एल. के. कुलकर्णी भूगोलकोशाचे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक

खंडांचे तुकडे भरकटून दूर जाणे ही कल्पनाही तेव्हा लोकांना हास्यास्पद वाटे, पण वेजेनर यांच्या मृत्यूनंतर ३० वर्षांनी त्यांचा दावा खरा ठरला..

Kalakaran multifaceted history of art Venice Biennale Occidental Art History
कलाकारण: त्यांच्या भाषेत, त्यांच्या भूमीवर..
History of Geography Long lasting regimes For the economic prosperity of the people Water management
भूगोलाचा इतिहास: राजवटींच्या दीर्घायुष्याचे रहस्य?
lokmanas
लोकमानस: वारसा कर हा वैचारिक संघर्ष
joi biden
अन्वयार्थ: बायडेन प्रशासनाचा नैतिक विजय..

कोण जीवन वेचुनी

भोगून चटके आणते

किरण घनतिमिरातही,

हे कोण केव्हां जाणते

साधे सूर्यकिरण आपल्यापर्यंत येण्यासाठी कधी कधी कुणी किती चटके भोगले असतील, याची आपल्याला जाणीवही नसते. अनेक भौगोलिक शोधांबद्दलही असेच म्हणता येईल.

संशोधनकार्यात मृत्यू पत्करणारे, भूगोलात क्रांती करणारे आणि तरीही सामान्य लोकांना फारसे माहीत नसलेले एक जर्मन संशोधक होते – आल्फ्रेड वेजेनर. त्यांचे अधुरे पण नाटय़मय आयुष्य हे एखाद्या दंतकथेसारखे विलक्षण होते.

त्यांचा जन्म १८८०मध्ये बर्लिन येथे झाला. मॅक्स फ्लँकसारख्या विद्वानांच्या हाताखाली पदवीचे शिक्षण घेत त्यांनी खगोलशास्त्रात पीएच. डी. मिळवली. स्वत: विद्यार्थी असतानाच ते लिंडेनबर्ग वेधशाळेत साहाय्यक म्हणून काम करीत होते. १९०८ मध्ये ते आपल्या भावासमवेत हवामानशास्त्राच्या संशोधनात सहभागी झाले. या विषयाने त्यांना झपाटूनच टाकले. वातावरणाच्या अभ्यासासाठी नुकतीच सुरू झालेली, हवेत बलून सोडण्याची पद्धत ते वापरत. अशा बलूनमधून वेजेनर स्वत: उड्डाण करत. ५ ते ७ एप्रिल १९०६ या दिवशी त्यांनी सलग ५२ तास बलून उड्डाणाचा विक्रम केला होता.

१९०६ ते १९०८ दरम्यान ग्रीनलँडमधील ध्रुवीय वातावरणाच्या अभ्यास मोहिमेत ते प्रथमच सहभागी झाले. जिथे ध्रुवीय भूसंशोधकही पोहोचले नव्हते, त्या अतिशीत निर्मनुष्य भागात पोहोचून त्यांनी हवामानाचा अभ्यास केला. या पहिल्या मोहिमेने वेजेनर यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. ध्रुवीय हिमप्रदेशाचे भीषण दर्शनही त्यांना याच मोहिमेत झाले. कारण त्यांचे मोहीमप्रमुख व दोन सहकारी या मोहिमेत मृत्युमुखी पडले. पण त्यानंतरही खचून न जाता वेजेनर यांनी त्या प्रदेशातील संशोधन मोहिमेत पुन्हा पुन्हा सहभाग घेतला.

या पहिल्या मोहिमेनंतर ते १९१२- १३ मध्ये दुसऱ्या, १९२९ मध्ये तिसऱ्या आणि १९३० मध्ये चौथ्या ग्रीनलँड मोहिमेत सहभागी झाले. श्वास गोठवणाऱ्या थंडीत, दुर्गम भागाचा प्रवास करून तेथे पतंग उडवून, बलून सोडून ते हवामानाच्या नोंदी घेत. ध्रुवीय प्रदेशातील पहिले हवामान केंद्र त्यांनी स्थापन केले. या अशा कार्यामुळे ते ‘ध्रुवीय हवामान’ या विषयाचे आद्य प्रवर्तक ठरले.

या मोहिमांच्या मधल्या काळात इतर आघाडय़ावर त्यांचे कार्य सुरूच असे. बरीच वर्षे ते मारबर्ग विद्यापीठात खगोलशास्त्र, हवामानशास्त्र व भौतिकशास्त्र शिकवत. पुढे ग्राझ विद्यापीठात भूभौतिकशास्त्र (जिओफिजिक्स) शिकवू लागले. ‘अवघड विषय सोपा करून सांगणारे प्राध्यापक’, असा त्यांचा लौकिक होता. त्या काळात त्यांनी दिलेली भाषणे ही हवामानशास्त्राची पाठय़पुस्तकेच झाली. १९१३ मध्ये त्यांचा विवाह एल्सी कोप्पेन यांच्याशी झाला. त्यांचे कौटुंबिक जीवन सुखी होते. 

लग्नानंतर एक वर्षांच्या आत १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू होताच वेजेनर यांना सैन्यात बोलावणे आले. बेल्जियन सीमेवर लढताना ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना आघाडीवरून परत पाठवले गेले. तरीही महायुद्ध संपेपर्यंत त्यांनी सैन्याच्या हवामान खात्यात काम केले. त्यासाठी आजारी अवस्थेतही ते दूरदूरचे दौरे करीत.

६ जानेवारी १९१२ रोजी एका व्याख्यानात वेजेनरनी असे मत मांडले की, अतिप्राचीन काळी पृथ्वीवरील सर्व खंड एकत्र होते व पुढे त्याचे तुकडे पडले. पुढे हाच विचार व्यवस्थित निबंधाच्या रूपात त्यांनी मांडला. पण कुणी त्या मताची दखलही घेतली नाही. नंतर १९१५, १९२२ आणि १९२६ मध्ये, अनेकदा हा सिद्धांत त्यांनी पुस्तक व प्रबंधाच्या रूपात मांडला. पण तो दरवेळी लगेच फेटाळला जाई. खंडांचे तुकडे पडणे व ते भरकटून दूर जाणे ही कल्पनाही लोकांना हास्यास्पद वाटे. त्यामुळे दरवेळी वेजेनर यांच्या वाटय़ाला उपहास येई. मुळात खगोलशास्त्र शिकून हवामानशास्त्रात संशोधन करणाऱ्या वेजेनर यांनी भूविज्ञानात केलेली लुडबुड भूवैज्ञानिकांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांची संभावना ‘ईटी’ (परग्रहवासी) अशी केली जाई. पण लोकांचा विरोध, उपेक्षा याचा काहीही परिणाम वेजेनरवर झाला नाही. आपला सिद्धांत बरोबर असल्याचा त्यांना विश्वास होता. कशानेही विचलित न होता आपला ‘खंडनिर्मिती सिद्धांत’ घासूनपुसून पुन्हा पुन्हा जगासमोर मांडण्याचे काम ते १९१२ ते १९२६ पर्यंत निष्ठेने करत होते. १९२६ मध्ये त्यांनी आपला सिद्धांत न्यूयॉर्क येथील एका अमेरिकन परिषदेत मांडला. अर्थात तो याही वेळी फेटाळला गेला. खरे तर याबाबतीत वेजेनर त्यांच्या काळाच्या पुढे होते. त्यांच्या सिद्धांताला पूरक असे पुरावे उपलब्धच नव्हते, हा त्यांचा दोष नव्हता. कदाचित आणखी आयुष्य मिळाले असते, तर ते आपले म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध होताना पाहू शकले असते. पण ते व्हायचे नव्हते.

१९३० मध्ये ते आपल्या चौथ्या ग्रीनलँड मोहिमेवर गेले. या मोहिमेत महत्त्वाचे हवामानशास्त्रीय संशोधन होणार होते. तिथेच त्यांना मृत्यूने गाठले. ग्रीनलँडच्या अंतर्भागातील एका केंद्रावर सहकाऱ्यांना हिवाळय़ासाठी अन्नसामग्री व रसद पुरवण्याची गरज होती. ती घेऊन काही सहकाऱ्यांसह २४ सप्टेंबर रोजी वेजेनर निघाले. वाटेत त्यांच्या एक सहकाऱ्याला हिमदंश झाल्याने त्याचा पाय कापावा लागला. असा कठीण प्रवास करीत १९ ऑक्टोबर रोजी त्या केंद्रावर पोहोचून त्यांनी तेथील सहकाऱ्यांचे प्राण वाचवले. परंतु तिथे असणारे अन्न पुढे हिवाळाभर सर्वाना पुरण्याची खात्री नव्हती. म्हणून विल्हमसेन या सहकाऱ्यासह वेजेनर परत निघाले.

परत येताना त्यांच्याच जवळची अन्नसामग्री संपली. शून्याखाली ६० अंश तापमान, तुफान वारे आणि अन्नाचा अभाव यामुळे पुढील प्रवास अशक्य झाला. नोव्हेंबर १९३० च्या शेवटच्या आठवडय़ात त्यांना मृत्यूने गाठले असावे. सहा महिन्यांनी १२ मे १९३१ रोजी, हिमथरांखाली चिरनिद्रा घेणाऱ्या वेजेनरची समाधी सापडली. ती उभारणाऱ्या विल्हमसेनचा मात्र ठावठिकाणाही सापडला नाही. तो आणि त्याच्यासोबत वेजेनरची डायरी ३०० फूट बर्फाखाली पुरली गेली असावी, असे मानले जाते.

कोटय़वधी वर्षांत पृथ्वीवर खंड कसे निर्माण झाले, याची कहाणी सांगणाऱ्या वेजेनर यांची जीवनकहाणी वयाच्या अवघ्या पन्नाशीत गोठली, पण संपली मात्र नाही. १९३० नंतर वेजेनरसोबत त्यांचा ‘खंडनिर्मिती सिद्धांत’ही विस्मरणात गेला होता. पण पुढे १९६० च्या दशकात अनेक पुरावे पुढे येऊन त्यांचा सिद्धांत बरोबर असल्याचे सिद्ध झाले. सत्य हे कालातीत असते. विस्मरणाच्या तळाशी गेलेला वेजेनर यांचा सिद्धांतही पुन्हा वर येऊन भूगोलात एका क्रांतीची सुरुवात झाली. संशोधकांना वेजेनरचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊ लागले. मृत्यूनंतर ३० वर्षांनी ते अजरामर झाले होते.

kulkarni.nanded @gmail.com