाळगलेली नव्हती. आता ही आशा तर फारच दुरावलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळ जसजसा पुढे जात आहे, तसतसा भारताच्या राजकीय नेतृत्वाचा नैतिक अध:पात फार वेगाने घडून येत आहे. नैतिक जीवनाशी फारकत झालेले राजकीय नेतृत्व आज प्रभाव गाजवू लागले आहे. ४० वर्षांपूर्वी जागतिक समाजवादी क्रांतीच्या भव्य आशावादाने माझे मन भरून गेले होते.
परंतु जगात जेथे जेथे समाजवादी क्रांती झाली आहे असे म्हणतात, तेथे तेथे मानव स्वातंत्र्य गमावून बसला आहे असे दिसते. त्यामुळे एकंदरीत जगाचे किंवा भारताचे राजकीय भवितव्य निराशा व विषाद उत्पन्न करते. त्यामुळेच माझ्या आयुष्याची ही संध्याकाळ मला भयाण वाटावी असे कोणी म्हणेल. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाने मी जगाकडे नेहमीच पाहात आलो आहे. त्यामुळे मानवी भवितव्य घडविणाऱ्या इतिहासाच्या शक्तींकडे तटस्थतेने मी पाहू शकतो. दुसरे असे की, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यात अव्याहतपणे प्रचंड स्फोटक पद्धतीने प्रगती होत आहे. या सतत प्रगत होत असलेल्या विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या अंतरंगातच मानवमुक्तीच्या शुभशक्ती वावरत असाव्यात, अशी कल्पना मी करू शकतो व त्या भव्य कल्पनेने माझे मन भारावून जाते.
माझे हात-पाय अजून चांगले धडधाकट आहेत. अनेक तास वाचन व विद्याव्यासंग करतो. तत्त्वज्ञान जाणून घेतो, असे आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या जन्मभर केलेल्या अध्ययनावरून मला असे वाटत राहते की, जीवात्मा व परमात्मा यांचा सांधा सापडेल काय? असा प्रश्न आहे. हा प्रश्न सुटण्याची शक्यता असेल, तर ती जीवविज्ञानातूनच. परंतु, निश्चितपणे काहीच म्हणता येत नाही.
ही आयुष्याची संध्याकाळ ! ज्यांनी मला प्रेमाने उपकृत केले, असे अनेक मित्र व सहकारी माझ्यापुढे निघून गेले आहेत. त्यांच्या पुण्यस्मृतीने पवित्र झालेल्या जीवनाचा अनुभव मन घेत आहे. गृहजीवनात व सार्वजनिक जीवनात जे जे भेटले, दीर्घकाल संगतीत राहिले, त्यांच्यामुळे मानवी जीवनाचा महिमा मला खूप पटला आहे. या अनंत आश्चर्यमय दृश्यविश्वातील मानवी जीवनच भव्य आहे. त्यात विस्मयजनक नाट्य आहे. त्यातच दिव्यता आहे; पण पलीकडे काय आहे कोणास ठाऊक?
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ।
आनन्दं ब्रह्मणो विद्वान् न बिभेति कुतश्चन।
अर्थात् ब्रह्मानंद प्राप्त केल्याशिवाय जिथून वाणी परतत नाही, तसेच जेथून मन विस्मित होऊन परतत नाही, त्या ब्रह्मानंदाला कोण नाही ओळखत?’’ drsklawate@gmail.com