अतुल सुलाखे
‘‘सगळय़ा जगात अंधार दाटला आहे. आपल्या देशातही जुना प्रकाश मंदावला आहे. एकूणच अंधारले आहे. मोठाले प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. अशा काळात प्रकाशाचा शोध घेणे हे आपले सगळय़ांचे कर्तव्य आहे. अशा वेळी सर्वोदयच मदतरूप होऊ शकतो. त्याकडेच आमचे डोळे लागले आहेत.’’ – पं. जवाहरलाल नेहरू(शिवरामपल्ली येथे झालेल्या सर्वोदय संमेलनासाठी दिलेल्या संदेशातून,७ एप्रिल १९५१.)
भागवत धर्म म्हणजे काय याची व्याख्या करताना विनोबा म्हणतात, ‘‘भक्त, नाम आणि ईश्वर यांचे ऐक्य म्हणजे भागवत धर्म.’’ तसे विनोबांचे चरित्र म्हणजे काय? ‘विरक्ती, सत्संगती आणि सेवा’ या चरित्राला कप्पे नाहीत. विनोबा म्हटले की ही सांगड येतेच. त्यांच्या चरित्रातील तीन तपशील मात्र महत्त्वाचे आहेत. बनारस हिंदूू विद्यापीठातील गांधीजींचे भाषण, गीताई आणि भूदान यज्ञ.विनोबा आश्रमात आले. गांधीजींच्या निकट राहून ते प्रथम सत्याग्रही बनले. यातील प्रथम सत्याग्रहीवर अंमळ जास्त जोर दिला की गांधीजींचे ते भाषण आणि नंतरच्या भूदान यज्ञासाठीची विनोबांची तपश्चर्या या गोष्टी बाजूला पडतात.
यातील गांधीजींच्या बनारस विद्यापीठातील भाषणाचे मराठी रूपांतर इथेच येऊन गेले. गीताईचा यथाशक्य परिचय आला आणि येईलही. तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे भूदान यज्ञाचा आरंभिबदू. विनोबांच्या चरित्रांमधे त्याचा उल्लेख असतोच. यासाठी विनोबांनी कशी कार्यसाधना केली ते शिवाजीराव भावे लिखित विनोबा चरित्रात आढळते. प्रत्यक्ष भूदान सुरू झाले तेव्हा, त्या अनुषंगाने आलेले लिखाण प्राय: भावनिक आणि मूल्यमापनाची अजब घाई करणारे असल्याचा अनुभव येतो. अर्थात ती घटना आणि तो कालखंड समाज ढवळून काढणारा होता त्यामुळे अशा प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते.
आजही भूदानाची समग्र नोंद झाली असेल असे म्हणणे कठीण आहे. नवीन साधने सापडली की अध्ययन त्या अनुषंगाने बदलते. तथापि भूदान यज्ञाला आज जवळपास सात दशकांचा काळ लोटला आहे. भूदानाचे समर्थक आणि टीकाकार तटस्थ भूमिका घेतील असे वातावरण आहे आणि त्याचे प्रतिबिंब अलीकडच्या संशोधन साहित्यात दिसते.
यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनोबांच्या काही चरित्रांत अत्यंत तटस्थपणे या घटनेचे विवरण वाचायला मिळते. याचा वस्तुपाठ म्हणून विजय दिवाण लिखित विनोबांच्या चरित्राकडे पाहता येईल. या चरित्र पुस्तकातील भूदानाचा प्रसंग संशोधनाची शिस्त बाळगत आला आहे. त्याचा आणखी एक विशेष म्हणजे भूदानाच्या आरंभाची उत्कटता त्यांनी जराही कमी होऊ दिली नाही. प्रयोग आणि उत्कटता, श्रद्धा आणि प्रज्ञा, चिंतन आणि अंमलबजावणी यांचे व्यापक दर्शन म्हणजे भूदानाचा आरंभ आहे. ते भव्य आहे कारण ते अपार साधे. अगदी ‘गीताई माउली माझी’सारखे आहे. भूमी आणि भूमिपुत्र यांची ताटातूट थांबवणे हा भूदानाचा मुख्य भाग्य होता. भागवत धर्माची व्याख्या भूदानालाही लावली तर ‘भूमी, भूमिपुत्र आणि गोपाल’ यांचा समन्वय म्हणजे भूदान. मूळ भागवत विद्वानांची परीक्षा करते; तर हे भागवत, पंडित, भक्त आणि सेवक यांची पारख करते.
jayjagat24 @gmail.com