आजपासून बरोबर दहा वर्षे १५ दिवसांपूर्वी निर्भया बलात्कार प्रकरणाने हादरलेली दिल्ली पुन्हा त्याच मन:स्थितीत आहे. गुन्ह्याचे तपशील थोडे बदललेले असले तरी क्रौर्याची तीव्रता तीच. एक जानेवारीच्या पहाटे दिल्लीतील कंझावाला रोड परिसरात लाडपूर गावातील एका रस्त्यावर झालेल्या या प्रकरणाचे आणखी तपशील येत असले तरी मिळालेल्या माहितीनुसार पहाटे दीड-दोनच्या सुमारास दिल्ली परिसरात एका मोटारगाडीखाली आलेल्या अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला त्या मोटारीने किमान दहा किलोमीटर फरपटवत नेले. या फरपटीत त्या तरुणीचा जीव गेला, देह छिन्नविच्छिन्न झाला. दहाबारा किलोमीटर फरपटवले गेल्यामुळे तिचा मृतदेह नग्नावस्थेत पोलिसांना मिळाला. दिल्लीतील ऐन हिवाळय़ातील पहाटे साताठ अंश तापमानात तिचे काय झाले असेल, याची तमा न बाळगता त्या मोटारगाडीतील पाचजण ती गाडी पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावरून फिरवत राहिले आणि गाडीच्या खालच्या भागात अडकलेला तिचा मृतदेह गाडीपासून वेगळा झाल्यावर त्यांनी पळ काढला. संबंधित तरुणीबरोबर तिची एक मैत्रीण होती, दोघीही एकत्रच निघाल्या अशाही बातम्या आता येत आहेत. त्याचे तपशील हळूहळू पुढे येतील. पण या सगळय़ाच्या मुळाशी असलेला हीन, विकृत, गुन्हेगारी मानसिकतेचा मुद्दा; तो याच नाही तर इतरही अनेक प्रकरणांमधून दिवसेंदिवस अधिकाधिक हिणकस पद्धतीने दिसत आहे, हे जास्त गंभीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर १ जानेवारीच्या पहाटे मोठय़ा शहरांमधले पोलीस ३१ डिसेंबरची पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत परतणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, कारवाई करण्यासाठी मोठय़ा संख्येने रस्त्यावर असतात. पण त्यांनाही या प्रकाराचा पत्ता लागला नाही. पोलिसांचे अपयश एवढय़ावरच थांबत नाही. गुन्हे करणाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचा एकुणात धाकच वाटेनासा झाला आहे, ही या सगळय़ामधली खरी मेख. ही परिस्थिती फक्त राजधानीतच नाही तर देशभर बहुतेक ठिकाणी आहे, हे देशभर सध्या घडत असलेल्या गुन्ह्यांच्या प्रकारावरून दिसून येत आहे. मैत्रिणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून नंतर त्यांची विल्हेवाट लावणे काय, आंतरजातीय लग्न करणाऱ्या स्वत:च्या बहिणीचे मुंडके कापून ते मिरवत पोलीस ठाण्यात घेऊन जाणे, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून नवजात बाळाची आपटून हत्या करणे, सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात झालेली शिक्षा ‘माफ’ झाल्यानंतर त्या गुन्हेगारांचे वाजतगाजत स्वागत होणे ही उदाहरणे; ही कृत्ये करणाऱ्यांच्या मानसिकतेप्रमाणेच आपल्या यंत्रणांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणारी आहेत. दिल्लीतील ताज्या घटनेतही, पोलीस जागे झाले ते लोक दुसऱ्या दिवशी निषेधासाठी रस्त्यावर उतरल्यानंतर. गुन्हेगाराचे वय, त्याची जात, धर्म, त्याचा आणि त्याच्या नातेवाईकांचा आर्थिक, सामाजिक स्तर या सगळय़ा बाबी त्याला शिक्षा होण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. निष्णात वकिलांना हाताशी धरून कायद्यातील पळवाटांचा आधार घेता येतो आणि सहीसलामत सुटता येते, हे माहीत असणाऱ्यांमध्ये कसे निर्ढावलेपण येत जाते हे अनेक उदाहरणांनी दाखवून दिले आहे. संपूर्ण देशभर वादळ निर्माण करणाऱ्या हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात जी ‘झटपट शिक्षा’ दिली गेली, ती अशा पद्धतीचा वचक निर्माण करण्याचा मार्ग नाही, हे मात्र तितकेच खरे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing crime in the society nirbhaya rape case intensity of cruelty amy
First published on: 04-01-2023 at 03:05 IST