अतीव आनंदाने फुललेलं हसू, दु:खातिरेकाने फोडलेली किंकाळी, निसर्गातल्या अचंबित करणाऱ्या गोष्टींच्या दर्शनाने चेहऱ्यावरचा दिसणारा विस्मय ही भावाभिव्यक्ती जगातल्या सर्वच प्रदेशांत सारखीच असणार. कोणत्याही भाषिक समाजात ती बदलणार थोडीच. पण तरीही प्रत्येक समाजाने आपली भाषा अर्जित केलेली असते. हजारो वर्षांची परंपरा त्यापाठीमागे असते. आपल्या घरातून, भोवतीच्या सामाजिक पर्यावरणातून भाषेचे अदृश्य पाझर झिरपत असतात आणि त्यातून आपण समृद्ध होत जातो. मातृभाषा ही तर ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेतलं महत्त्वाचं साधन. कोणतीच भाषा ही काही एका रात्रीतून, दहा-पाच वर्षांतून घडत नाही. त्या त्या समाजाचे सांस्कृतिक संचित जतन करण्यात, वर्धिष्णू करण्यात भाषेचा वाटा मोलाचाच असतो. शिवाय आपण सामर्थ्याने व्यक्त होतो ते आपल्या मातृभाषेतच.

प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार यू. आर. अनंतमूर्ती यांच्या एका भाषणातला हा भाग त्यांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे… मी कन्नड भाषेत लेखन करतो. कमीत कमी एक हजार वर्षांची जिवंत परंपरा असलेली ही भाषा. माझ्या भाषेतल्या कोणत्याही लेखकाला आपण भारतीय साहित्याच्या मुख्य प्रवाहात आहोत याबाबत आधी आणि आताच्याही काळात मनात कधीही संभ्रम नव्हता. बालपणी जेव्हा अक्षरओळख झाली तेव्हा मी पहिली कविता वाचली आणि ती वाचून डोळ्यात अश्रू आले. या कवितेत संपूर्ण कर्नाटकाला भूमंडळाचं केंद्र म्हणून कल्पिण्यात आलं होतं. या कवितेत एक गाय होती जी आपल्या प्रामाणिकपणा आणि सत्याच्या जोरावर सिंहासारख्या प्राण्याचं हृदय जिंकते. या अज्ञात कवीसाठी जणू कर्नाटक हेच भूमंडळाचं केंद्र होतं. त्या कवितेत एक गुराखी आहे, त्याचं नाव कालिंग… या प्रकारे ही कविता ‘लॉन्गशॉट’ पासून सुरू होते आणि एका गुराख्याला ‘क्लोजअप’मध्ये दाखवते. ज्या गायींना तो आठवत असे त्या गायींची नावं देशातल्या महान अशा नद्यांवरून ठेवलेली होती. ही कविता मला शिकवली गेली तेव्हा आम्ही कर्नाटकातल्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये घनदाट अशा जंगलाच्या मधोमध राहत होतो. भारतातल्या सर्व महान नद्यांचा परिचय मला या कवितेतल्या गायींच्या नावावरून झाला. मी माझ्या वडिलांना कधीही अश्रू ढाळताना पाहिलं नाही, मात्र ही कविता शिकवताना त्यांच्या डोळ्यात मला पाणी दिसलं. गाय आपल्या वासराला सोडून सिंहाला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी एका भक्ष्याच्या रूपात निघते तेव्हा त्या प्रसंगात वडिलांना मी रडताना पाहिलं. या प्रसंगात लेखकाने आपल्या स्मृतींना उजाळा दिला आहे. एखाद्या लेखकाच्या जडणघडणीत त्याच्या मातृभाषेचा संबंध कसा असतो हे यातून दिसून येईल. केवळ विचार आणि भावनांचे प्रकटीकरण आपल्या भाषेतून होत असते असं नाही तर आपला पिंड घडवण्यातही आपल्या भाषेचा मोठा वाटा असतो.

गिरीश कर्नाड हे अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे लेखक. त्यांचा जगभर संचार होता. त्यांनी नाटकं लिहिली ती कन्नड भाषेतून. आपण विचार कुठल्या भाषेत करतो ही गोष्ट महत्त्वाचीच. ययाती या त्यांच्या पहिल्या नाटकाबद्दल त्यांनी लिहून ठेवलंय, ‘संवादासह पात्रं जिवंत होऊन माझ्या डोळ्यांसमोर चालायला लागली आणि जणू एका स्टेनोग्राफरसारखं मी कागदावर उतरवायला लागलो.’ लेखन सुरू केलं तेव्हा इंग्रजीत कविता लिहायच्या की कन्नड भाषेत नाटकं लिहायची असे दोन पर्याय कर्नाड यांच्यासमोर होते. त्यांनी कन्नड भाषेत नाट्यलेखन केलं. तुघलक असो, नागमंडल असो की हयवदन असो, अशा साहित्यकृतींसाठी त्यांनी लोककथांचा, पुराणकथांचा आधार घेतला. मिथकांना नव्या परिभाषेत मांडलं. भारतातल्या अनेक भाषांमधून लिहिणाऱ्या अनेक लेखकांनी भारतीय साहित्य समृद्ध केलं. एखादी भाषा नजरेसमोर आली तर त्या भाषेचा सगळा साहित्यिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्य नजरेच्या टप्प्यात येतो. बंगाल म्हटलं की रवींद्रनाथ टागोरांपासून, सत्यजित रे, महाश्वेता देवी अशी कित्येक नावं समोर येतात. भारतातल्या सर्वच भाषांच्या बाबतीत असं सांगता येईल. त्यांच्या परंपरेबद्दल सांगता येईल.

सांस्कृतिक बहुविधता हे जसं भारताचं वैशिष्ट्य आहे तसेच भाषिक बहुलता हे या देशाचं सामर्थ्य आहे. अनेक भाषा असणं ही कमजोरी नाही. त्यात आविष्काराचं एक सौंदर्य आहे. नेमका त्याचाच विसर पडण्याचा हा काळ आहे. एक देश, एक परंपरा, एक संस्कृती या प्रारूपात पुढे ‘एक देश, एक भाषा’ असं आणखी नवं ब्रीद रचलं जाऊ शकतं. ‘एक राष्ट्र, एक भाषा’ असं करताना अन्य भाषांना दाबून टाकलं जाऊ शकतं. एखाद्या भाषेचा स्वर दाबायचा प्रयत्न होतो तेव्हा फक्त ती भाषा दबून जात नाही, तिथल्या संस्कृतीचाही गळा घोटला जातो. राष्ट्रवादाला भाषेशी जोडणं हे तर आणखीच पुढचं टोक. या साऱ्या एकारलेल्या पर्यावरणात भाषिक बहुलतेच्या या वारशाला आच लागली तर मग भारतातलं हे भाषिक सौंदर्यच नष्ट होईल.

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत ज्या भाषा आहेत त्या भाषांमधून तर साहित्यनिर्मिती होतेच, पण या देशातल्या प्रत्येक राज्यांमध्ये असलेल्या ज्या बोली आहेत त्यातूनही अत्यंत मौलिक असं लेखन होत असतं. या सगळ्या भाषांना फुटलेले बोलीचे धुमारे जिवंत असा प्रत्यय घडवत असतात. केवळ हिंदीच नव्हे तर बंगाली, मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, उडिया अशा अनेक भाषांमधून जी निर्मिती होते त्यातूनच भारतीयता हे मूल्य ठळक होत असतं. कुठल्याही एकाच भाषेतून भारतीय आता सिद्ध होते असं नाही. हिंदी भाषेतसुद्धा अगदी प्रदेशनिहाय विविधता पाहायला मिळेल. या भाषेने अनेक मोठे लेखक दिले. ज्यांच्या नावाशिवाय हिंदी साहित्याची नोंदच पूर्ण होणार नाही त्या प्रेमचंद यांनी हिंदीत लिहिलं तसंच उर्दूतही लिहिलं. मैथिली ही तर हिंदीची बोलीभाषा. बाबा नागार्जुन यांनी कविता लेखन जसं हिंदीतून केलं तसंच मैथिलीतूनही केलं. गजानन माधव मुक्तिबोध यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असणाऱ्या कवीची मुळं ही मराठी समाजातली होती. राजस्थानचे प्रसिद्ध लेखक विजयदान देठा यांनी आपल्या राजस्थानी भाषेत लिहिलं आणि हिंदीतही लिहिलं. फणीश्वरनाथ रेणू यांच्या कथा, कादंबऱ्यांमध्ये तर बोलीची अनेक रूपं आढळतात. त्यांच्या ‘मैला आँचल’सारख्या कादंबरीत एकच नव्हे तर अनेक बोली आढळतात. वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरून आलेली पात्रं वेगवेगळ्या बोलीत संवाद व्यक्त करतात. विरोध हा कुठल्याच भाषेला असण्याचं कारण नाही. तिची सक्ती करण्याची नीती सर्वस्वी गैर. एखादी भाषा सत्तेच्या दबावातून थोपवली जाणं, लादली जाणं हे भाषिक सौहार्दाला मारक ठरतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसरी भाषा म्हणून होणाऱ्या हिंदीच्या सक्तीला जेव्हा दक्षिणेतल्या अनेक राज्यात विरोध झाला तेव्हा एक युक्तिवाद मांडण्यात आला. उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये तुम्हाला दक्षिणेतली कुठलीही एक भाषा शिकावी लागेल तर तिथं ते सहजपणे स्वीकारलं जाईल का, असं विचारलं गेलं. हा तर्क अगदीच दुर्लक्षित करण्यासारखा नाही. अलीकडे देशप्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती जशा विकसित झाल्या तसेच देशद्रोही ठरवण्याचे मापदंडही निश्चित होऊ लागले. सरकारच्या एखाद्या धोरणाला विरोध करणं, त्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोही असणं असं एक नवं गृहीतक मांडलं जाऊ लागलं. हिंदी भाषा येणं म्हणजेच देशप्रेमी असणं. हिंदी बोलता, वाचता न येणं म्हणजे भारतीय नसणं असंही उद्या ठसवलं जाऊ शकतं. देशद्रोही असण्याचे अनेक शिक्के तयार झाले आहेत. त्यात तुम्हाला हिंदी येत नाही म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात असा आणखी एक शिक्का वाढवला जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर मातृभाषेचं बोट सुटत जाणं म्हणजे आईचीच ओळख विसरणं. लोकशाहीर संभाजी भगत यांचं गाणं आहे, ‘हे पालखीचे भोई, यांना आईची ओळख नाही.’