‘जीनोम टु ओम’ या पुस्तकाविषयीचा परिचयलेख २८ जूनच्या ‘बुकमार्क’ सदरात वाचून उत्सुकता वाटल्याने तातडीने ते पुस्तक वाचले. पुस्तकाचे उप-शीर्षक किंवा त्याची थीम लाइन ‘मॉडर्न सायन्स टु मेटा सायन्स’ यांच्या प्रगतीचा आलेख, अशी आहे. पुस्तक वाचल्यानंतर अत्यंत खेदाने असे नमूद करावे लागते की, वैज्ञानिक मांडणीचे अत्यंत मूलभूत नियमदेखील हे पुस्तक पाळत नाही! दुसऱ्या बाजूला छद्मावैज्ञानिक मांडणीचे कार्ल सेगन या शास्त्रज्ञाने सांगितलेले बहुतांश सर्व मुद्दे या पुस्तकाला लागू होतात. त्यामुळे या मांडणीची चिकित्सा होणे आवश्यक आहे असे वाटते. त्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे पुस्तकाचे लेखक डॉ. भूषण पटवर्धन हे शैक्षणिक क्षेत्रातील एक मान्यताप्राप्त व्यक्ती आहेत. उच्च शिक्षणातील विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. महविद्यालयांचे मूल्यमापन करणाऱ्या ‘नॅक’मध्ये देखील ते प्रमुख पदधिकारी राहिले आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, वेस्टर्न सिडनी विद्यापीठ अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते शिकवतात. पुस्तकाची प्रस्तावना रघुनाथ माशेलकर यांची आहे. ज्यांनी पुस्तक परीक्षण केले आहे, त्यांची माहितीदेखील विज्ञान अभ्यासक अशी दिली आहे म्हणून त्याविषयी गांभीर्याने विचार व्हावा असे वाटते.
सुरुवात पुस्तकाच्या मध्यवर्ती संकल्पनेपासून करू.‘जीनोम टु ओम’ या नावातून सूचित झालेल्या मध्यवर्ती सूत्राप्रमाणे, एका बाजूला आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून ‘जीनोम’चा लागलेला शोध आणि त्याची सर्व पूर्वपीठिका याविषयी मांडणी आणि दुसऱ्या बाजूला ‘ओम’ या संकल्पनेतून भारतीय ज्ञानपरंपरेच्या महत्त्वाच्या विषयी मांडणी असे हे साधारण स्वरूप आहे. केवळ जीनोमाच्या मांडणीपुरता हे पुस्तक सीमित राहिले असते तर ते शास्त्रीय माहिती सुलभ भाषेत सांगणारे एक उत्तम पुस्तक झाले असते. पहिल्या प्रकरणात युरोपातील प्रबोधन कालखंडाच्या पासून जीनोम मार्गे अगदी कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक्नोलॉजी नॅनोटेक्नोलॉजीमधील आधुनिक शोध याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे, तो अत्यंत रोचक पद्धतीने मांडला आहे. पण याच पुस्तकात पुढे ‘ओम’ ही संकल्पना आणि त्या अनुषंगाने येणारे विवेचन आले की गडबड सुरू होते. लेखकाच्या मते ‘ओम’ हा भारतीय परंपरेमधील आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक आहे. प्रस्तावनेतच पुढे लेखक असेही म्हणतात की, ‘या भागातील मांडणी समजून घेण्यासाठी केवळ सायन्स पुरेसे नाही तर त्या साठी ‘मेटा-सायन्स’ आवश्यक आहे’!
लेखकाने केलेल्या व्याख्येप्रमाणे ‘मेटा-सायन्स’ म्हणजे ‘शास्त्राच्या विषयीचे शास्त्र’. इथपर्यंतची मांडणी आपण समजून घेऊ शकतो. पुढे जेव्हा लेखक असे म्हणतात की, ‘मेटा-सायन्ससाठी साक्षी पुरावे प्रयोग अनुमान अशा विज्ञानाच्या कोणत्याही पद्धतीची गरज नसते’ तेव्हा मोठा प्रश्न निर्माण होतो. लेखकाच्या मते ‘मेटा सायन्स’ व्यक्तीच्या अनुभवावर आणि सांस्कृतिक धारणांवर अवलंबून असते.
यामुळे, लेखकाची ‘मेटा सायन्स’ ही संकल्पनाच छद्माविज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे असे म्हणावे लागते. गंमत अशी की लेखकाने मेटा-सायन्सची व्याख्या अगदी विज्ञानाच्या पद्धतीने केली आहे पण लेखकाच्या मेटा-सायन्सची कार्यपद्धती आणि विज्ञानातील मेटा-सायन्सची कार्य पद्धती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.
प्रत्यक्षात मेटा-सायन्समध्ये, विज्ञानाच्या कार्यपद्धतीत काही चुका राहिल्या असतील तर अत्यंत चिकित्सक पद्धतीने त्या दुरुस्त करणे अपेक्षित आहे. लेखकाच्या मते मात्र ‘मेटा सायन्स’साठी साक्षी, पुरावे, प्रयोग अनुमान अशा विज्ञानाच्या कोणत्याही पद्धतीची गरज नसते! लेखकाने कुठलाही विश्वासार्ह स्राोत न देता मेटा-सायन्सची एक नवीन कार्यपद्धती तयार केली आहे. अशा ‘कुठलेही साक्षी, पुरावे देण्याची गरज नसलेल्या’ गोष्टीच्या पायावर उभी केलेली इमारत किती तकलादू असेल हे समजण्यासाठी विशेष तज्ज्ञतेची गरज नाही!
या पुस्तकात ‘जीनोम’ परंपरेची मांडणी करताना वापरलेले सर्व संदर्भ हे शास्त्राच्या कसोटीवर वर्षानुवर्षे घासून पुसून काढले गेलेले ‘निष्कर्ष’ आहेत; तर भारतीय ज्ञानपरंपरेविषयी मांडणी करताना मात्र मायथॉलॉजी किंवा इथल्या संस्कृतीमध्ये शतकानुशतके ‘असा समज आहे’ असे म्हणून पौराणिक गोष्टींची मांडणी केली आहे. पुस्तकाच्या नावातील ‘जीनोम’ म्हणजे मानवी जनुकांचा संपूर्ण समूह ही शास्त्रीय पातळीवर अत्यंत घासून पुसून सिद्ध झालेली गोष्ट आहे. त्या विषयी जीवशास्त्र व अन्य विद्याशाखांत असलेले पुरावे कोणीही तपासून बघू शकते. शास्त्राच्या अत्यंत कठोर कसोट्या त्यांना लावण्यात आलेल्या आहेत.
दुसऱ्या बाजूला आहे ‘ओम’ म्हणजे लेखकाच्या म्हणण्यानुसार इथल्या आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक आणि त्या अनुषंगाने येणारे लिखाण. लेखक पुस्तकात म्हणतात : ‘‘असे समजले जाते की ‘ओम’ हा विश्वाच्या उत्पत्ती वेळी निर्माण झालेला म्हणून सर्वात वैश्विक ध्वनी आहे!’’ (‘फाइंडिंग युनिटी इन डायव्हर्सिटी : द ओम वे’ या प्रकरणात) ‘ओम’ ही समाजात शतकानुशतके प्रचलित धारणा किंवा संकल्पना आहे. पण म्हणून ‘ओम’विषयी जे दावे आहेत त्याची सत्य/असत्य अशी तपासणी केलीच जाऊ शकत नाही? ‘एका बाजूला काटेकोर विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला तपासताच येणार नाही असे सिद्धान्त यांची तुलना करणे’ हेदेखील छद्माविज्ञानाचे लक्षण आहे. लेखक एवढ्यावरच थांबत नाहीत तर ‘ओम’ या अक्षराच्या कुठल्या भागातून कशा प्रकारची ऊर्जा निर्माण होते याचे चित्रदेखील त्याच प्रकरणात देतात.
ज्याला छद्माविज्ञान म्हणता येऊ शकतील अशा इतरही अनेक गोष्टी या पुस्तकात आहेत. उत्तराखंडमधील ‘कसार देवी मंदिर’ विषयी लेखकाने असा दावा केला आहे की तिथे जे अधिकचे भूचुंबकीय क्षेत्र दिसून येते त्याचा काही आध्यात्मिक संदर्भ असला पाहिजे (‘इव्होल्यूशन अॅण्ड मार्व्हल्स ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ या प्रकरणात). पुढे जाऊन लेखक पेरू देशातील ‘माचू-पिचू’ आणि युनायटेड किंग्डम मधील ‘स्टोनहेंज’ आणि ‘कसार देवी’ ही तीन स्थळे पृथ्वीच्या भोवती ‘व्हान अॅलन बेल्ट’ ह्या उच्च ऊर्जापट्ट्या मध्ये येत असल्याने त्यांना काही ‘सामायिक आध्यात्मिक संदर्भ’ असला पाहिजे असेदेखील नमूद करतात. हेदेखील छद्माविज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये वापरलेली पृथ्वीच्या भोवती ‘व्हान अॅलन बेल्ट’ ह्या उच्च ऊर्जापट्ट्यापर्यंतची माहिती ही शास्त्रीय आहे. पृथ्वीभोवती असलेला हा अतिऊर्जा पट्टा ‘नासा’ने १९५४ मध्ये शोधून काढला होता. पृथ्वीबाहेर जाणाऱ्या अंतराळयानांवर – स्पेस शटलवर – त्याचा काही परिणाम होऊ शकतो, म्हणून तो महत्त्वाचा आहे; पण त्याचा पृथ्वीवरील मानवी जीवनावर थेट काहीही परिणाम दिसून आलेला नाही! त्या अतिऊर्जापट्ट्याचा मानवी मेंदूवर होणारा परिणाम याचे कोणतेही शास्त्रीय अभ्यास नाहीत. त्यामुळे या अतिऊर्जापट्ट्याचे ‘आध्यात्मिक संदर्भ’ किंवा आध्यात्मिक लाभ मोजणारे अभ्यास तर खूपच दूरची गोष्ट आहे!
पुस्तकात शाळीग्राम, कायाकल्प विधी अशा गोष्टींच्या आध्यात्मिक महत्त्वाविषयीचे दावे ‘माहिती’ म्हणून संकलित करण्यात आले आहेत. हे दावे लेखकाच्या मते ‘मेटा-सायन्स’ या भागात येत असल्याने त्या दाव्यांसाठी शास्त्रीय पद्धती वापरता येऊ शकत नाही. एकुणात काय तर सर्वत्र भाषा विज्ञानाची वापरली असली तरी, विज्ञानाची कार्यपद्धती कार्यकारणभाव शोधण्याची आहे, त्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित करून निरीक्षणे, गणन करण्याची आहे, तिला मात्र पूर्ण फाटा देण्यात आलेला आहे.
शेवटच्या भागात भारतीय ज्ञानपरंपरेविषयी बोलताना लेखक ‘सत्याचा शोध घेणे’ याचे महत्त्व विशद करतो. या विषयी कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही. सत्याच्या शक्य तितके जवळ जाण्याचा प्रयत्न विज्ञानदेखील सातत्याने करत असते. पण आपल्याला गवसले आहे तेच अखेरचे सत्य आहे, असा दावा विज्ञान कधीच करत नाही. नवीन पुरावा आला तर ते बदलण्याची तयारी ठेवते. कुठल्याही चिकित्सेने विज्ञानाच्या भावना दुखावल्या जात नाहीत तर त्याला चिकित्सेने आनंद होतो. पुस्तकातील अत्यंत अडचणीचा भाग म्हणजे सत्याचा शोध करण्यासाठी लेखक समुद्रमंथनाच्या कथेतून विष आणि अमृत वेगळे झाल्याचे उदाहरण देतो. केवळ संकल्पना म्हणून समुद्रमंथन याच्या मागची प्रतीकात्मकता समजून घेणे सहजच शक्य आहे. अशा सत्य शोधण्याच्या मंथनाची मानवाला कायमच गरज असते हे मान्यच; पण जर समुद्रमंथन ही एक सत्य घटना होती की काय? अशा प्रकारे लेखक मांडणी करत असेल तर मात्र त्याला छद्माविज्ञानाच्या पलीकडे काहीही म्हणता येणे अवघड आहे! याविषयी मांडणी करताना लेखक कच्छच्या रणामध्ये ‘वासुकी’ नावाच्या जीनसमधल्या १५ मीटर लांबीच्या सापाचे ५० मिलियन वर्षाच्या मागचे अवशेष कसे सापडले हे सांगतो आणि ‘त्यामुळे या कथेमध्ये तथ्य असू शकेल का?’ (‘फाइंडिंग युनिटी इन डायव्हर्सिटी : द ओम वे’ या प्रकरणात) असा सूचक प्रश्न उपस्थित करतो. थोडी जरी चिकित्सा केली तरी आपल्या सहज लक्षात येऊ शकते की, कितीही मोठा साप असला तरी त्याच्या दोराने समुद्राचे मंथन करणे हे केवळ अशक्य आहे आणि समजा ते कोणीही केले तरी त्यामधून सत्य कसे बाहेर येऊ शकेल? छद्माविज्ञानाचा महत्त्वाचा निकष असलेले ‘कुठल्याही तपासता येण्यासारख्या गृहीतकाचा अभाव असणे’ हे लक्षण पुस्तकातील ‘ओम’ किंवा ‘मेटासायन्स’विषयक भागामधील बहुतांश दाव्यांना लागू पडते.
भारतीय ज्ञानपरंपरेत प्रत्येक भारतीयाने अभिमान वाटाव्या अशा असंख्य गोष्टी आहेत. पाणिनी, पतंजली चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिर यांचे ज्ञान निर्मितीच्या क्षेत्रातील योगदान त्या काळाच्या खूप पुढचा विचार करणारे होते. त्यामधल्या काही गोष्टी आज जशाच्या तशा लागू होतील, तर काही गोष्टी या सध्याच्या विज्ञानाच्या कसोटीवर टिकणार नाहीत… असे घडणे अगदी स्वाभाविक आहे. या महानुभावांनी त्या काळी सांगितलेली एखादी गोष्ट आज जशीच्या तशी मान्य करता येत नाही, यामध्ये त्या वेळी काळाच्या पुढे असलेल्या या लोकांना कोणताही कमीपणा येत नाही! वरील यादीमधील कोणालाही आपण मोठे करण्याची काहीही गरज नाही, कारण ते मूलत:च काळाच्या खूप पुढे असलेले लोक होते! आपले सांस्कृतिक मोठेपण सिद्ध करण्याच्या प्रयत्नात छद्मा वैज्ञानिक दाव्यांशी त्यांची नावे जोडून आपण आपल्याच परंपरेचे अवमूल्यन करत आहोत, असे वाटते.
अध्यात्माची चिकित्सा शक्य आहे…
जगभरात आध्यात्मिक समजल्या जाणाऱ्या परंपरांची कठोर चिकित्सा करण्याची शास्त्रीय पद्धतीदेखील हळूहळू विकसित होत आहे.‘डीस्ट्रक्टिव इमोशनस’ हे ‘ड्यानियल गोलमन’ यांचे पुस्तक हे त्याचे चांगले उदाहरण आहे. ह्या पुस्तकामध्ये जगभरातील प्रमुख मेंदूविषयकतज्ज्ञ आणि वर्षानुवर्षे मेडिटेशन करणारे बुद्ध भिक्कू यांचा संवाद आहे. दोन्ही बाजूंना एका ठिकाणी आणून आणि शास्त्राची पथ्ये पाळून केलेला हा संवाद आहे. या संवादातून पुढे आलेल्या गृहीतकांवर कठोर चिकित्सा पद्धती वापरून अभ्यास केले जात आहेत. याच प्रकारच्या पद्धती अवलंबल्यास भारतीय ज्ञानपरंपरेमधील देखील अनेक गोष्टींची नीट चिकित्सा होऊ शकते. या चिकित्सेमधून ज्या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर टिकतील, त्याचा नक्कीच स्वीकार केला जाऊ शकतो.
अशा चिकित्सेसाठी आपण मोकळ्या मनाने तयार राहायला हवे असे वाटते. सध्याच्या कालखंडात धर्माशी संबंधित कोणत्याही चिकित्सेला, ‘हा आमच्या धार्मिक भावनांचा अपमान आहे’ असे म्हणून गप्प बसायला भाग पडणे हा प्रचलित मार्ग आहे. या गप्प बसवण्याने तात्कालिक राजकीय फायदा होऊ शकेल; पण आधुनिक विज्ञान आणि सत्याचा शोध घेऊ पाहणारी इथली परंपरा या दोन्हींचा तो मोठा पराभव असेल असे वाटते.