साप्ताहिक ‘मौज’ प्रकाशित होत असलेल्या काळापासून ‘मौज’ दिवाळी अंक महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून अटळ व अढळ आहे. याचे कारण, त्यातील मजकुराची व्यवच्छेदकता व मांडणीची कलात्मकता आहे. श्री. पु. भागवत याचे संपादन करत असल्याच्या काळात त्यांनी ‘भारतीय संस्कृती : काही समस्या’ हा विषय केंद्रित ठेवून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत घेऊन ती साप्ताहिक ‘मौज’च्या १९८९च्या दिवाळी अंकात प्रकाशित केली होती. प्रदीर्घ प्रश्न व प्रदीर्घ उत्तरे म्हणून ही मुलाखत आगळीवेगळी ठरते. या मुलाखतीमागे तर्कतीर्थांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर होणे हे कारण होते, तसेच तर्कतीर्थांनी लिहिलेल्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ची पार्श्वभूमी होती. (या ग्रंथास मराठीचा पहिला साहित्य अकादमी पुरस्कार १९५५ मध्ये लाभला होता.) या मुलाखतीतील प्रत्येक प्रश्न हा स्वतंत्र मुलाखतीचा ठरतो. यामुळे आपण तिचा अनेक भागांत विचार करणार आहोत; अर्थात संक्षेपाने.
एका प्रश्नात प्रा. श्री. पु. भागवतांनी संस्कृतीच्या भारतीय व अभारतीय स्वरूपाचे भौगोलिक व प्रदेशविशेषमूलक स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. उत्तरात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले होते की, भारतीय व अभारतीय हे केवळ संस्कृतीच्या भौगोलिक स्थानाचे निदर्शक नाहीत. भारतवर्ष नामक भूप्रदेशात चिरकाल वस्ती करणाऱ्या मानवसंघांनी (विविध वंशीय) तेथील निसर्गशक्तीच्या अधिष्ठानावर निर्माण केलेली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती होय. विशिष्ट व्यवस्था व संगती असलेली मानवी कर्मपद्धती वा मानवी जीवनपद्धती म्हणजे संस्कृती होय. सृजनशीलतेच्या अंतर्मुखतेने संस्कृतीचे आध्यात्मिक अथवा मानसिक आविष्कार होतात. काव्य, वाङ्मय, नीती, धर्म, आचार, तत्त्वज्ञान व विज्ञान हे सृजनशीलतेचे अंतर्मुख आविष्कार होत. सृजनशीलतेच्या बहिर्मुखतेने स्थापत्य, कृषी, पशुपालन, वाहन, वस्त्र, पात्र, हत्यारे, यंत्र इत्यादी रूपाने भौतिक संस्कृती तयार होते. समाजव्यवस्था अंतर्बाह्य निसर्गावरील मानवी विजयाचे फल होय. व्यवस्था (ऑर्डर) व प्रगती (प्रोग्रेस) ही संस्कृतीची मुख्य दोन लक्षणे होत. संस्कृती ही नित्यप्रवाही व परिवर्तनशील अशी मानवी स्थिती (ह्युमन सिच्युएशन) आहे. ही संस्कृतीची भौगोलिक पार्श्वभूमी म्हणता येईल.
संस्कृतीच्या भौगोलिक परिस्थितीचे स्वतचे निराळे वैशिष्ट्य असते. ते समुद्र, पर्वत, मैदान इत्यादी स्वरूपावर अवलंबून असते. हवामान, आहार, विहार, दैवते, उत्सव, संस्कार, विधी, इत्यादींतून प्रदेशविशेषांचे वैशिष्ट्य साकारत असते. यावर भौगोलिक छाप व संबंध असतो. युरोपातील कादंबऱ्यांतील बर्फवृष्टी, हाडं गोठवणारी थंडी, घरातील नित्य पेटती शेकोटी भारतीय कादंबऱ्यांत आढळत नाही. यातून भौगोलिक व प्रदेशविशेष अंतर स्पष्ट होते. भौगोलिकतेची संस्कृती साकारण्यात मोठी भूमिका असते. संस्कृती शास्त्रज्ञ याचा अभ्यास करतात. संस्कृती घडणीत प्रदेशविशेषाच्या मानवी बौद्धिक क्षमता व कौशल्यांचा मोठा वाटा असतो. म्हणून तात्त्विकदृष्ट्या संस्कृती ही मूलत: एकाच मानव्यरूपी साराने रसरसलेली असते. हे सार जिथे लयास जाते, तेथील संस्कृतीचा ऱ्हास वा पतन होते.
असेही लक्षात येते की, एकाच भौगोलिक परिस्थितीत भिन्न भिन्न संस्कृती जन्मतात. त्यात प्रदेश विशेषाचा (कोकण, विदर्भ, मराठवाडासदृश) वाटा मोठा असतो. जागतिक संस्कृतिपटलावर संस्कृती रूपांतरेही पाहावयास मिळतात. युरोपात प्रथम क्रीट संस्कृती होती. पुढे ती ग्रीक संस्कृती रूपात परिवर्तित झाली. नंतर तिचे रूपांतर रोमन संस्कृतीत झाले. याचे कारण एकाच भौगोलिक प्रदेशातील परिस्थितीसदृश बदल होय. पंधराव्या शतकानंतर युरोपात सुरू झालेली बौद्धिक स्वातंत्र्याची नवजीवन चळवळ (रेनासान्स व एन्लायट्नमेंट) आणि नवनवे वैज्ञानिक आविष्कार यातून आजची आधुनिक पाश्चात्त्य संस्कृती आकाराला आली, हे लक्षात घेतले की संस्कृती विकासात भौगोलिक व प्रदेशविशेष तत्त्वाचे अस्तित्व स्पष्ट होते. भारतीय व अभारतीय संस्कृतीचा तोंडवळा, स्वरूप, वैशिष्ट्ये भिन्न आहेत, हे त्या त्या संस्कृती फरकातून स्पष्ट होते. तर्कतीर्थांची ही मांडणी काल, प्रगती आणि परिवर्तन परिणाम व परिमाणे लक्षात घेता संस्कृती संशोधक म्हणून प्रभावी ठरते. भारतीय संस्कृतीचा अभ्यास अनेकांनी केला असला तरी तर्कतीर्थांच्या मांडणीमागील विविध आयाम त्यांची बहुविध प्रज्ञा अधोरेखित करणारे सिद्ध होतात.