धर्म आणि संस्कृतीचे वाचन व लेखन हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या व्यासंगाचे विषय होत. त्यांच्या शेवटच्या लेखन आणि मुलाखतीचा विषयही संस्कृती असावा, ही या व्यासंगाचीच फलश्रुती नि इति:श्री म्हणावी लागेल. दैनिक ‘सकाळ’चे तत्कालीन सातारा जिल्हा प्रतिनिधी असलेले बाबूराव शिंदे यांनी घेतलेली संस्कृती विषय केंद्रित ही संक्षिप्त मुलाखत २५ जानेवारी, १९९४च्या अंकात प्रकाशित झाली होती आणि त्याच विषयावर आधारित लेख तर्कतीर्थांच्या निधनाची वार्ता घेऊन येणाऱ्या त्याच दैनिकाच्या २८ मे, १९९४च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. मुलाखत शेवटच्या वाढदिवसाला, तर लेख मृत्युदिनी..!

या मुलाखत नि लेखातून तर्कतीर्थांनी मानवी संस्कृतीच्या जन्माची कहाणी विशद केली आहे. त्यानुसार मानव प्राण्यास आपले वर्तन व व्यवहार विचारपूर्वक ठरवावे लागतात. मनुष्य समूहाने राहतो. या समाज समूहात गुरू-शिष्य, पती-पत्नी, पिता-पुत्र यांसारखी अनेक नाती असतात. ती जपण्याचे नियम असतात. हे नियम समंजसपणे पाळण्याची विवेकबुद्धी म्हणजेच संस्कृती होय. विश्व केव्हा निर्माण झाले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्याचा निर्माता कोण, तेही अस्पष्ट आहे. ज्ञानदेवांनी त्यास ‘विश्वात्मक देव’ म्हटले आहे. हे विश्व पृथ्वीवर एकमेकांपासून दूर दूर अंतरावर तयार झाले आहे. तेथील स्थल, काल, स्थितीनुरूप जीवन आणि जगण्याची रीतभात तयार झाली. तीच या प्रदेशाची संस्कृती बनली. ती नदीकाठी विकसित झाली. त्या संस्कृतीची रूपे प्रदेशानुसार भिन्न दिसून येतात.

भारताच्या संदर्भात सिंधू नदीकाठी तयार झालेली संस्कृती आर्यांनी विकसित केली. आर्य जी भाषा बोलत, ती त्या संस्कृतीची वाहक भाषा झाली. तीच गोष्ट युरोपची. तिथे भाषानिहाय राष्ट्रे निर्माण झालेली दिसून येतात. भाषासादृश्य नि भूप्रदेश यांच्यातून संस्कृती संबंध विकसित होत गेले. भाषेप्रमाणेच साहित्याचेही असते. साहित्य संस्कृतीप्रतिबिंबित राहात आले आहे. साहित्याचा आणि भाषेचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीस मिळतो. यात चिरंतन मूल्य असते. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘वेद’, ‘पुराणे’ हे प्राचीन वाङ्मय म्हणून प्राचीन संस्कृतीप्रतिबिंब होय. ही संस्कृती मानवाने महत्प्रयासाने जपली आणि जोपासली आहे.

आता विश्वातील वेगवेगळ्या संस्कृतींना जोडणारी वैज्ञानिक संस्कृती आकाराला आली आहे. विज्ञान हे सर्व देश, प्रदेश, राष्ट्रांत एकच एक नि समान असते. ‘कुराण’, ‘बायबल’, ‘वेद’, ‘संस्कृती’, धर्मानुसार भिन्न; पण विज्ञान मात्र एकच. विज्ञानाने भिन्न संस्कृतींना एकमेकांशी जोडले आहे. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र सर्व संस्कृतीत समान असते. या विज्ञानाने ‘यंत्र’ आणि ‘तंत्र’ विकसित केले आहे. यातून यंत्र संस्कृती आणि युग साकारले आहे. त्याने जीवन गतिमान केले आहे. पृथ्वी प्रदक्षिणा २४ तासांत शक्य झाली, ती केवळ विज्ञानामुळे! यातून दूरत्व संपले आणि जग जवळ आले. जग एकमेकांच्या सोयी-सुविधांबरोबर आपली खुशाली दुसऱ्यास देत आहे. आधुनिक ज्ञान-विज्ञाने आपली साधने अधिक प्रमाणात निर्माण करू लागली आहेत. यांत्रिक कारखान्यांमुळे नद्या प्रदूषित होत आहेत. आधुनिक वैज्ञानिक संस्कृतीतून काही विकृती नि विकार निर्माण होऊ लागले आहेत. आधुनिक उच्च संस्कृतीमुळे निर्माण होणारे नवे धोके नजरेसमोर येत आहेत. त्यामुळे ‘तपासणे’ अनिवार्य ठरत आहे. वेग हा गती, प्रगतीचा असो तो कुठे नि कसा आवरायचा याचा तपास आवश्यक झाला आहे. नव्या आधुनिक संस्कृतीचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव हा दुष्परिणामकारक होणार नाही, याची काळजी डोळ्यात तेल घालून करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

तर्कतीर्थांनी यापूर्वी ‘वैदिक संस्कृतीचा विकास’नामक सन १९५१ मध्ये लिहिलेला जो ग्रंथ आहे, तो आपल्या संस्कृतीची चिकित्सक मांडणी करतो, तसेच ‘हिंदुधर्माची समीक्षा’, ‘सर्वधर्मसमीक्षा’सारखे भाषण ग्रंथ धर्म आणि संस्कृतीवर केलेले विवेचक भाष्य होय. देश, भाषा, संस्कृती, धर्म इत्यादींची केलेली चिकित्सक मांडणी या विषयावरील तर्कतीर्थांचा अधिकार सिद्ध करतात. त्या पार्श्वभूमीवर हे मुलाखत आणि लेख आहेत. त्यातील विचार आकलन पारंपरिक न राहता आधुनिक होताना दिसते.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com