‘भारतीय संस्कृती : काही समस्या’विषयक मुलाखतीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रा. श्री. पु. भागवत यांनी प्रश्न केला होता की, जडवादी विज्ञानामुळे विनाशाकडे जाणाऱ्या जगाला भारतीय संस्कृती तारेल का? जर ती तारणार असेल, तर कोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे? भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची भाषा केली जाते (अपेक्षा) ती कशाच्या आधारावर?
या प्रश्नाची उकल करत मुलाखतीत तर्कतीर्थांनी विशद केले आहे की, विज्ञान जडवादीही नाही आणि अध्यात्मवादीही नाही. विज्ञानाची काही एक पद्धती असते. यात गृहीतके, कृत्ये, तत्त्वे असतात. त्या आधारावर संशोधन चालते. विज्ञान सृष्टीतत्त्व प्राप्त करून देत असते. भारतीय व पाश्चात्त्य संस्कृतीत फरक पडला तो केवळ विज्ञानामुळे. पाश्चात्त्य संस्कृती विज्ञानामुळे पुढे गेली. भारतीय संस्कृती अध्यात्मात खोल रुतून राहिली. विज्ञानामुळे लोकभ्रमात्मक उपपत्तींचा निरास झाला आहे. जादूटोणा, मंत्रतंत्र, भुतेखेते, जागृत दैवतस्थाने, बुवाबाजीसदृश अंधश्रद्धांना ओहोटी लागली आहे. भारतीय संस्कृतीतील देव-देवता, धर्मपीठे, तीर्थ, पोथी माहात्म्ये इत्यादी भोळ्या लोकांना फसवणारी प्रस्थे विज्ञानामुळे ढासळून पडतील.
पुनरुज्जीवन शब्दाचे दोन भावार्थ आहेत. समाज सुधारक व रूढीनिष्ठ सनातन दोन्हीही या शब्दाचा वापर करतात. पहिला भावार्थ म्हणजे संस्कृतीत कसलाही बदल न करता सर्व कर्मकांड, चालीरीती, समजुती, पुराणकल्पना यांची पुन्हा स्थापना करणे म्हणजे संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे होय. यास ‘पुनरुद्धार’ हा शब्द अधिक समर्पक अर्थाचा आहे. जुन्या संस्कृतीतील चिरंतन व विश्वव्यापक मूल्यांचा विवेकपूर्ण अर्थ समजून घेऊन नव्या परिस्थितीच्या शरीरासह पुनर्जन्म (रेनासान्स) होणे / करणे म्हणजे पुनरुज्जीवन करणे होय. हा याचा दुसरा भावार्थ.
पहिल्या अर्थाने पुनरुज्जीवनाची चळवळ जेव्हा सुरू होते व ती यशस्वी होते, तेव्हा प्रगतीच्या आध्यात्मिक व आधिभौतिक शक्तींचा पराभव होतो. समाज निरुद्धगतिक होतो. दुसऱ्या अर्थाने जेव्हा पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू होते व ती यशस्वी होते, तेव्हा समाज नव्या उच्चतर ऐतिहासिक युगात पदार्पण करतो. इतिहासाची पुनरावृत्ती न होता अभूतपूर्व असे नवजीवन लाभते. पश्चिम युरोपात फ्लॉरेन्स शहरात डांटे, लिओनार्दो द विंची, मायकेल अँजेलो, मॅकीव्हेली इत्यादी मानववादी, बुद्धिवादी व वास्तववादी कलाकार, विज्ञानवेत्ते व समाजवेत्ते जन्मले आणि त्यांनी पुनरुज्जीवनाची चळवळ निर्मिली. त्यातून १७ व्या शतकाच्या अखेरीस नवा युरोप जन्मला. त्या चळवळीने पुराण संस्कृतींच्या विरुद्ध मर्यादांचा नाश केला. बुद्धिस्वातंत्र्याची नौबत झडू लागली. स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या मानवी मूलभूत हक्कांची द्वाही फिरविणारी उन्नततर अध्यात्मपूर्ण संस्कृती उदयास येऊ लागली. आधिभौतिक सुधारणा वाढीस लागली.
प्रत्येक संस्कृतीतील चिरंतन मूल्यांत विश्वव्यापकता असते. भारतीयांची ‘भगवद्गीता’ ही सर्व मानवांच्या परमार्थाची सूचक असेल, तरच ती भारतीय संस्कृतीची श्रेष्ठ संपत्ती ठरते. इंग्लिश संस्कृतीतील शेक्सपिअर हा नुसता इंग्रजांचाच नाटककार नाही, तो सर्व सुधारलेल्या माणसांचा असतो. सॉक्रेटिसाचे व्यक्तित्व सर्व सुसंस्कृत जगाचा अमर ठेवा असतो. सुसंस्कृतीतील चिरंतन मूल्य हे सर्वव्यापी मानवी संस्कृतीचे शाश्वत वैभव असते. भारतातील गंगा हिंदूंनाच स्वच्छ करीत नाही. जे भारतीय चिरंतन मूल्य भारतीय व अभारतीय असा अहंभावकारक भेद सूचित करीत असेल ते भारताला बेकार बनवेल.
शिक्षणाला भारतीय वळण लावावे, जरूर लावले पाहिजे. परंतु, वाल्मीकींबरोबर व कालिदासाबरोबर होमर व एस्किलसही शिकविले पाहिजेत. भास्कराचार्यांच्या गणिताबरोबर अद्यायावत गणित भारतीयांना आले पाहिजे. आयुर्वेदाबरोबरच आजचे सर्व आरोग्य व रोग यासंबंधाचे शास्त्र व तंत्र भारतीयांनी शिकले पाहिजे. भारताच्या भौगोलिक मर्यादेत जे आधिभौतिक व आध्यात्मिक ज्ञान पिकते, तेच जर येथील बालकांना द्यावयाचे राधाकृष्णन यांच्या व आ. रा. देशपांडे यांच्या भारतीय शिक्षणशास्त्राच्या व कला वाङ्मयाच्या कार्यक्रमात ठरावयाचे असेल, तर अभारतीय प्रदेशात उगवणाऱ्या चंद्र-सूर्यांना व ताऱ्यांना भारतात उगवण्याची बंदी करावी लागेल. भारताबाहेरून येणाऱ्या पर्जन्यावर बहिष्कार घालावा लागेल. अशाने भारतीय संस्कृती श्वासोच्छ्वस तरी करू शकेल काय?