ईश्वर आहे की नाही? असल्यास त्याचे स्वरूप काय? यांसारखे प्रश्न पिढ्यान्पिढ्या चर्चिले गेले असले, तरी त्याचे अंतिम वा सर्वमान्य उत्तर अद्याप कोणास सांगता आलेले नाही. जैन धर्मातील अनेकांतवाद हे त्याचे व्यवच्छेदक उदाहरण होय. ईश्वरविषयक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची धारणा समजून घेण्याच्या इराद्याने अरुण शेवते यांनी घेतलेली मुलाखत ‘ऋतुरंग’ मासिकाच्या सन १९९४च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ती तर्कतीर्थांची शेवटच्या मुलाखतींपैकी एक असल्याने तिला ऐतिहासिक महत्त्व आहे. ‘नेत्र लागले पैलतीरी’ अशी अवस्था असतानाच्या स्पर्शकाळात तर्कतीर्थांसारखा माणूस आस्तिक की नास्तिक हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते. जीवनातील एका क्षणी घरातील देव्हाऱ्यातील सर्व मूर्ती, टाक इत्यादी कृष्णार्पण करून मानसपूजा करणारे तर्कतीर्थ कर्मकांडातून मुक्त होतात खरे; पण ते चार्वाक झाले का? या सर्व जिज्ञासांच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत त्यांचे विचार व व्यक्तिमत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. अशाच एका मुलाखतीत सुधीर गाडगीळ यांनी तर्कतीर्थांना आपण देव मानता का असे थेट विचारल्यावर नि:संदिग्धपणे स्पष्ट केले होते की, मी विश्वाची चैतन्यशक्ती मानतो; पण ही अनिर्वचनीय आहे. या शक्तीचा विश्वचिंतनाबरोबर अनुभव येतो, थेट असेच उत्तर देत अरुण शेवतेंना तर्कतीर्थ समजावतात की, ईश्वराची जाणीव ही विश्वाचे चैतन्यमय अधिष्ठान होय. मला ईश्वर सच्चिदानंदस्वरूप जाणवतो. ही जाणीव श्वासोच्छ्वासासारखी आहे. कोणी माणूस, व्यक्ती नियंता अशी ती नाही. तसेच ‘वेद’, ‘भगवद्गीता’ यांसारखे ग्रंथ त्याने (ईश्वर) दिले, लिहिले असे वाटले नाही. त्याचे स्वरूप शांत, शुद्ध, अविनाशी, निर्गुण आहे. त्याच्या जाणिवेने मन शांत होते. आपली संकटे, आपत्ती, दु:खे यांनी मन अस्वस्थ होते. ते निर्गुण ईश्वर शांत करते.

जगात ईश्वर आहे तर माणसात दुष्टावा का? याची संगती मला लागत नाही. त्याचे उत्तर इतके साधुसंत होऊन गेले, महात्मा गांधी झाले तरी त्यांना देता आलेले नाही. याचे एकच उत्तर असू शकते, या जगाचा पसारा म्हणजे एक नाटक आहे. अॅरिस्टॉटलने दु:खान्तिका हे खरे नाटक मानले होते. नाटक एक भास असतो, वादळ असते. ते येते नि जाते. तसे हे विश्व आहे. ईश्वराला निर्देश करणारा शब्द योगशास्त्रात आहे- ‘ओंकार’, ‘प्रणव’. याचा अर्थ ‘अस्ति’ म्हणजेच आहे असा होतो. यात ईश्वरीय अस्तित्वाचा स्वीकार आहे. पण या अस्तित्वाचे आकलन मानवी क्षमतेच्या पलीकडे आहे.

संत मंडळी भजने गातात. त्यातून त्यांना स्वास्थ्य मिळते. ते ईश्वरशरण होतात. ती कृती पूर्ण निश्चयांतीची असते. माणसे वास्तविक साहित्यापेक्षा कल्पित साहित्यात अधिक रमतात. कल्पितात रमणे ही मानवी प्रवृत्तीच होय. संत वाङ्मय माणसात नैतिक अधिष्ठान जागवते. दुष्ट वर्तन, वासनांना मर्यादा घालते. माणसाला सदाचारी, सद्विचारी बनविते. त्याने मनुष्य उन्नत भावनांत रमतो. संत काव्यात नैतिक शौर्य निर्माण करण्याची जी शक्ती आहे, ती एकप्रकारचा आत्मविश्वास जागविते. धर्मग्रंथ खरे ते, जे माणसात विवेक जागवतात. संतांच्या ईश्वरीय संकल्पनेमुळे समाज परिवर्तनात अडसर निर्माण झाल्याचा इतिहास नसणे, यातच आस्तिक्यबुद्धीची प्रचीती आहे. भयापोटी ईश्वरीय अस्तित्वाचा स्वीकार याला नास्तिक्य म्हणता येणार नाही.

तर्कतीर्थांनी या मुलाखतीत आपण पूर्ण आस्तिक असल्याचे नि:संदिग्ध शब्दांत मान्य केले आहे. जो स्वत:चे अस्तित्व मानतो, त्याला नास्तिक कसे म्हणायचे? असा प्रश्न करीत स्वअस्तित्वाच्या जाणिवेतच ईश्वरीय अस्तित्व सामावले असल्याचे ते दुरान्वयाने स्पष्ट करतात. विज्ञानातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशसारख्या पंचतत्त्वांचे ज्ञान सामान्यास नसते; पण वैज्ञानिकास असते. ईश्वरीय जाणीव त्यालाच होते, जो त्याचे अनुसरण करत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अन्न, पाण्याने जीवाची प्राणधारणा कशी होते, हे प्रत्येक जीवाला जसे माहीत नसते, तसेच ईश्वराचे आहे. जो जाणतो तो चैतन्यमय ईश्वराचा अंश बनतो. अशाप्रकारे या संपूर्ण मुलाखतीतून तर्कतीर्थ ईश्वरीय अस्तित्व मान्य करीत सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त करतात. तो त्यांना धर्मश्रद्ध, ईश्वरश्रद्ध ठरवितो.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com