मराठी लघुकथा वाचकांसाठी राम कोलारकरांनी किती काम करून ठेवले, याचा तपशील शोधायला गेलात तर ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा’ (१६ खंड), कुमार कथा (६), विनोदी कथा (२०) किर्लोस्कर कथा (३), हंस कथा, जगातील सर्वोत्कृष्ट कथा (२ ), ऐतिहासिक कथा (१०) याशिवाय फडके, खांडेकर, कमलाबाई टिळक, गो. ग. लिमये आणि चि. य. मराठे यांच्या निवडक कथांच्या खंडांसह विखुरलेल्या अनेक कथांचे संपादन-संकलन त्यांच्या नावावर आहे. ऐंशीच्या दशकात या कथाखंडांना घरघर लागली. कारण मराठी वाचकांचे टीव्हीवरच्या मालिकांमधील कथांत स्वारस्य वाढले. त्यामुळे उत्तम लघुकथा छापणारी मासिके- साप्ताहिके ओळीने गतप्राण होऊ लागली. नव्याने तयार झालेल्या मासिकांमध्येही लघुकथा वाचनासाठी ‘गौण’ प्रकार म्हणून सांगितली गेली. त्यामुळे लेखकांनी दिवाळी हाच चांगल्या कथांना उजवायचा काळ ठरविला. त्यातून आपली लघुकथा अनेकार्थी दुष्टचक्रात अडकली, ती अजून बाहेर पडलेली नाही. पण ज्या अमेरिकेकडून कथाखंडांची प्रेरणा कोलारकरांनी घेतली, त्या अमेरिकेत मात्र ‘इयर्स बेस्ट स्टोरी’चे कथाखंड दरवर्षी न चुकता निघत आहेत.

मुख्य धारेतील मासिक- साप्ताहिकांना ‘कथा’ छापण्यात काही कमीपणाचे वाटत नाही. २०१७ साली ख्रिस्टन रुपेनियन या लेखिकेची ‘कॅट पर्सन’ ही ‘न्यू यॉर्कर’मध्ये छापून आलेली कथा वणवावेगाने ‘व्हायरल’ झाली, त्या वर्षांत कथासंग्रहांचा विक्री निर्देशांक जगभरच वधारलेला राहिला. (गेल्या वर्षी या कथेवर आलेल्या चित्रपटाने अमेरिकेतही फार लक्षवेधी कामगिरी केली नाही.) दक्षिण अमेरिकी, जपानी, आफ्रिकी कथांच्या अनुवादांचा सुकाळ सध्या सुरू असताना राम कोलारकरांच्या लघुकथा वैशिष्टय़ांबरहुकूम (कमी आकारात परिणामकारक आशय आणि विषय घेऊन येणारी, टोकदार) कथा कॅनडातील सुवंखम थामावोंग्सा ही लेखिका लिहीत आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kennedy novel marathi short stories ram kolarkaran editing magazines amy
First published on: 06-04-2024 at 00:04 IST